आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवहारच माहिती नसताना खडसेंनी मंत्रिपद का साेडले? मंत्रिपदाच्या शपथेचाही भंग: जलतारे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर  - उद्योगमंत्र्यांना कुठलीही कल्पना न देता एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची बैठक माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी कशी बोलावली? ही बैठक अापल्या बंगल्यावर बोलावण्याची तत्परता कशी काय दाखविली? खडसे यांच्याकडून या प्रकरणात त्यांची पत्नी, जावई आणि सचिवाच्या साक्षी का नोंदविण्यात आल्या नाहीत?, खडसेंना जर या व्यवहारांची माहिती ६ जूनला मिळाली, तर चार जूनला त्यांनी राजीनामा का दिला?, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडून मिळालेली नाहीत. त्यामुळे त्यांना भोसरी येथील जमीन खरेदी व्यवहाराची संपूर्ण कल्पना होती, हे स्पष्ट होत असल्याचा दावा मंगळवारी एमआयडीसीच्या वकिलांनी न्या. दिनकर झोटिंग आयोगापुढील सुनावणीदरम्यान केला.  
एमआयडीसीच्या वतीने बाजू मांडताना अॅड. चंद्रशेखर जलतारे यांनी या प्रकरणात खडसे यांचा सहभाग असल्याचे स्पष्टच होत असल्याचा दावा केला. खडसे यांनी आपल्या सुरुवातीच्या जबाबात जमिनीची नुकसान भरपाई जमीन मालक उकानी यांना न मिळाल्याने त्यांना जमीन विक्रीचा अधिकार होता असे सांगितले होते. पुराव्यांची नोंदणी आणि युक्तिवाद आटोपल्यानंतर खडसे यांनी आपला जबाब बदलत मला या व्यवहाराची कुठलीच कल्पना नव्हती असा पवित्रा घेतला. यावरून खडसे सत्य लपवत असल्याचे स्पष्ट होते, असे अॅड. जलतारे यांनी आयोगापुढे सांगितले.   

खडसे यांच्याकडून त्यांच्या पत्नी, जावई आणि सचिव काशिद यांच्या साक्षी घेण्याची गरज होती. मात्र, त्या न घेण्यात आल्याने खडसेंबद्दल हा अंदाज बांधता येताे. जमिनीचे मालक उकानी हे खडसे यांच्या सचिवांना भेटल्यावर खडसे यांनी आपल्या बंगल्यावरच अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्याची तत्परता दाखविली. ही तत्परता दाखविण्याचे कारण काय, असा सवाल अॅड. जलतारे यांनी उपस्थित केला. खडसे यांनी उद्योगमंत्र्यांना काहीही न कळवता एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची बैठक का घ्यावी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.   
 
आपल्याला या व्यवहाराची कुठलीच कल्पना नव्हती, हा खडसे यांचा दावा अविश्वसनीय वाटतो, याकडे लक्ष वेधून अॅड. जलतारे यांनी नमूद केले  की, २३ फेब्रुवारी २०१६ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर २८ मार्च २०१६ रोजी खडसे यांच्या पत्नी आणि त्यांच्या जावयांनी कोलकाता येथे जाऊन जमिनीचा करार केला. या वेळी ५० लाखांचा अग्रिम देण्यात आला. १२ एप्रिल रोजी खडसे यांनी पुन्हा जमिनीबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. २८ एप्रिल रोजी विक्रीपत्रही पार पडले. या सर्व घडामोडी खडसे यांना माहिती नव्हत्या, हे केवळ अविश्वसनीय असल्याचे अॅड. जलतारे यांनी नमूद केले. खडसेंना या व्यवहारांची कल्पना ६ जूनला मिळाली तर त्यांनी ४ जूनला राजीनामा का दिला, हा कळीचा प्रश्न असून त्याचे कुठलेही समाधानकारक उत्तर खडसेंकडे नाही, याकडे अॅड. जलतारे यांनी लक्ष वेधले. 
 
दरम्यान, एमआयडीसीच्या वकिलांच्या या युक्तिवादाला बुधवारी खडसे यांचे वकील उत्तर देणार आहेत.   
 
मंत्रिपदाचा शपथेचा खडसेंकडून भंग  : अॅड. जलतारे
या प्रकरणाचे कंगोरे पाहता खडसे यांनी मंत्रिपदाच्या शपथेचाही भंग केला. त्यांनी स्वतःच्या लाभासाठी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. वास्तविक पाहता ते शासकीय जमिनीचे संरक्षक होते. त्यांचे कृत्य विश्वासघाताचे आहे. याची सखोल चौकशी करण्याची शिफारस करावी, अशी मागणीही एमअायडीसीचे वकील अॅड. जलतारे यांनी या वेळी केली.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...