आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिस्टल पुरवठादाराला मध्यप्रदेशातून अटक; टोळी विरोधी पथकाची कारवाई, तीघे अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - शहरातील वडगावरोड परिसरात राहणाऱ्या तरुणाला अटक करुन त्याच्याजवळून देशी बनावटीचे पिस्टल आणि ३५ जीवंत काडतूस जप्त करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करीत टोळी विरोधी पथकाने थेट मध्य प्रदेश गाठून हि पिस्टल पुरवणाऱ्या मुख्य अारोपीस सिंगूर-सेलदाल रोडवरुन ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काही पिस्टल जप्त होण्याची शक्यता आहे. 
 
उत्तमसिंग रतनसिंग टकराना रा. सिंगूर ता. गोगावा जि. खरगोण असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पुरवठादाराचे नाव आहे. या प्रकरणी सविस्तर असे की, टोळी विरोधी पथकाने मिळालेल्या माहितीवरुन सागर दुधे वय २८ वर्षे रा. छत्रपती नगर याला मोहा फाटा येथे अटक केली होती. त्याच्याजवळून एक देशी बनावटीचे पिस्टल, ३५ जीवंत काडतुस आणि एक दुचाकी त्यावेळी जप्त करण्यात आली होती. सागर दुधेची चौकशी केली असता त्याने ही पिस्टल मोहन विष्णु चौधरी याच्या सांगण्यावरुन आणल्याची माहिती या पथकाला दिली. त्यावरुन टोळी विरोधी पथकाने मोहन विष्णु चौधरी याला अटक करुन ताब्यात घेतले. यावेळी मोहन याच्याजवळ जीवंत काडतुस आढळून आले. त्याची चौकशी केली असता ही पिस्टल मध्येप्रदेशातील सिंगूर या ठिकाणावरुन आणल्याचे स्पष्ट झाले. 
 
ही माहिती हाती येताच टोळी विरोधी पथकाने या आरोपींना सोबत घेत थेट मध्य प्रदेश गाठले. त्या ठिकाणी त्यांनी उत्तमसिंग टकराना याचा शोध सुरू केला. यात तो सिंगुर येथून सेलदालकडे जाणाऱ्या मार्गावर टोळी विरोधी पथकाच्या हाती आला. त्यावरुन या पथकाने त्याला ताब्यात घेऊन यवतमाळ गाठले. या ठिकाणी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली. उर्वरीत दोन आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. 
 
आता मध्यप्रदेशातून अटक केलेल्या या आरोपीने आणखी काही पीस्टल यवतमाळ जिल्ह्यात दिले असण्याची शक्यता पोलिस पथकाकडून वर्तविण्यात येत आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात टोळी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत गीते, पोलिस उपनिरीक्षक संतोष मनवर, जमादार ऋषी ठाकुर, संजय दुबे, गजानन धात्रक, किरण पडघण, अमोल चौधरी, विनोद राठोड, बंडु मेश्राम, गणेश देवतळे, योगेश गटलेवार, किरण श्रीरामे, आशिष रामटेके, जयन्त शेंडे, सुरज गजभीये, आकाश मसनकर,राजकुमार कांबळे यांच्या पथकाने पार पाडली. 
 
बातम्या आणखी आहेत...