आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्यामध्ये पाऊस साठवून लाडक्या श्री गणरायाला निरोप; भक्तांच्या उत्साहाला उधाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नागपूर- महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरची शान असलेल्या गणेशोत्सवाचा समारोप महापालिका, पोलिस व स्थानिक प्रशासनाने केलेल्या उत्तम नियोजनामुळे शानदार झाला. गणेश मंडळांनी पारंपरिक उत्साहात मिरवणुकीने गणेशाला निरोप दिला, तर घरगुती गणेशाला कौटुंबिक जिव्हाळ्याने निरोप देण्यात आला. ध्वनी प्रदूषणावरील उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने गणेश मंडळांनी डीजे तसेच बँड पथकाच्या दणदणाटात विसर्जन मिरवणुका काढल्या. यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. गुलाल उधळत व डोळ्यात पाऊस साठवून भक्तांनी लाडक्या गणेशाला निरोप दिला. “नागपुरचा राजा’ गणेशाचे मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता विसर्जन करण्यात आले. आमदार प्रकाश गजभिये यांच्या एकता गणेशोत्सव मंडळ तसेच पारडी येथील “विदर्भाचा राजा’चे विसर्जन उद्या करण्यात येणार आहे. 

मंगळवारी अनंत चतुर्दशीला सकाळपासून विसर्जनाला सुरुवात झाली. विसर्जनाला होणारी गर्दी टाळण्यासाठी मोठ्या गणेश मंडळांनी आधल्या दिवशी िवसर्जन करावे, असे आवाहन शहर पोलिसांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत काही मंडळांनी एक दिवस आधी विसर्जन केले. घरगुती गणेशाचे िवसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. सर्व तलाव व विसर्जनस्थळी स्वयंसेवी संस्था तसेच महापालिकेचे कार्यकर्ते तळ ठोकून होते. त्यांनी निर्माल्य संकलनाचे काम चोख केले.   पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी यंदा मनपा प्रशासनाने कृत्रिम तलावांच्या संख्येत वाढ केली होती. कुठल्याही नैसर्गिक तलावात गणेश विसर्जन करू नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले. नागपूर महानगरपालिकेने शहरातील दहाही झोनमध्ये जागोजागी कृत्रिम तलाव आणि विसर्जन कुंडांची व्यवस्था केली होती. 

नीरीचे इको फ्रेंडली विसर्जन
नीरीतर्फे विसर्जनाकरीता १४ हजार लिटरचे दोन आणि २० हजार लिटरचा एक असे दोन कुंड तयार करण्यात आले होते. यातील १४ हजार लिटरच्या एका कुंडात शाडू मातीच्या तर इतर दोन कुंडांत पीओपी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. पीओपीच्या गणेश मूर्तींकरीता कुंडात अमोनियम बायकार्बोनेट टाकण्यात आले होते. यामुळे पीओपीची रिअॅक्शन होऊन त्यापासून अमोनियम सल्फेट व कॅल्शियम कार्बोनेट तयार होते. त्यापासून निर्मित खत नीरीमधील झाडांना देण्यात येईल, असे नीरीचे शास्रज्ञ कृष्णा खैरनार यांनी सांगितले. 
 
फिरते कृत्रिम तलाव
महापालिकेच्या धरमपेठ झोनतर्फे चार टाटा-एसी गाड्यांवर फिरते कृत्रिम तलाव तयार केले होते. या मोबाईल टँकच्या चालकांचे मोबाईल क्रमांकही जाहीर केले होते. फोनवर टँक घरी येत होती. ज्येष्ठ नागरिकांनी या सुिवधेचा लाभ घेतला.
बातम्या आणखी आहेत...