आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध दारु पकडण्यास गेलेल्या पोलिस पथकावर दगडफेक; एक पोलिस जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अवैध दारु पकडण्यासाठी पोलिस आयुक्तांनी महिनाभरापूर्वी एक विशेष पथक तयार केले आहे. या पथकाला मिळालेल्या माहितीवरून दोन अधिकारी १५ पोलिसांचे पथक शुक्रवारी (दि. ५) सकाळी फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील परिहारपुऱ्यात गेले होते. यावेळी अवैध दारु विक्रेत्याच्या घराच्या आजूबाजूच्या जवळपास ४० ते ५० जणांनी एकत्र येवून पोलिसांना धक्काबुक्की करत पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी परिसरातीलच काही नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दगडफेकीत एक पोलिस जखमी झाला आहे. 

दगडफेकीमुळे पथकातील पोलिस स्वत:चा जीव मुठीत धरुन दिसेल त्या रस्त्याने पळत सुटले होते. या प्रकरणी पोलिसांनी एका एसआरपीएफ जवानासह ४० ते ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. 

वडाळी भागात असलेल्या परिहारपुऱ्यातील संतोष मोहकार हा अवैध दारु विक्रेता असून यापूर्वीही अनेकदा पोलिसांनी त्याच्या विरुध्द कारवाई केलेल्या आहे. तडीपार, एमपीडीएसारख्या गंभीर कारवाई सुध्दा त्याच्याविरुध्द झालेल्या आहे. दरम्यान त्याच्याकडे अवैध दारु असल्याची माहीती मिळाल्यामुळे शुक्रवारी सकाळी पोलिस आयुक्तांचे विशेष पथक एपीआय उज्वल इंगोले यांच्या नेतृत्वात कारवाईसाठी गेले होते. या पथकात पीएसआय अमोल मुळे, एएसआय प्रकाश राठोड, विशाल वाकपांझर, विनोद भटकर, अमर कराळे, सचिन मोहोड, चेतन कराळे, आबीद शेख, इमरान सय्यद, बंटी कास्देकर, रवि लिखीतकर, जीवन मकेश्वर महिला पोलिस मीरा उईके, शोभा बेलसरे आणि दीपाली कारमोरे यांचा समावेश होता. 

संतोषने त्याच्याकडील दारु बाजूलाच राहणारा त्याचा भाऊ नंदलाल याच्या घरात लपवल्याची माहीती पथकाला होती. त्यामुळे पोलिसांनी घरात जाऊन झडती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या घरातील महिलेने पथकातील महिला पोलिसांसोबत शाब्दीक वाद घातला. त्याचवेळी दोन ते तीन पोलिस नंदलालच्या घरात वरच्या माळ्यावरील खोलीत दारुचा शोध घेण्यासाठी गेले होते. येथे नंदलाल यांचा भाचा एसआरपीएफचा पोलिस शिपाई मंगेश अशोक सरवरे हा बसला होता. त्याने पोलिसांना घरझडतीसाठी ‘सर्च वॉरन्ट’ आहे का, असे विचारुन झडती घेण्यासाठी विरोध केला. यावेळी पोलिसांसोबत त्याचा चांगलाच शाब्दिक वाद झाला. याचदरम्यान त्याने फोन लावून इतरांना बोलावल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्याच्यासाेबत वाद सुरूच असताना त्या घरात किमान २० ते २५ जणांनी पोलिसांना अक्षरश: घेरून घेतले होते. पोलिसांना अश्लील शिवीगाळ सुरू केली होती. या ठिकाणाहून आता स्वत:चा जीव वाचवून पळ काढण्याशिवाय पोलिसांसमोर पर्याय नव्हता, घराबाहेर असलेल्या पोलिसांना तर पळ काढने शक्य होते मात्र घरात असलेल्या पोलिसांना घरातून बाहेर येणेही कठीण झाले होते. 

दुसरीकडे घराच्या बाहेरही ३० ते ४० जणांचा जमाव जमला होता. घरात असलेल्या पोलिसांनी कसाबसा पळ काढला मिळेल त्या दिशेने वाट शोधली, त्यावेळी पोलिसांवर दगडफेक केली. या वेळी याच परिसरातील काही रहिवाशांनी दगडफेक करणाऱ्यांना आवरण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र तरीही पोलिसांच्या वारंवार कारवाईमुळे संतप्त झालेल्यांकडून पोलिसांवर दगडफेक सुरू होती. मात्र मध्यस्थी करणाऱ्यांमुळे या ठिकाणी कोणताही अप्रिय प्रकार घडला नसल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. 

यावेळी संकटातील पोलिस कुणी वडाळीच्या जंगलात पळाले तर कुणी खदान मार्गे एक्सप्रेस हायवेवर आले, कुणी सार्वजनिक शौचालयात दडले तर कुणी बांबु उद्यानात लपले, यामध्ये महिला पोलिसांची तर चांगलीच दमछाक झाली. या दगडफेकीत पोलिस पथकातील इम्रान सय्यद नामक पोलिस शिपाई जखमी झाला तर पीएसआय मुळे अन्य एका पोलिसाचा मोबाईल सुध्दा फोडण्याचा प्रयत्न यावेळी झाला होता. दोन अधिकारी १५ पोलिस असे १७ जणांचे पथक या घटनेनंतर वेगवेगळ्या दिशेने पळ काढून स्वत:चा जीव वाचवत होते. जवळपास एक तासानंतर हे सर्व पोलिस फ्रेजरपुरा ठाण्यात ज्याला जसे शक्य झाले तसे पोहोचले. अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकाराने शहर पोलिस दलात खळबळ उडाली. 

दरम्यान याची पोलिसांनी फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार दिली, तक्रारीवरून पोलिसांनी एसआरपीएफ जवान मंगेश सरवरेसह ४० ते ५० जणांविरुद्ध दंगल घडवणे, शासकिय कामात अडथळा निर्माण करून मारहाण, दगडफेक करणे, अश्लील शिवीगाळ करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांनी शुक्रवारी दुपारीच मंगेश सरवरेला ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे या प्रकरणात परिहार पुऱ्यातीलच महिलेने पोलिसांच्या विरोधात फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार दिली. पोलिस घरात आले, त्यांनी घरात येवून माझ्यासोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप करून तक्रार केली आहे. 

एसआरपीएफ समादेशकांना अहवाल 
या प्रकरणात एसआरपीएफ जवान मंगेश सरवरे याच्याविरुद्ध चिथावणी देण्याचा आरोप झाला. त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करून त्याला ताब्यातही घेतलेे. याचा अहवाल एसआरपीएफ समादेशकांना पाठवण्याची प्रक्रीया पोलिसांनी केली. मंगेश सरवरेविरुद्ध २०१३ मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांनी दिली आहे. 

दगडफेक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा 
अवैध दारु विक्रेत्या विरुध्द कारवाईसाठी गेलेल्या पथकावर दारु विक्रेत्याच्या परिसरातील ४० ते ५० जणांनी दगडफेक केली आहे. तसेच एका एसआरपीएफ जवानाने चिथावणी देण्याचा प्रकार केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या प्रकरणात त्या जवानासह ४० ते ५० जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
- दत्तात्रय मंडलिक, पोलिस आयुक्त. 
बातम्या आणखी आहेत...