आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढोलताशांच्या गजरामध्ये गणरायांचे उत्साहात आगमन,मातीच्या गणेश मूर्तींना विक्रमी मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान िवसर्जनानंतर या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्यामुळे होणारे विद्रुपीकरण टाळण्यासाठी यावर्षी बहुसंख्य भाविकांनी मातीच्या मूर्तींना प्राधान्य देत घरोघरी गणेशाची थाटात स्थापना केली.त्यामुळे दोन दिवसांपासून मातीच्या मूर्तींची विक्रमी मागणी बाजारात दिसून आली. दरम्यान, विविध सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी ढोलताशांच्या गजरात सोमवारी गणेशाची उत्साहात प्रतिष्ठापना केली. गणेशोत्सवानिमित्त अमरावती शहरासह संपूर्ण जिल्हाभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विघ्नहर्ता, शुभ फलदायक श्री गणरायांचे रूपही तेवढेच पवित्र मंगलमय असावे म्हणून पंचमहाभूतापैकी एक मातीपासून निर्मित श्री गणेश मूर्तींची स्थापना करण्यास यंदा भाविकांनी प्राधान्य िदल्याने निसर्ग, पर्यावरणाबाबत भाविकांमध्ये जागृती होत असल्याचा सकारात्मक बदल गणेशेत्सवाच्या पहिल्याच दिवशी दिसून आला. शहरातील प्रमुख बाजारांमध्ये विक्रमी मातीच्या मूर्तीची विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मातीच्या गणेश मूर्तींच्या स्टॉलवरील बहुतेक मूर्ती या सकाळी ११ वाजेपर्यंत पर्यंतसंपल्या होत्या. ज्या प्रतिमा शिल्लक होत्या त्यांचेही बुकिंग झाले होते. सायंकाळपर्यंत नेहरू मैदानावरील मातीच्या सुमारे २० हजार मूर्ती भाविक स्थापनेसाठी घेऊन गेले तर कुंभारवाड्यातून ३० हजार मूर्ती भक्तांनी वाजत गाजत नेल्या. शहराच्या गाडगेनगर, राजापेठ, राजकमल चौक, नेहरू मैदान, रविनगर चौक, सायन्स कोर आदी भागात पवित्र मातीच्या मूर्तींना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. नेहरू मैदानावर वन्यजीव पर्यावरण संवर्धन संस्था, ओम मूर्ती भंडार, चेतन आर्टस, वरद विनायक अशा विविध स्टाॅल्सवरून मातीच्या मूर्तींची विक्री करण्यात आली. मैदानावर एकूण ३४ मातीच्या मूर्तींचे स्टाॅल्स लावण्यात आले होते. विदर्भ कुंभार समाज सुधार समिती संत गोरोबा काका समाजोन्नती बहुउद्देशीय संस्थेने पुढाकार घेत यंदा नेहरू मैदानावर मातीच्या मूर्तींचे ३२ स्टाॅल्स एकत्रितपणे लावले होते. पुढच्या वर्षी संपूर्ण भाविकांना मातीच्या मूर्ती मिळतील, अशी आशाही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सोबतच कोणीही पीओपीच्या मूर्ती विकणार नाही याची खबरदारी घेतली. जर कोणीही अटीचा भंग केला तर पुढच्या वर्षी त्याला स्टाॅल दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गणेशाच्या स्थापनेसाठी भाविकांमध्ये आज सकाळ पासून उत्साह दिसून आला. बाजारात पुजा, सजावटीचे साहित्य, मूर्ती खरेदीसाठी गर्दी दिसून आली. शहरातील गणेश मंडळांनी ढोलताशांच्या गजरात गणरायांचे स्वागत केले.

पालकमंत्री प्रवीण पोटे, अमरावतीचे आमदार डाॅ. सुनील देशमुख, बडनेराचे आमदार रवि राणा, माजी खासदार अनंत गुढे, मनपा आयुक्त हेमंत पवार यांनी या स्टाॅलला भेटी देऊन मूर्तिकारांचे मनोधैर्य वाढवित त्यांचे कौतुक केले. राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री पोटे यांनी पुढच्या वर्षी मातीच्या मूर्तींचे स्टाॅल्स खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून लावले जातील, अशी घोषणा केली.
पीओपीच्या मूर्तीत भक्ती भाव वाटत नाही
मी सातत्याने मातीचे गणराय घरी आणत असतो. माती ही पंचमहाभूतांपैकी एक असल्यामुळे त्यापासून निर्मित मूर्तीचे महत्त्व आहे. पीओपीच्या मूर्तीत मला तो भक्ती भाव वाटत नाही.
शेखर चव्हाण
मातीच्याच एकदंताची नेहमी स्थापना करणार
यंदा मातीच्या एकदंताची स्थापना करण्याचे हे माझे पाचवे वर्ष आहे. आजही आम्ही मातीची मूर्ती मिळावी म्हणून सर्वत्र फिरलो. समाधान झाल्यानंतरच मातीची मूर्ती घेतली.
प्रवीण कापडे

पाण्यात पूर्ण विसर्जित होते
स्थापनेबाबत जो भक्तिभाव मनात असतो तसाच विघ्नहर्त्याचे विसर्जन करतानाही असायला हवा. मातीची मूर्ती पाण्यात पुर्णपणे विसर्जित होते. त्यामुळे मातीची मूर्ती घेण्याचा माझा आग्रह असतो.
इकोफ्रेंडली अन् प्रदूषणही नाही
मातीची गणराय इकोफ्रेंडली असल्यामुळे त्यापासून जल प्रदुषण होत नाही. तसेच या मूर्तीला रंग नैसर्गिक दिला जात असल्यामुळे विसर्जित केल्यानंतर जलचरांनाही नुकसान पोहोचत नाही. - गजेंद्र निर्मळ
पर्यावरण रक्षणासाठी पुढे येणे आवश्यक (फोटो आहे)
पर्यावरण रक्षणासाठी मातीच्या मूर्ती बसवणे गरजेचे गत १० वर्षांत पीओपीने मातीवर अतिक्रमण केल्याने मूर्तिकारांना नाईलाजास्तव पीओपीकडे वळावे लागले. मात्र पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे कळल्यानंतर समितीच्या मार्गदर्शनात मूर्ती कारांनी मातीच्या मूर्ती घडवल्या. - डॉ. श्रीराम कोल्हे, सचिव विदर्भ कुंभार समाज सुधार समिती.
भावना जपणे ही तेवढेच गरजेचे (फोटो आहे)
बाप्पांची स्थापना करताना ज्या धार्मिक भावनेतून करतो तीच भावना विसर्जन करतानाही जपणे आवश्यक आहे. पीओपीच्या मूर्ती असेल तर विटंबना होते. म्हणूनच यंदा इको फ्रेंडली गणेश मूर्तींचे प्रदर्शन लावले आहे. त्याला भक्तांचा ही अगदी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. -डॉ. संजय साळीवकर, अध्यक्ष विदर्भ कुंभार समाज सुधार समिती.
गरिबांच्या शिक्षणासाठी निधी खर्च करतोय (फोटो आहे)
मातीच्या मूर्तींची विक्री करून आम्ही समाजातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करीत आहोत. यंदा आठ विद्यार्थ्यांना लक्ष ६० हजार रु. दिले. पाच विद्यार्थी पुण्यात शिक्षण घेत आहेत. -पंजाब काकडे, अध्यक्ष, संत गोरोबा काका समाजोन्नती बहु. समिती.

शहरातील मातीच्या मूर्तीची संख्या
नेहरू मैदान : २०,०००
कुंभारवाडा : ३०,०००
राजापेठ : ५,०००
रविनगर चौक : १०,०००
गाडगेनगर : १५,०००
प्रथमच मातीची मूर्ती घेतली
^प्रथमचमातीचीमूर्ती घेतली. यापुढेही नेहमीच मातीचीच मूर्ती घेणार. माती नैसर्गिक असल्यामुळे कोणतेही प्रदुषण होत नाही. तसेच पावित्र्यही कायम राहते.’’ लक्ष्मीदिनेश पोहणे.

पाण्यात लवकर मुरावी हा उद्देश
^यंदामीप्रथमच मातीची गणेश मूर्ती घेतली कारण ती लवकर पाण्यात मुरते. त्यामुळे पाण्याच्या शुद्धतेवर कोणताही परिणाम होत नाही. पीओपीची मूर्ती मात्र पाण्यात मुरत नाही.’’
स्नेहल मानकर.
शहरात सोमवारी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मूर्तीची वाजत-गाजत मिरवणूक काढून प्रतिष्ठापना केली.

मातीच्या गणेश मूर्तीच का?
पाण्यात माती सहज विरघळते. रासायनिक रंगांची तीव्रता मातीने कमी होते. मुर्ती पाण्यात पुर्णपणे विरघळत असल्याने मूर्तीची विटंबना होत नाही. सर्वच सजीव पंच तत्त्वात विलीन होतात. मातीच्या मूर्ती सृष्टीचक्राला धरून असल्याने आध्यात्मिक समाधान लाभते.

पीओपी मूर्ती का नकोत?
पाण्यात सहज विरघळत नाही, रासायनिक रंग जल प्रदूषित करतात, जलचरांसाठी पीओपी घातक ठरते, देवी देवतांच्या शरीराचे अवयव विखुरतात विद्रूपता येऊन विटंबना होते, पीओपी मूर्तीच्या सृष्टीचक्राच्या विपरित आहेत, त्यामुळे या मुर्तींकडून पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात हानी पोहचते.
बातम्या आणखी आहेत...