आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिस्त, कार्यक्षमता,वचक त्यासाठीच प्रादेशिक पथक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ग्राहकांनी कितीही तत्परता दाखवित विजेचे बिल भरले तरी नेहमीच थकबाकी, वीजचोरी, नुकसानीची ओरड होत असते. नेमके नुकसान कोणामुळे होते. यामागील कारण काय, याचा शोध घेण्यासाठी आता महावितरणने कंबर कसली असून, कार्यालयीन शिस्त वाढवण्यासोबतच वीज चाेरी पकडण्यासाठी जो स्क्वाॅड काम करतो अशा सर्वांवरच वचक ठेवण्यासाठी अन् कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रादेशिक पथकाची नियुक्ती करण्यात आली अाहे. हे पथक गोपनीय पद्धतीने काम करणार असून कोणतीही सूचना देता विशेष मोहिमेंतर्गत कार्यालयीन कामचुकार, गैरप्रकारांसह बड्या ग्राहकांवर धडक कारवाई करणार असल्याची माहिती महावितरणच्या उच्चपदस्थ सुत्राने नाव छापण्याच्या अटीवर दिली आहे. नाव जर छापले तर कार्यालयातील गैरप्रकार उजेडात येणार नाहीत अन् यात गोपनीयताही राहणार नाही, असे या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. 
 
या मोहिमेंतर्गत विदर्भातील कोणत्याही ठिकाणी जसे जिल्हा, विभाग, उप-विभाग, केंद्र, उपकेंद्र कार्यालयांवर नागपुरातील प्रादेशिक कार्यालयाचे अधिकारी विशेष मोहिमेंतर्गत धाडी घालून जागीच कारवाई करणार आहेत. 
 
कार्यालयांमध्ये सुटीचा अर्ज देता अनेक जण गैरहजर राहतात किंवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कार्यालयात येतात. पूर्ण वेळ काम करीत नाहीत. अशांचा स्थानिक कार्यालयातील दबदबा बघून कोणी त्यांना अडवितही नाहीत. अशा कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हा स्क्वाॅड जागीच कठोर कारवाई करणार आहे. दंडापासून ते निलंबनापर्यंत अशी ही कारवाई असू शकते, असे या उच्च पदस्थ सुत्राने सांगितले. 

यासोबतच कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी कार्यालयांना आकस्मिक भेटी देणे, वीज बिलापोटी ग्राहकांकडून भरणा झालेल्या पावत्यांची संख्या तपासणे, त्यात घोळ दिसल्यास संबंधितांना विचारणा करणे, ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण किती वेगाने झाले याची माहिती घेणे, त्यासंदर्भातील नोंदी तपासणे, थकबाकीदारांचा पुरवठा खंडित केला की नाही याची माहिती घेत जर केला नसेल तर का करण्यात आला नाही, अशा प्रकरणांमध्ये संबंधिक कर्मचाऱ्यांनी गैरप्रकार तर केला नाही ना याचा मागोवा घेणे, मुख्यालयात वास्तव्य असताना मोठे अधिकारी, अभियंता किती वेळ कामावर हजर होते, दौऱ्यावर गेले की खासगी कामासाठी फिरताहेत याचा आढावा घेणे, ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकांची नोंदणी करण्यात आली की नाही, जर नोंदणी करण्यात आली तर त्यांना कोणकोणते संदेश पाठवण्यात आले. कशी सेवा पुरवण्यात आली. त्यांची नोंदणी आणि वसुली याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष आहे की नाही याकडेही प्रादेशिक स्क्वाॅडचे पूर्ण लक्ष राहणार आहे. 

यंदा वादळी पावसाचा फटका महावितरणसह ग्राहकांना बसला. अनेक ग्राहकांना रात्र, रात्रभर अंधारात अन् त्रास सहन करीत जागावे लागले. यासंदर्भात अनेक तक्रारी आल्या. ट्रान्सफाॅर्मर खराब झाले. तांत्रिक दोष वगळता दिरंगाई, कामचुकारपणा करणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी या विशेष पथकाची नियुक्ती करण्याचा निर्णय प्रादेशिक कार्यालयाने घेतला आहे. 

संशयास्पदग्राहकांची करणार तपासणी : नियमितवीज बिल भरणारे, जास्त वीज वापर असतानाही कमी बिल भरणारे, मीटर नादुरुस्तीची तक्रार असतानाही अशा प्रकरणी कारवाई झालेले, लाखो रुपयांचे वीज बिल थकित असलेले, फ्लॅट, भाड्याने दिलेली घरे, एकाच मीटरवर अनेक जोडण्या अशा संशयित ग्राहकांची प्रादेशिक स्क्वाॅड जातीने तपासणी करून तांत्रिक दोष आढळले तर लगेच थकित रक्कम भरायला लावणार, परंतु, मुद्दामच कोणीही कारवाई करण्यात आली नसेल तर या प्रकरणी जे महावितरणचे अधिकारी, कर्मचारी दोषी आहेत, 
त्यांच्याविरुद्ध कारवाईसाठी मुख्यालयाला कळवणार, संशयास्पद ग्राहकांचा मंजुर भार तो वापरतो किती याची तपासणी करणार. यामुळे मोठ्या प्रमाणावर वीज बिलाची वसुली होऊन पारदर्शकता वाढेल असे मतही उच्च पदस्थ अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे. 

बड्या ग्राहकांकडे देणार विशेष लक्ष 
साधारणत:५०० ते तीन-चार हजार रु.पर्यंतचे बील ग्राहक नियमितपणे भरीत असतात. त्यांनी जर एखादवेळी काही कारणास्तव बील भरले नाही की लगेच त्यांचा पुरवठा खंडित केला जातो. मात्र हजारो रुपयांचे थकित बिल ज्यांच्याकडे आहे, त्यांच्यावर फारशी कारवाई होताना दिसत नाही. अशांना झुकते माप का दिले जाते याबाबत चौकशी करण्याच्या उद्देशाने प्रादेशिक स्क्वाॅड बडे ग्राहक जसे पेट्रोल पंप, माॅल्स, हाॅटेल्स, लहान-मोठी दुकाने आणि संशयीत ग्राहकांची तपासणी करणार आहेत. 

या कारणांमुळे विशेष स्क्वाॅडची स्थापना 
सतर्कता स्क्वाॅड असूनही हवी तशी नुकसान भरपाई होत नसल्याचे महावितरणच्या लक्षात आल्यामुळे पाणी नेमके कुठे मुरत आहे, याचा शोध घेण्यासाठी, यासोबतच नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे महावितरणला कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. यात बहुतांश ठिकाणी झाडे तारांसह खांबांवर पडून नुकसान झाल्याचे चित्र होते. ज्यांना झाडे कापण्याचे काम देण्यात आले ते त्यांनी वेळेवर केले नसल्याने मोठी हानी झाली. अशा कामचुकार कर्मचाऱ्यांना नेमून दिलेली कामे वेळच्या वेळी का होत नाही याचाही शोध हे विशेष पथक घेणार अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...