आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय गणवेशाच्या ‘घोड्याकरिता’ बँक खात्याची ‘नाल’च जास्त महाग, पालक चिंतेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिवसा, धामणगाव रेल्वे - गणवेष खरेदीतील भ्रष्टाचाराला लगाम लावण्यासाठी विद्यार्थ्यांना चारशे रुपये अनुदान जमा करण्यासाठी दोन हजार रुपयांचे खाते काढणे आवश्यक आहे. परंतु तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर पालकांना हा भुर्दंड परवडणारा नसल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी खातेच काढले नसल्याने निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांना गणवेशच मिळू शकले नाही. त्यामुळे शालेय गणवेषाच्या ‘घोड्यासाठी’ दोन हजार रुपयांच्या बँक खात्याची ‘नाल’ महाग असल्याची भावना पालकांकडून व्यक्त केली जात अाहे. गणवेषाचे वाटपच होऊ शकल्यामुळे स्वातंत्र्य दिन बेरंग होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. 
 
गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडून विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत गणवेशाचे मोफत वाटप केले जात होते. मात्र या योजनेला भ्रष्टाचाराचे झुरळ लागल्याने तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांना दोन ड्रेससाठी मिळणारे चारशे रुपये अनुदान देण्यासाठी बँक खाते काढणे बंधनकारक केले आहे. बँका झीरो बॅलन्‍सवर खाते काढण्यासाठी तयार नसल्याचे चित्र तालुक्यामध्ये आहे. बँकेत खाते काढण्यासाठी किमान दोन हजार रुपये जमा ठेवणे आवश्यक आहे. परंतु जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगर पालिका शाळांमध्ये सर्वसाधारणपणे शेतकरी, शेतमजुरांची मुले शिक्षण घेतात.
 
त्यामुळे चारशे रुपयांच्या गणवेशासाठी दोन हजार रुपयांचे खाते काढणे पालकांना परवडणारे नाही. पालकांनी रेडीमेड चांगल्या दर्जाचा एक गणवेश घ्यायचा झाल्यास त्यांची किंमत सुमारे ३०० ते ३५० रुपये आहे. कापड घेऊन गणवेष शिवून घ्यायचे म्हटल्यास हाच खर्च दोन गणवेशासाठी सुमारे आठशे ते हजार रुपयांच्या घरात जातो. दरम्यान, शासनाकडून दोन गणवेशासाठी फक्त चारशे रुपये दिले जातात. तेही बँक खाते काढल्याशिवाय मिळत नाहीत. या खात्यासाठी किमान दोन हजार रुपये खर्च करण्याची बहुतांश पालकांची आर्थिक स्थिती नसल्याचे दिसत आहे. 
 
शिक्षकांची पंचाईत : पूर्वीशाळा व्यवस्थापन समितीकडून गणवेश घेतले जात होते. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना गणवेश मिळत होते. परंतु चालू शैक्षणिक वर्षापासून बँकेत पैसे वर्ग करण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षकांची गोची झाली आहे.पालक खाते काढत नाहीत. तर वरिष्ठ अधिकारी खाती काढून घेण्यासाठी सांगतात. पालक कपडे खरेदीची पावती आणून देत नाहीत, अशी प्रतिक्रिया एका शिक्षकाने नाव छापण्याच्या अटीवर दिली. शासनाकडून उन्हाळा सुट्टीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय कृत बँकेत खाते काढायला सांगितले होते. परंतु फक्त काही विद्यार्थ्यांनी खाती काढली आहेत. त्यामुळे धामणगाव रेल्वे तालुक्यात साधारणपणे निम्म्याहून अधिक लाभार्थ्यांनी खातेच उघडले नाही. 
 
तिवसा तालुक्यात एकही पावती नाही : तिवसा तालुक्यात एकुण ४४०३ लाभार्थी विद्यार्थी लाभार्थी आहेत. परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे बहुतांश पालकांनी या योजनेवर पाणी सोडले आहे. तिवसा तालुक्यात ७६ जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. या विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी १७ लाख ६१ हजार २०० रुपये एवढा निधी आलेला आहे. परंतु एकही गणवेशाची खरेदी पावती न आल्याने हा निधी तसाच पडून आहे. 

हेलपाट्यांचा गणवेश 
शासनाच्या उदासीन धोरणामुळे पालकांना फारच हेलपाटे घ्यावे लागत असल्याचे चित्र आहे. या पुर्वी काही विद्यार्थ्यांंनी स्वत: खाते उघडले. काही पालकांनी झीरो बॅलन्सवर खाते उघडले. परंतु शासनाच्या नवीन नियमानुसार आता विद्यार्थ्यांना बँकेत खाते काढण्यासाठी आईचे खाते काढावे लागणार आहे. पालकांना दुकानामध्ये दोन गणवेश चारशे रुपयात घेऊन त्यानंतर दोन गणवेशासाठी मुख्याध्यापक पैसे काढण्यासाठी धनादेश देतील. सध्या ग्रामीण भागात पंधरा दिवसांपासून पाऊस नाही. पिके पावसाअभावी सुकू लागली आहेत. मजुरांना शेतात कामे नाही. हातालाच काम नसल्याने पोट भरावे की विद्यार्थ्यांंना गणवेश आणावा अशी द्विधा अवस्था पालकांची झाली आहे. तालुक्यातील अनेक शाळांमध्ये अद्यापही विद्यार्थ्यांंनी आईचे खातेसुद्धा उघडले नसल्याचे चित्र आहे. 

विद्यार्थी शालेय गणवेशापासून वंचित 
ग्रामीण भागातील जि.प. प्राथमिक मराठी शाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला. शासनाच्या जाचक अटीमुळे मात्र अद्यापही शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाही. मागील वर्षी शाळेमध्ये मिळालेले जुनेच गणवेश घालून विद्यार्थी शाळेत येत आहे. १५ ऑगस्ट दोन दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. परंतु अद्यापही गणवेषाचे वाटप होऊ शकल्याने स्वातंत्र्यदिन बेरंग होण्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. 
 

२०० रुपयात चांगला गणवेश मिळत नाही 
मुलाचा एकच गणवेश चारशेचा झाला. दोनशे रूपयात कुठल्याच परीस्थीतीत चांगला गणवेश मिळत नाही. 
- मनोहर उमप, पालक, मोझरी 
 
एकच गणवेश द्यावा 
शासन दोन गणवेशासाठी चारशे रूपये देत आहे. चारशे रूपयात शिवून गणवेश होऊ शकत नाही. चारशे रुपयांत रेडीमेड गणवेष घेतले तरी दर्जाहीन असल्यामुळे ते टिकत नाहीत. त्यामुळे शासनाचे वर्षातून एकदाच गणवेश द्यावा त्यासाठी पाचशे रूपये द्यावे. 
- गणेश भुरे, पालक, मोझरी 
 
सर्व विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होईल 
लवकरच शंभर टक्के विद्यार्थ्यांचे खाते निघून जातील. सर्व विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होईल. 
- उषा शेंडे, गटशिक्षणाधिकारी. तिवसा, पं. स. 
 
एका गणवेशासाठी निधी जमा 
विद्यार्थ्यांंच्या बँक खात्यात एका गणवेशासाठी निधी जमा करण्यात आला असून, शासनाच्या आदेशानुसार गणवेशाची अनुदानाची रक्कम पालकाच्या संबंधित शाळेचे मुख्याध्यापक जमा करतील.
- सुषमा मेटकर, गटशिक्षणाधिकारी, धामणगाव रेल्वे. 
बातम्या आणखी आहेत...