आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळघाटातील डाॅक्टरांची रिक्त पदे भरा, नागपुरात घेतला जिल्ह्यातील समस्यांचा आढावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - गतवर्षीच्या तुलनेत यंदा मेळघाटातील बालमृत्यूमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, मागील सात महिन्यांच्या कालावधीत ३१७ बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा आदिवासी बहुल भाग असलेल्या मेळघाटात आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी नागपुरात दिले. रिक्त पदे भरण्याचे सर्वाधिकार सध्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहेत. तसेच भुईखेड आणि शिरजगांव येथील डॉक्टरांची पदेही तातडीने आठवडाभरात भरण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनातील मंत्रिपरिषदेच्या सभागृहात अमरावती जिल्ह्याच्या समस्यांसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
मेळघाटातील आरोग्याच्या प्रश्नांवर गांभिर्याने चर्चा करताना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले की, मेळघाटात कनेक्टीव्हिटीचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा पुरेसा लाभ मिळत नाही. आदिवासी विकास विभागाने आपली पारंपरिक कार्यपद्धती बदलून नाविन्यपूर्ण योजना आखाव्यात आणि शासनाच्या योजनांचा लाभ मेळघाटात सर्वदूर कसे पोहोचेल याचे नियोजन करावे. शासनाकडून कोर एरियात(गाभा क्षेत्र) भरपूर निधी उपलब्ध करुन दिला आहे. विकास प्रकल्प राबविताना आपण गावाचे पुनर्वसन
करतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करताना तेथील नागरिकांना वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण आदी मुलभूत सुविधांना प्राधान्य द्यावे. त्याचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले.
जिल्ह्यातील योजनांचा घेतला आढावा : अमरावतीजिल्ह्यातील पुनर्वसनाची कामे, वॉररुममधील प्रकल्प, मेळघाटातील अतिदूर्गम भागातील विकासकामाचे नियोजन, मेळघाटातील आरोग्य विभागातील डॉक्टरांची रिक्त पदे,अपूर्ण सिंचन प्रकल्प, घरकुल योजना, संत्रा उत्पादित परिसरातील कृषी पंपांना वीजपुरवठा, शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप, पालकमंत्री पांदण रस्ते विकास योजना, नागपूर एक्स्प्रेस हायवे, मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र
अंतर्गत झालेले सामंजस्य करार, स्वच्छ महाराष्ट्र ग्रामीण शहरी अभियान आदी विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांना आणि योजनांना पुरेसा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सर्व महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.
सिंचनप्रकल्पांकरिता ३७८ कोटींची मागणी : जिल्हाबँका शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत अशा शेतकऱ्यांकडून तक्रारी आहेत. यासाठी लिड बँकेने पुढाकार घेऊन राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत शेतकऱ्यांना अधिकाधिक कर्जवाटप होईल याचे नियोजन करावे. संत्रा उत्पादित क्षेत्रात वीज पुरवठ्या अभावी शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी विद्युत विभागाने योग्य नियोजन करावे. नियमित विद्युत पुरवठ्यासाठी ट्रान्समिशनची कामे पूर्ण करावीत. अमरावती
जिल्ह्यातील सिंचनाच्या ३३ प्रकल्पांचा अनुशेष पूर्ण करण्यासाठी ३७८ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी बैठकीत दिली. यावेळी मागणीप्रमाणे अतिरिक्त निधी मंजूर करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जलयुक्त शिवार अभियान आणि धडक सिंचन विहिरी आणि मनरेगा अंतर्गत घेतलेल्या विहिरींमुळे जलसाठा वाढला आहे. या साठ्याचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यासाठी कालबद्ध आराखडा तयार करावा, पाणी वापर संस्था वाढवाव्यात, वरुड- मोर्शी
परिसरातील पाणी वापर संस्था फायद्यात असल्याची माहिती आहे. यासाठी नियोजन करावे. मार्च,२०१७ पर्यंत विहिरींचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जिल्ह्याधिकाऱ्यांच्या गतिमान कामकाजाचा गौरव :मेळघाटातील कुपोषणग्रस्त दुर्गम आणि अतिदूर्गम भागात तत्परतेने आरोग्य सेवा पुरविण्यासाठी डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यास सुरूवात झाली आहे. शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले आहेत. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनीही पुढाकार घेऊन, विशेष लक्ष देऊन मेळघाटात २८ डॉक्टरांची पदे तातडीने भरलीत त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांचा बैठकीत गौरव केला.
या बैठकीदरम्यान जिल्ह्यातील आमदारांनी आपापल्या मतदार संघातील आरोग्य इतर मूलभूत समस्यांकडे प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले. यांची होती उपस्थिती आढावा बैठकीला पालकमंत्री प्रवीण पोटे, जिल्ह्यातील आमदार डॉ.सुनील देशमुख, डॉ.अनिल बोंडे, प्रभुदास भिलावेकर, रमेश बुंदिले, अॅड. यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप, रवि राणा, बच्चू कडू , मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीय, सीएमचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, सचिव मिलिंद म्हैसकर, तसेच विविध विभागाचे प्रधान सचिव, विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता, जिल्हाधिकारी किरण गित्ते उपस्थित होते.
अाढावा बैठकीदरम्यान अमरावती जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाची माहिती देणाऱ्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...