आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाणखी एका भाजप अामदारास शिक्षा, वीज कर्मचाऱ्याला मारहाणीचे प्रकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पांढरकवडा (जि. यवतमाळ) - वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन तेथील सहायक लेखापालास कॉलर पकडून धमकी दिल्याप्रकरणी पांढरकवडा-आर्णी मतदारसंघाचे भाजप अामदार राजू नारायण तोडसाम यांना केळापूर येथील न्यायालयाने तीन महिने कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. हा निर्णय सहदिवाणी न्यायाधीश व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एच. ए. वाणी यांनी शुक्रवारी सुनावला. महिनाभरापूर्वी विदर्भातीलच उमरेड येथील भाजप अामदाराला न्यायालयाने तीन महिने महिने शिक्षा ठाेठावली हाेती.
राजू तोडसाम हे १७ डिसेंबर २०१३ रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पांढरकवडा उपविभागाच्या कार्यालयात गेले होते. त्या ठिकाणी सहायक लेखापाल विलास आकोत हे मधल्या सुटीत कार्यालयात जेवण करीत होते. तोडसाम हे कार्यालयात वीज देयकाबाबत चाैकशीसाठी अाले असता त्या वेळी उपस्थित असलेले सहायक लेखापाल डी. डी. आडे यांनी त्यांना वीज देयकाबाबत संपूर्ण माहिती दिली. मात्र, त्यानंतरही तोडसाम यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा गाेंधळ सुरू असताना अाकाेत तिथे अाले असता ताेडसाम यांनी अाकाेत यांची काॅलर पकडून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे आकोत यांनी पांढरकवडा पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरून आमदार राजू तोडसाम यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३५३, २९३ व ५०६ नुसार गुन्हा नाेंदवण्यात अाला हाेता.
तर तोडसाम यांनीही आकोत यांच्याविरुद्ध पांढरकवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली हाेती. त्यावरून पाेलिसांनी आकोत यांच्याविरुद्ध अ. ज. जा कायद्यातील कलम क्र ३४०६/२०१३ कलम ३ (१)(१०) नुसार गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर पांढरकवडा पोलिसांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट केले. या प्रकरणात फिर्यादी पक्षाची बाजू सरकारी वकील पी. पी. गायकवाड यांनी मांडली.
दहा जणांच्या साक्षी
या प्रकरणाच्या सुनावणीनंतर तक्रारदार विलास आकोत यांच्यासह १० जणांच्या साक्षी ग्राह्य धरून सहदिवाणी न्यायाधीश व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एच. ए. वाणी यांनी आमदार राजू तोडसाम यांना ३ महिने कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दरम्यान, या प्रकरणी आमदार तोडसाम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
महिन्यापूर्वी आमदार सुधीर पारवे यांनाही शिक्षा
नागपूर - जिल्हा परिषद सदस्य असताना शिक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी महिनाभरापूर्वी नागपूर जिल्ह्यातील उमरेडचे भाजप आमदार सुधीर पारवे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. एका शिक्षकाबद्दल अनेक तक्रारी होत्या. संबंधित शिक्षकाला जाब विचारण्यासाठी गेले असता पारवे यांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप होता. आमदार पारवे यांनी या शिक्षेला जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिले असता तेथे शिक्षा कमी करून तीन महिने करण्यात आली. त्याविरोधात पारवे यांनी उच्च न्यायालयातून जामीन मिळवला आहे.