आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरींना समजून घ्या; ते देशाशी इमान राखणारे, मीर नझीर यांचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मागील २२ वर्षांत दहशतवाद्यांनी माझ्या तिघा भावांना ठार मारले. या देशाशी ते इमान राखून होते, हाच काय त्यांचा गुन्हा होता. मलाही धमक्या येतच राहतात. आम्ही हिंमत हरलेलो नाही. जिस मुल्क का नमक खाते है, उससे बेईमानी कैसे कर सकते है?..मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे जम्मू-काश्मीर प्रदेशाचे अध्यक्ष मीर नझीर ‘दिव्य मराठी’शी बोलताना आपल्या भावना मांडत होते.

मंचाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्ताने मीर नझीर नागपुरात आले होते. नझीर २००२ पासून मंचचे काम करतात. ते म्हणाले, काश्मीर खोऱ्यातील लोकांबद्दल मोठ्या प्रमाणात गैरसमज असले, तरी तेथील ८५-९० टक्के जनता आजही भारतासोबतच आहे. मूठभर लोक हुरियत सारख्या संघटना, काही राजकीय पक्षांच्या अपप्रचाराला बळी पडून चुकीचा मार्ग पत्करतात. शिक्षित युवावर्गाकडून दगडफेकीच्या घटना घडतात. पण त्यांचा वापर करून घेतला जातो. बेरोजगारी ही मोठी समस्या.

हिंमत हरलेलो नाही, देशासाठी कायम लढू
नझीर म्हणाले, आमचे वडील सातत्याने या देशाशी इमान राखण्याची शिकवण द्यायचे… आप लोक हिंदुस्तान की तरफ जादा रुख करते है..असा आरोपच माझ्या भावंडांवर व्हायचा. १९९४मध्ये मोहम्मद रमझान, १९९८ मध्ये गुलाम अहमद आणि २००६ मध्ये अब्दुल रशीद या माझ्या तीन सख्ख्या भावंडांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले. एका रात्री तर दिवे गेल्याने कुटुंब बचावले, तीन भाऊ गमावल्याच्या वेदना आजही कायम आहेत. इतनी चोट खाके भी ये क्यो नहीं छोडता? अशा धमक्या येतात. पण आम्ही या देशासाठी कायम लढत राहू, असा विश्वास नझीर व्यक्त करतात.
...तर पुन्हा १९८९ ची परिस्थिती
जम्मू-काश्मीरमध्ये कुठल्याच राज्य सरकारने विकासाची कामे केली नाहीत. त्यामुळे आता तरी केंद्र तसेच राज्य सरकारने तेथील विकासावर लक्ष केंद्रित करायला हवे. नाही तर पुन्हा एकदा १९८९ सारखी परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, असा सावधगिरीचा सल्लाही नझीर यांनी दिला.