आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्णबधिरांना आता चष्म्याने ऐकता येणार मनपसंत गाणी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जन्मत: किंवा पूर्णत: कर्णबधिर असलेल्या व्यक्तींना आता चष्म्याच्या साह्याने त्यांची आवडती गाणी ऐकता येणार आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने कर्णबधिरांना उपयोगी पडेल, अशी प्रतिकृती तयार केली आहे. अमरावती येथे झालेले जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन (इन्स्पायर्ड)मध्ये ‘कर्णबधिरांना ऐकण्यासाठी चष्मा’ या प्रतिकृतीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

कर्णबधिर व्यक्तींना आसपासचा आवाज ऐकू यावा, म्हणून वैद्यकीय क्षेत्रात विविध उपकरणांची निर्मिती केली आहे. मात्र, संगीताचा आनंद घेता यावा म्हणून विशिष्ट स्वरूपाचे उपकरण याला अपवाद होते. ही बाब हेरून नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील स्व. बबनराव वडनेरे शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित श्रीमती रुक्मिणीदेवी वडनेरे विद्यालयातील दहाव्या वर्गातील विद्यार्थिनी दीपाली घुगे हिने या प्रतिकृतीची निर्मिती केली आहे. चष्म्याला दोन्ही बाजूंनी डायनामो लावले आहे. दोन्ही डायनामो तांब्याच्या बारीक नळीने जोडले अाहेत, शिवाय डायनामोला सीडी प्लेअरचे वायर लावले आहेत.

सीडी प्लेअरमध्ये गाणे सुरू केल्यानंतर हा चष्मा लावल्यास स्पर्शाच्या साह्याने कर्णबधिर व्यक्तींना गाणे ऐकता येते. गाणे स्पष्ट ऐकू येण्यासाठी आवाजाची तीव्रता मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. संगीताचा आवाज आणि डायनामोची फ्रिक्वेन्सीचा ताळमेळ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रतिकृतीमध्ये जुळवला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने विज्ञान प्रदर्शनामध्ये अशा प्रकारची प्रतिकृती तयार करणे, हीदेखील गौरवाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया तज्ज्ञांनी दिली आहे.

आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारचे तंत्रज्ञान विकसित होण्याची अपेक्षा आहे. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडून मानवी समाजाच्या विकासासाठी उपयुक्त असे तंत्रज्ञान समोर आणण्याची बाब कौतुकास्पद आहे.
विशेष म्हणजे हे उपकरण कमी खर्चात तयार होत असल्याने याचा कर्णबधिर व्यक्तींना अधिक लाभ होण्याची आशादेखील दीपालीने व्यक्त केली आहे. या प्रतिकृतीची निर्मिती करताना दीपालीला शिक्षक राजेश भोकरे यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण विभागाच्या वतीने स्थानिक नारायणदास लढ्ढा हायस्कूलमध्ये ‘इन्स्पायर्ड’ हे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. जिल्ह्याच्या विविध भागांतून तब्बल १५० प्रयोग विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले.

कर्णबधिर चष्म्यासाठी साहित्य : दोन मोठे डायनामो, तांब्याची बारीक नळी, चष्मा, वायर, गाणे वाजवण्यासाठी सीडी प्लेअर

प्रतिकृतीचे फायदे
-या प्रतिकृतीचा उपयोग पूर्णत: किंवा अंशत: बहिरेपणा असणाऱ्यांना ऐकण्यास मदत होऊ शकते.
-मानवाला कोणतीही हानी होत नाही.
-ही प्रतिकृती कमीत कमी खर्चात तयार होते.
-मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी ही अमूल्य देण आहे. त्याआधारे अभ्यासही करता येणार