आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधीअभावी रखडला गायींना कृत्रिम गर्भदानाचा कार्यक्रम, यशाबद्दल साशंकता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - गाईचे दूध हे सर्वोत्कृष्ट आहार आहे. सकस व पौष्टिक दुधासाठी केंद्राने आणलेला गाईंचा कृत्रिम गर्भदान कार्यक्रम प्रतिसाद नसल्याने थंडावला आहे. या संदर्भात महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे सीईओ डाॅ. एच. डी. गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता अजून केंद्राकडूनच निधी न मिळाल्यामुळे कार्यक्रम रखडल्याचे स्पष्ट केले. एक तर निधी आलेला नाही. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांकडून या संबंधीची माहितीही अजून मिळालेली नसल्याने काहीच होऊ शकत नाही, असे डाॅ. गायकवाड यांनी सांगितले. आमचा डीपीआर तयार आहे. आम्ही केंद्राला ८२ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली आहे. शनिवार १७ ला पुन्हा बैठक आहे. या बैठकीत काही ना काही तोडगा निघेल, असे गायकवाड म्हणाले.

राष्ट्रीय कार्यक्रमातंर्गत २ आॅक्टोबर गांधी जयंतीला राज्यातील दहा हजार गाईंना कृत्रिम गर्भदान करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या नेमक्या ठिकाणी कार्यक्रम घेणार याची माहिती केंद्राने मागविली होती. स्थान निश्चिती झाल्यानंतरच निधी देण्यात येईल, हे केंद्राने स्पष्ट केले होते. आॅगस्टच्या अखेरीस ही माहिती पाठवणे अपेक्षित होते. मात्र जिल्हा पशुवैद्यकीय कार्यालयांकडून या संबंधीची माहितीच अद्याप पाठविलेली नाही. आम्हाला या कार्यक्रमाबाबत स्पष्ट निर्देश व माहिती आलेली नसल्याचे नागपूरचे प्रादेशिक सह आयुक्त डाॅ. अनिल एस. कुंभारे यांनी सांगितले. शुद्ध देशी व गावरान गाईंना एकाच दिवशी माजावर आणून कृत्रिम गर्भदान करण्याचा हा कार्यक्रम आहे. यासाठी देशात दोन लाख तर राज्यासाठी दहा हजार गाईंचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र धिम्या गतीने सुरू असलेल्या कामामुळे कार्यक्रमाच्या यशाबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. ५ सप्टेंबरला दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील अधिकाऱ्यांची केंद्राने चांगलीच कानउघाडणी केली. मात्र गणेशोत्सव, महालक्ष्मी तसेच ईदच्या सुट्यांमुळे ग्रामीण भागातून माहिती संकलित होऊ शकली नाही, असे कारण सांगून अधिकाऱ्यांनी सुटका करून घेतल्याचे समजते.
बातम्या आणखी आहेत...