आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडनेरातील दारू दुकानाचा समन्वयातून सुटणार तिढा, आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बडनेरा जुनी वस्ती भगतसिंग चौकातील देशी दारू दुकानाचा तिढा समन्वयातून सोडवला जाणार आहे. शेकडो महिलांनी बडनेरा पोलिस ठाण्यावर आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवार, २३ सप्टेंबर रोजी धडक दिली. पोलिस ठाण्यात दारू विक्रेता आणि आंदोलनकर्त्या महिलांसोबत झालेल्या बैठकीत दोन महिन्यात दारू दुकान स्थानांतर करणे तसेच स्टॅम्प पेपरवर लिहून घेण्यावर एकमत झाले. 
 
बडनेरा जुनी वस्ती भागात भगतसिंग चौकातील दारू दुकानांमुळे शेतकरी, शेतमजूर, मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक सर्वसामान्य नागरिकांची कुटुंब उद््ध्वस्त झाले. दिवसभर मोलमजुरी करून कमावलेले पैसे पुरुष दारूत गमावत असल्याने अनेक संसाराचे वाटोळे होत असल्याचे येथील चित्र आहे. युवक दारूच्या आहारी गेल्याने आई-वडिलांचे जगणे कठीण झाले होते. कमावलेले पैसे दारूच्या नशेत गेल्याने घरात नेहमीच वाद उद््भवत होते. त्यामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी रुद्रावतार धारण करत शुक्रवारी भगतसिंग चौकातील दारूच्या दुकानाला लक्ष्य केले. दुकानातील दारूच्या पेट्या बाहेर काढत बाटल्यांचा चुराडा केला. महिलांनी स्वत:हून दारू दुकानाला कुलूप ठोकले होते. मात्र दुसऱ्या दिवशी पोलिस संरक्षणात दारू दुकान सुरू होण्याची भीती असल्याने शेकडो महिलांनी आज सकाळी बडनेरा ठाण्यावर धडक दिली. 

या वेळी बडनेराचे ठाणेदार डी. एम. पाटील, दारू विक्रेते राजेश शालिकराम जयस्वाल आंदोलनकर्त्या महिलांसोबत बैठक घेण्यात आली. कोणत्याही स्थितीमध्ये भगतसिंग चौकात दारूचे दुकान सुरू होऊ देणार नसल्याचा पवित्रा महिलांनी घेतला. पोलिस निरीक्षक डी. एम. पाटील यांच्या समाेर महिलांनी समस्यांचा पाढाच वाचला. दारू प्राशन केल्यानंतर मद्यपी कशाप्रकारे धुमाकूळ घालतात, याची माहिती दिली. गांधी प्राथमिक शाळेत येणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींवर दारू दुकानामुळे कोणते संस्कार होणार, याबाबत महिलांचे म्हणणे होते. शाळा असल्याने दुकान हटवण्याची मागणी करण्यात आली. दारू दुकान हटवण्याबाबत यापूर्वी देखील न्यायालयीन लढाई लढण्यात आली. मात्र त्यानंतरही दारू दुकान कायम असल्याने हा तिढा समन्वयातून सोडवण्याची विनंती पोलिस निरीक्षक पाटील यांनी केली. महिलांच्या संतापापुढे नमते घेत दारू विक्रेता राजेश जयस्वाल याने दुकान स्थानांतर करणार असल्याचे सांगितले. मात्र, स्थानांतरणाची प्रक्रिया करण्यास वेळ मिळावा असे म्हणत दोन महिन्यांची मुदत मागितली. दोन महिन्यांची मुदत मिळेल, मात्र दोन महिन्यानंतर दुकान हटवले जाईल, असे स्टॅम्प पेपरवर लिहून देण्याची अट महिलांनी घातली. सुरुवातीचा एक महिना दुकान सुरू राहणार असून, नंतर एक महिना दुकान बंद ठेवले जाणार आहे. यादरम्यान दारू दुकान स्थानांतरण करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे जयस्वाल यांनी बैठकीत सांगितले. पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीला भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, भाजप शहराध्यक्ष जयंत डेहनकर, नगरसेविका गंगा अंभोरे, माजी नगरसेविका छाया अंबाडकर, माजी नगरसेवक विजय नागपुरे, किशोर अंबाडकर, नीळकंठ कात्रे, भाकपचे मोहन तायडे, भारिप बमसंचे अॅड. विश्वास भगत, शिवसेनेचे किरण अंबाडकर, शेतकरी संघटनेचे अरुण साकुरे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. 
 
भगतसिंग चौकातील दारू दुकानात तोडफोड केल्याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहे. न्यू स्वस्तिक नगर जवळील गणेश विहार येथील राजेश शालिकराम जयस्वाल यांच्या तक्रारीवरून नीलेश शंकरराव आजनकर यांच्यासह २० ते २५ महिलांविरोधात भादंविच्या १४३, ३२३, ४२७, ५़०४, ५०६ कलमान्वये गुन्हे दाखल केले. न्यायालयाच्या आदेशाने दुकान बंद होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने दुकान सुरू करण्यात आले. देशी दारूच्या पेट्या ट्रकमधून दुकानात उतरवण्यात आल्यानंतर ५० दारूच्या पेट्या फोडून एक लाखांचे नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 
 
मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे 
दारूविक्रेता तसेच आंदोलनकर्त्या महिला यांच्या दरम्यान तडजाेड व्हावी म्हणून बैठक घेण्यात आली. समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- डी. एम. पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक. 
बातम्या आणखी आहेत...