आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोंदिया विमानतळाला कुलूप ठाेका; ग्रामपंचायतीची नाेटीस, दाेन वर्षांत ३४ लाखांचा कर थकवल्याचे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- गोंदिया येथील बिरसी विमानतळाच्या प्रशासनाने ग्रामपंचायतीचा कर थकविल्याचा दावा करत स्थानिक ग्रामपंचायतीने चक्क विमानतळालाच कुलूप ठोकण्याची नोटीस बजावली अाहे. या नोटिसीवर नेमकी काय भूमिका घ्यावी, असा पेच विमानतळ प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. 

गोंदिया जिल्ह्यातील बिरसी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत बिरसी विमानतळ आहे. सन २००५ मध्ये हे विमानतळ सुरू झाले होते. सध्या या विमानतळावरून कुठलेही व्यावसायिक उड्डाण होत नसले तरी वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी नॅशनल फ्लाइंग इन्स्टिट्यूट मात्र कार्यरत आहे.  या इन्स्टिट्यूटमध्ये नॅशनल फ्लाइंग इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाची अनुक्रमे ५१ आणि ४९ टक्के भागीदारी आहे. गेल्या आठवड्यात बिरसी ग्रामपंचायतीने अचानक विमानतळ प्रशासनाला नोटीस बजावून त्यात दोन वर्षांचा ३४ लाखांचा कर थकीत असल्याचा दावा केला आहे. कर न भरल्यास ११ जानेवारी रोजी ग्रामपंचायत विमानतळाला कुलूप ठोकेल, असा इशारा नाेटिसीत देण्यात आला आहे.

यासंदर्भात विमानतळ संचालक प्रजापती यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ग्रामपंचायत नेमक्या कुठल्या आधारे दोन वर्षांच्या कराचा दावा करते आहे, हे समजायला मार्ग नाही. सन २००५ मध्ये विमानतळ सुरू झाले. मात्र, आजवर ग्रामपंचायतीने यापूर्वी कधीही कर भरण्याची नोटीस बजावलेली नाही. ग्रामपंचायतीला आम्हाला कर मागण्याचा अधिकार आहे काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विमानतळासाठी जमीन घेताना त्यावेळी झालेल्या व्यवहारांची व त्यातील तरतुदींची कागदपत्रे अाम्ही सध्या तपासत आहोत.

ग्रामपंचायतीच्या नोटीशीची भारतीय विमानतळ प्राधिकरणाला कल्पना देण्यात आली आहे. त्यावर प्राधिकरणाची भूमिका अद्याप ठरायची आहे. मात्र, ग्रामपंचायत अशा पद्धतीने सरकारी विमानतळाला कुलूप लावण्याचा इशारा देऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. गंमतीचा भाग म्हणजे ग्रामपंचायतीने ही नोटीस देताना दोन वर्षांपूर्वीचा कर माफ करण्याची व केवळ दोन वर्षांचा कर भरण्याची सूचना केली आहे.
बातम्या आणखी आहेत...