आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुसद: लाचखोर कनिष्ठ सहायक ‘एसीबी’च्या जाळ्यात, पाणी वापर परवान्यासाठी हजारांची लाच भोवली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुसद येथे कारवाई दरम्यान अशी गर्दी झाली होती. - Divya Marathi
पुसद येथे कारवाई दरम्यान अशी गर्दी झाली होती.
पुसद - काकाच्या शेतीसाठी पाणी वापरण्याचा परवाना देण्यासाठी हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सिंचन विभागातील एका कनिष्ठ सहायकास रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई यवतमाळ येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवार, २० फेब्रुवारी रोजी दुपारी पुसद तहसील कार्यालय परिसरात केली. या कारवाईमुळे पुसद येथील तहसील कार्यालय परिसरामध्ये खळबळ उडाली होती. 
 
श्रीकृष्ण बोरखडे असे त्या लाचखोर कनिष्ठ सहायकाचे नाव असून, तो जिल्हा परिषद सिंचन उपविभाग पुसद येथे कार्यरत आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकृष्ण बोरखडे याच्याकडे आलेल्या तक्रारदारास पाणी वापर परवाना हवा होता. मात्र, त्याला काकाच्या शेतीसाठी साठवण तलावातील वापरण्याकरिता परवाना देण्यासाठी बोरखडे याने हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडे या संदर्भात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून एसीबीच्या पथकाने सोमवारी दुपारी सापळा रचला. 
या वेळी श्रीकृष्ण बोरखडेला तक्रारदाराकडून हजार रुपयांची लाच घेताना तहसील कार्यालय परिसरातील एका झेरॉक्स सेंटरजवळ एसीबीच्या पथकाने अटक केली. त्यानंतर त्याला यवतमाळ येथे घेऊन आले. ही कारवाई एसीबीचे पोलिस उपअधीक्षक एन. एस. तडवी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर, कर्मचारी रामेश्वर भेंडे, नीलेश पखाले, अनिल राजकुमार, किरण खेडकर आणि वसीम शेख यांच्या पथकाने केली. एसीबीच्या पथकाने लाचखोर कनिष्ठ सहायकास रंगेहात अटक केल्यानंतर सापळा लावलेल्या तहसील परिसरातील झेरॉक्स सेंटरसमाेर नागरिकांनी गर्दी केली होती. 
बातम्या आणखी आहेत...