आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात वाढले अवैध व्यवसाय, अवैध धंद्यांमुळे अनेकांचे कुटुंब होतेय उद्ध्वस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - गेल्या काही वर्षात तरुणाईमध्ये वाढत असलेल्या कमी गुंतवनुक करुन जास्त नफा कमावण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्याकडे अनेक तरूणांचा कल वाढला आहे. त्याचाच फायदा घेत शहरात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे़. अशा धंद्याकडे तरूणां वाढलेला कल आणि पोलिस विभागाकडून त्याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणु मोकळे रानच मिळाले आहे. शहरातील विविध भागात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे आता शहरातील अवैध धंद्यांना पोलिसांनी ‘एनओसी’च दिली की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित केल्या जात आहे. 
 
बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर शहरासह ग्रामीण भागातील तरूण कमी गुंतवणुकीचा व्यवसाय म्हणुन पाणठेला, चहाची टपरी अशा व्यवसायाकडे वळत होते. मात्र, आता कमी गुंतवणुकीत जादा नफा कमावण्याच्या नादात दारूविक्री, सट्टा पट्टी, जुगार, मटका अशा अवैध धंद्याकडे त्यांचा कल वळल्याचे दिसून येत आहे. पान ठेला किंवा चहा टपरीच्या माध्यमातून दहा वर्षांत जेवढा पैसा कमावता येणार नाही, तेवढा पैसा अवैध धंद्यात केवळ दोन ते तीन वर्षांत कमावता येतो असा त्यांचा समज आहे. त्यामुळे अधिक पैसा कमावण्याच्या लालसेनेच जिल्हाभर दारूचा व्यवसाय गृह उद्योग तर सट्टा पट्टी उदरनिर्वाहाचे साधन झाले आहे. तरूणांनी सट्टा पट्टीला स्वत:च्या उदरनिर्वाहाचे साधन बनविले आहे. घरून पाहिजे तेवढा पॉकेटमनी मिळू शकत नाही, घरून मिळालेल्या पॉकेटमनी मध्ये तरूणांच्या गरजा भागू शकत नाहीत़, यावर तरुणांनी उपाय शोधला असून, सट्टा पट्टीवर पैसा लावून जादा पैसा कमावण्यात तरूण लागले आहेत. सट्टा पट्टीवर तरूणांना सव्वा रूपयात शंभर रूपये मिळविता येत आहेत. क्रमांकाच्या अंदाजावर आकडेमोड करून सट्ट्याचे गणित मांडल्या जात आहे. तरुणांसोबत शासकीय सेवेतील कर्मचारी देखील सट्ट्याच्या आहारी गेले आहेत. मात्र या नादात पैसा मिळवण्यापेक्षा गमावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यातुनच कर्जबाजारीपणा आणि नशेच्या आहारी जाणारे तरुण अनपेक्षितपणे गुन्हेगारी कडेही वळत आहे. 
 
या सट्टा पट्टीच्या नादी लागुण कित्येक तरुण दिवसभर आकडे मोडीच्या गणिताचा अभ्यास करीत असतात. शहरात कित्येक सट्टा पट्टी दलालांनी पट्टी घेण्याचे कार्यालय लावलेले आहे. या अवैध धंद्यांनी कित्येक कुटुंब उद्ध्वस्त केले आहेत. तरीही या धंद्याच्या नादी लागणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. या व्यवसायाबद्दल आरडाओरड झाल्यास काही दिवसांसाठी हे व्यवसाय छुप्या पद्धतीने चालविण्यात येतात. त्यानंतर मात्र, परिस्थिती जैसे थे असते. यवतमाळ शहर पोलिस स्टेशन, वडगाव रोड पोलिस स्टेशन, लोहारा पोलिस स्टेशन आणि यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशन या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत खुलेआम सट्टापट्टीसह इतर अवैध व्यवसाय सुरू आहे. मात्र असे असतानाही या पोलिस ठाण्याकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आता जिल्हा पोलिस अधीक्षक यांनीच या गंभीर बाबीकडे लक्ष
पुरवावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 
 
जबरी चोरी, तीन दिवसात तीन घटना 
वडगाव रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कृषी नगरात गजानन महाराज मंदिरातून घरी येत असलेल्या महिलेच्या गळ्यातील १५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र किंमत ३५ हजार रूपये जबरीने हिसकावण्यात आले. ही घटना शुक्रवार, दि. १० फेब्रुवारी रोजी घडली. त्यानंतर रविवारी रात्री वाजताच्या सुमारास नवप्रभात कॉलनीतील एका महिलेच्या गळ्यातील पाच ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र लंपास करण्यात आले. या घटनेला तीन दिवस पूर्ण होत नाही, तर बापट चौक परिसरात एका बँकेच्या महिला प्रतिनिधीला मारहाण करून तिच्या जवळील २७ हजार २६० रुपयाची रोख लंपास करण्यात आली. या तीनही घटना अज्ञात दुचाकीस्वारांकडून करण्यात आल्या. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. मात्र, चोरटे अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाही. 
 
मासिक टार्गेटमध्ये चेल्याचपाट्यावर कारवाई 
अवैध धंद्याबाबतची कल्पना पोलिस प्रशासनाला आहे. असे असताना अवैध धंद्यावर ‘मासिक टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी धाड टाकण्यात येते. या धाडीत पैसा, ‘चेल्याचपाट्या’ ला ताब्यात घेवून पोलिस कारवाईचा आव आणतात. त्यातून सर्व‘आलबेल’ असल्याचे भासवले जाते. प्रत्यक्षात मात्र, पोलिसांचे अवैध व्यावसायिकांशी संबंध हे त्यांना धंदा सुरू ठेवु देण्यासाठीच असल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे. 
 
अवैध धंद्यावर कारवाया सुरूच 
शहरात अवैधरित्याव्यवसाय करणाऱ्यांवर कारवाया करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अवैध जुगार, अवैध दारू विक्री आणि दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर आमची करडी नजर असून यांच्याविरुध्द मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. त्या व्यतीरीक्त नागरिकांना तक्रारी असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा. त्यावर कारवाई करण्यात येईल.
’’ पीयुषजगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी, यवतमाळ. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...