आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक : चारशे रूपयांच्या गणवेशासाठी पाचशे रूपयांचे बँक खाते, पालकांची अडवणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
पुसद - शालेयगणवेश खरेदी प्रक्रियेतील अनियमितता रोखण्याच्या हेतुने यंदा प्रथमच गणवेशाची रक्कम ४०० रुपयांची रक्कम थेट बँक खात्यांवर जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु हा निर्णय पालकांच्या खिशाला कात्री लावणारा ठरत आहे. कारण ४०० रूपये गणवेशाच्या रकमेसाठी पालकांना आपल्या पाल्यांच्या नावे पाचशे रूपये बँकेत भरून झिरो बॅलन्स खाते उघडावे लागत आहे. 
 
इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना दोन शालेय गणवेश मोफत दिले जातात. एका गणवेशासाठी ४०० रुपयांची तरतूद आहे. यापूर्वी गणवेश खरेदीची रक्कम जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे वितरीत केली जात असे. तद्नंतर ती तालुक्यातील त्या-त्या शालेय व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द करण्यात येत असते. समिती मुख्याध्यापक शालेय गणवेशाची खरेदी करून विद्यार्थ्यांना वाटप करीत. परंतु या खरेदीच्या प्रक्रियेत अनियमितता होत असल्याच्या तक्रारी दरवर्षीच प्राप्त होत होत्या. त्यामुळे पारदर्शकता आणण्याच्या हेतुने शासनाने या वर्षीपासून खरेदीची प्रक्रियाच सपशेल बाजुला ठेवून दोन गणवेशाचे ४०० रूपये थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक पाहता पालकांच्या नावे बँक खाते असेल तर, त्या खात्यांतही सदर रक्कम जमा करता येते. 
 
परंतु बँक प्रशासनाची आडमुठी भूमिका यात अडसर ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या नावेच खाते काढा, असा दम भरत बँका पालकांची अडवणूक करीत आहेत. त्यामुळे पालकही नाईलाजाने आपल्या पाल्यांच्या नावेच खाते उघडण्यास पसंती देत आहेत. मात्र झिरो बॅलन्स खाते उघडण्यासाठी ५०० रूपये भरावे लागत असल्याने पालकांच्या खिशाला कात्री लागत आहे. 
दोन शालेय गणवेश ४०० रूपयांचे तर बॅक खाते उघडण्यासाठी ५०० रूपयांचा भुर्दंड सोसावा लागत असल्याने शासनाचे हे मोफत गणवेश जणू विकतच घेतल्यासारखे आहे. 
 
गणवेशाच्या रक्कमेत वाढ होईना 
गणवेशाची ४०० रुपयांची रक्कम यंदा बॅक खात्यावर जमा होणार असल्याने पालकांना आपल्या पाल्यांसाठी मनपसंत कापड अथवा तयार गणवेश खरेदी करता येणार आहेत. परंतु कापडाची महागाई वाढल्याने ४०० रूपयांच्या तुटपुंज्या रक्कमेत दोन शालेय गणवेशाचे दर्जेदार कापड अथवा तयार गणवेश खरेदी करणे कसे शक्य होईल, असा प्रश्न पालकांना पडला आहे. अलीकडच्या काळात गणवेशाच्या तरतुदीत जराही वाढ झालेली नाही. त्यामुळे शालेय गणवेशाच्या रक्कमेत वाढ करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे पालकांनी सांगितले. 
 
बँक खात्यावर रक्कम जमा करून घेण्याबाबत निर्देश आवश्यक 
मोफत दोन शालेय गणवेशाची ४०० रुपयांची रक्कम बँक खात्यांवर जमा करण्याचा निर्णय निश्चित चांगला आहे. यामुळे गणवेश खरेदी प्रक्रियेतील गैरव्यवहाराला चाप बसणार आहे. परंतु बँका विद्यार्थ्यांच्याच नावे खाते उघडावे लागेल, असा तुघलकी सल्ला देत असल्याने पालकांना नाहक ५०० रुपयांची झळ सोसावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनानेच बँकांचे कान उपटण्याची गरज निर्माण झाली असून पालकांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा करून घेण्याबाबत निर्देश देणे आवश्यक झाले आहे. 
 
निर्णयाचे स्वागत पण भुर्दंड तर बसणारच 
- शासनाच्या शालेयविभागाने योग्य निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाचे स्वागत आहे. यामुळे गैरप्रकार रोखण्यास शासनाला मदत होईल, परंतु ४०० रूपयांचे गणवेशासाठी ५०० रूपये बँक खाते उघडावे लागत असल्याने त्यांना मोठा भुर्दंड बसणार आहे.
’’ सुनिल जाधव, मुख्याध्यापक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाळा,पुसद 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...