आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यातील सात सिंचन प्रकल्पांना भरीव निधी, विदर्भाला सर्वाधिक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - येत्या शुक्रवारी (दि. १८ मार्च) सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात आगामी आर्थिक वर्षासाठी सिंचनासाठी सुमारे ७५०० कोटी रुपयांची तरतूद होण्याची शक्यता आहे. या अर्थसंकल्पात प्रथमच पंतप्रधान पॅकेजमधील सात प्रकल्पांवर भर दिला जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत त्यात किरकोळ वाढ असली तरी या वेळी प्रथमच निधी वाटपाच्या दृष्टीने राज्यातील पंतप्रधान पॅकेजमधील सात सिंचन प्रकल्पांवर भर राहणार आहे. या सात प्रकल्पांसाठी सुमारे २००० कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यात विदर्भातील निम्न वर्धा (४९५ कोटी), बावनथडी (११० कोटी) या प्रकल्पांसह खान्देशातील वाघूर, अक्कलपाडा, मराठवाड्यातील निम्न दुधना, कोकणातील तिल्हारी आणि नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर या प्रकल्पांचा समावेश आहे.
केंद्र सरकारने नुकतीच पंतप्रधान सिंचन योजना सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील या सात प्रकल्पांची निधीसाठी शिफारस करण्यात आली आहे. या प्रकल्पांमध्ये केंद्र सरकारचा वाटा नेमका किती राहणार, हे अद्याप निश्चित व्हायचे असल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे प्रगती उपक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: दर महिन्याला देशभरातील प्रकल्पांचा आढावा घेणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यपालांच्या निधीवाटपाच्या सूत्रानुसार सिंचनाच्या एकूण निधीपैकी विदर्भासाठी सर्वाधिक ३५०० कोटी रुपयांची तरतूद होण्याची शक्यता असून त्यातही सर्वाधिक तरतूद सिंचनाचा मोठा अनुशेष असलेल्या अमरावती विभागासाठी अपेक्षित आहे. त्याखालोखाल उर्वरित महाराष्ट्र आणि नंतर मराठवाडा या क्रमाने निधीचे आकडे राहतील. पूर्व विदर्भातील गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी स्वतंत्रपणे सुमारे १००० कोटींची तरतूद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
विदर्भातील १४ प्रकल्प पूर्ण करणार
आगामी वर्षात विदर्भातील १४ प्रकल्प पूर्ण करण्याचे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे प्रयत्न आहेत. तर ३१ प्रकल्पांची घळभरणी (२५ अमरावती व ६ नागपूर विभाग) अपेक्षित आहे. त्यातून सुमारे ३८ हजार हेक्टर क्षेत्रात सिंचनाखाली आणण्याचे प्रयत्न राहतील, अशी अपेक्षा आहे.