आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती शहरातील सर्व हुक्का पार्लर बंदचे आदेश, ...तर नोंदणी रद्द होईल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीपींना मोबाईल क्लिप दाखवताना बजंरग दलाचे कार्यकर्ते. - Divya Marathi
सीपींना मोबाईल क्लिप दाखवताना बजंरग दलाचे कार्यकर्ते.
 अमरावती - शहरातील बसस्थानक मार्गावरील ‘अड्डा २७’ या हुक्का पार्लरवर पोलिसांनी सोमवारी (दि. ९) रात्री धाड टाकल्यानंतर पार्लर संचालकाने आपल्याकडे पार्लर चालविण्याचा परवाना असल्याचे सांगितले. याबाबतची सत्यता जाणून घेण्यासाठी पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. दरम्यान,शहरातील सर्व हुक्का पार्लर बंद करण्याच्या मागणीसाठी बजरंग दलाने गुरूवारी (दि. ११) पोलिस आयुक्तांना निवेदन देऊन एका हुक्का पार्लरमधील ‘धांगडधिंगा’ची व्हीडीओ क्लीप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस आयुक्तांना दाखवली. या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस आयुक्तांनी शहरातील सर्वच हुक्का पार्लर बंद करण्याचे आदेश गुरूवारी (दि. ११) दिले आहेत. तर या हुक्का पार्लरला परवानगी आहे किंवा नाही, त्याचा तपास जलद गतीने पूर्ण करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले आहेत.
 
शहरात मागील काही दिवसांपासून ‘अड्डा - २७’, मधुरम, कसबा, हॉट स्पॉट कॅफे आणि वाय फाय कॅफे या चार ठिकाणी हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती बजरंग दलाने सीपींना दिली. तत्पुर्वी एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो शहरातील एका हुक्का पार्लरमधील असल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळेच सोमवारी पोलिस आयुक्तांनी शहरातील सर्वच हुक्का पार्लरची झाडाझडती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशावरून सोमवारी पोलिसांनी बसस्थानक मार्गावरील ‘अड्डा - २७’ वर धाड टाकली. त्यावेळी पोलिसांनी त्याठिकाणी कागदपत्रांची तपासणी केली, यावेळी कामगार आयुक्तांकडील नोंदणीचा कागद, तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा कागद पार्लर संचालकांने पोलिसांना दिले हीच परवानगी असल्याचे सांगितले. या संचालकाचे म्हणणे एेकून संबधित पोलिस कारवाई करताच महापालिकेची परवानगी आहे, असे सांगत बाहेर पडले. दुसऱ्या दिवशी मात्र पोलिस आयुक्तांनी या प्रकरणात स्वत: लक्ष घालून परवानगी कोणाची याबाबत तपास करण्याचे आदेश दिले मात्र गुरूवारी सांयकाळपर्यंत या हुक्का पार्लरला असलेल्या परवानगी नेमक्या कुणाच्या हे मात्र पुढे आले नव्हते. दुसरीकडे मात्र पोलिस आयुक्तांनी निर्णय कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी शहरातील सर्व हुक्का पार्लर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस आयुक्तांनी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्याकडे सोपवला आहे. 
 
तुर्तास हुक्का पार्लर बंदचे दिले आदेेश 
- शहरातील हुक्कापार्लर परवानगीचा तपास सुरू केला आहे. तुर्तास परवाना नसल्याचेच पुढे आले आहे. त्यामुळेसर्व हुक्का पार्लर बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
दत्तात्रय मंडलिक,पोलिस आयुक्त,अम. 
 
तर नोंदणी रद्द होईल 
- इतर व्यावसायिकांप्रमाणे हुक्का पार्लर व्यवसाय करणाऱ्यांनीही सुद्धा आमच्या कार्यालयाकडे नोंदणी केली. नोंदणीच्या वेळी तसे प्रमाणपत्र आम्ही देतो, तो परवाना नाही. मात्र तो परवाना असल्याचे कुणी सांगत असेल तर ते चुकीचे आहे. दरम्यान शहरातील सर्व हुक्का पार्लरच्या नोंदणी आम्ही तातडीने रद्द करणार आहोत.
डी.बी. जाधव, सरकारी कामगार अधिकारी,कामगार आयुक्त कार्यालय. 
बातम्या आणखी आहेत...