आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ: घनकचऱ्यावरून सभेत वादळ, विविध विषयांवरून नगर पालिका सदस्य आक्रमक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - येथील नगरपालिकेत नव्याने निवडून आलेल्या सदस्यांची कामकाजाच्या दृष्टीने पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी दुपारी पालिकेच्या सभागृहात झाली. मात्र, या सभेच्या अजेंड्यावर असलेल्या विषयांवरून पालिकेची ही पहिलीच सर्वसाधारण सभा वादळी ठरली. विशेष म्हणजे एरव्ही तास दीड तासांत आटोपणारी ही सभा आज चक्क चार ते पाच तास सुरू होती. 
 
नगरपालिकेत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींच्या निवड प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष कामकाजाची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या सुरुवातीलाच सभापतींनी आक्रमक पवित्रा घेत सभेचा अजेंडा तयार करताना सभापतींनी दिलेल्या विषयांना महत्व दिले नसल्याचा आरोप करत हा सभापतींचा अपमान असल्याचे सांगितले. त्यावरून सभेत वातावरण तापले होते. सभेच्या अजेंड्यावर असलेल्या विषयांमध्ये काही अनावश्यक विषयांचा समावेश करण्यात आल्याचे सांगत बांधकाम सभापती अमोल देशमुख, पालिका सदस्य प्रवीण प्रजापती यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले. या वेळी नियोजन सभापती सुजित राय यांनीही हे विषय रद्द करावे, अशी मागणी केली. त्यावरून पालिका मुख्याधिकारी यांनी सभेत हे विषय अजेंड्यावर घेतले ही चूक झाल्याचे मान्य केले. 
पालिकेची प्रशासकीय इमारत आणि नगर भवन यांना रंगरंगोटी करण्याचा प्रस्ताव सर्वानुमते रद्द ठरवण्यात आला. त्याऐवजी पालिका इमारतीत बैठकीसाठी सुसज्ज सभागृह आणि इतर मूलभूत सुविधा प्रथम तयार करण्याचे सुचवण्यात आले. घनकचरा व्यवस्थापनाकरिता नवीन जागा संपादित करण्याच्या विषयावरून शहरात निघणाऱ्या घनकचऱ्यावर योग्य प्रक्रिया करून त्यापासून उत्पन्न मिळवण्याचे प्रकल्प उभारावे आणि त्यासाठी अमृत शहर योजनेतून निधी उपलब्ध करून घ्यावा, अशा सूचना सदस्यांनी केल्या. याच घन कचऱ्याचा कंत्राट काढताना पालिकेकडे असलेले मनुष्यबळ आणि साधनसामग्री याचा पुरेपुर उपयोग आधी करण्यात यावा आणि त्यानंतर आवश्यक असलेल्या कामांसाठी कंत्राट काढण्याचे सुचवण्यात आले. कंत्राट काढताना त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात यावे, त्यावर योग्य नियंत्रण असावे, सर्व पालिका सदस्यांना समान कर्मचारी वाटप करून देण्यात यावे, असे मुद्दे सदस्यांनी मांडले. त्यावर आधी विचार करून अभ्यास करण्यात यावा आणि त्यानंतरच घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१७ उपविधीस मंजुरी द्यावी, असे सर्वानुमते ठरवण्यात आले. 

पालिका क्षेत्रातील मालमत्तांचे ड्रोन सर्वेक्षण करण्यास सर्वानुमते नकार देण्यात आला. हे सर्वेक्षण मॅन्युअलीच करण्याचे ठरवण्यात आले. पालिकेच्या हद्द वाढीचा मुद्दा, नव्याने समाविष्ट कर्मचाऱ्यांना समाविष्ट करण्याचा प्रस्ताव, करदात्यांना व्याज माफी देण्याचा प्रस्ताव असे काही विषय निरर्थक ठरवण्यात आले. पालिकेच्या शाळेची इमारत भाडे तत्वावर देण्याचा विषय नाकारण्यात आला. पालिकेच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या जागा आणि इमारती भाडे तत्वावर देता त्यात आपणच योग्य शाळा सुरू करू, असा प्रस्ताव या वेळी पालिका सदस्यांकडून पुढे आला. पथदिवे साहित्य खरेदी, दुरुस्ती आणि सुरू, बंद करण्याचा कंत्राट काढण्याआधी त्यासंदर्भात संपूर्ण अभ्यास करून निर्णय घ्यावा, असे सदस्यांच्या वतीने सुचवण्यात आले. त्यासोबतच पालिकेच्या दैनंदिन आणि आठवडी बाजाराची वसुली करण्याचे काम कंत्राट काढून करावे, असा निर्णय या सभेत घेण्यात आला. या सभेला नगराध्यक्ष कांचन चौधरी, उपाध्यक्ष सुभाष राय, मुख्याधिकारी सुदाम धुपे, सर्व सभापती आणि सदस्य उपस्थित होते. 

डेव्हलपमेंट चार्ज संदर्भात विशेष सभा : पालिकेतसमाविष्ट केलेल्या ग्रामपंचायतींच्या परिसरात असलेल्या ले-आऊट मध्ये बांधकाम परवानगी घेण्यासाठी अनेकांना डेव्हलपमेंट चार्ज आकारण्यात येत आहे. ले-आऊट मंजूर करताना केलेल्या अनागोंदीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. त्यामुळे या संदर्भात योग्य निर्णय घेण्यासाठी प्रशासनाने त्याचा अभ्यास करून एक विशेष सभा घेऊन हा प्रश्न निकाली काढावा, असे ठरवण्यात आले. 

वराहमुक्तीसाठी दिवसांचा अल्टिमेटम : शहरातसध्या मोकाट कुत्रे आणि डुकरांचा सुळसुळाट आहे. त्यामुळे याला आळा घालण्याचा प्रस्ताव सभेत मांडण्यात आला. त्यात कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणे या प्रस्तावावर कायद्यानुसार योग्य कारवाई करण्याचे ठरवण्यात आले, तर डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी वराह पालकांना नोटीस बजावून आठ दिवसांची मुदत द्या आणि त्यानंतर पालिका प्रशासनाकडून कठोर कारवाई करा असे सांगत शहर वराह मुक्त करण्याची मागणी सदस्यानी केली. 

पथदिवेबदली करण्याचा विचार : शहरातीलपथ दिव्यांचे साहित्य खरेदी आणि ते सुरू-बंद करण्याचा कंत्राट काढण्याचा विषय सभेत मांडण्यात आला. त्यावर मुख्याधिकारी यांनी काही विद्युत कंपन्या संपर्कात असून, शहरातील पथदिवे कमी व्हॅटचे लावून त्यांची देखभाल काही वर्षे मोफत करण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यावरून सदस्यांनी याची आधी योग्य माहिती घेण्यात यावी आणि त्यानंतर निर्णय घ्यावा, असा ठराव घेतला. 

शिक्षकांना देणार शाळेत १० विद्यार्थी आणण्याचे टार्गेट 
पालिकेच्या शाळेची इमारत भाडे तत्वावर देण्याच्या विषयावरून पालिकेच्या शाळांमधून घटती पटसंख्या हा विषय पुढे आला. त्यावर पालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्या आणि शाळेच्या शिक्षकांना प्रत्येकी १० विद्यार्थी शाळेत आणण्याचे टार्गेट द्यावे, टार्गेट पूर्ण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असा निर्णय या वेळी घेण्यात आला. 

दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचा प्रस्ताव मंजूर 
पालिकेच्या दोन विभागात कार्यरत दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यात बाजार विभागातील मसराम यांनी नव्याने समाविष्ट ग्रा.पं.च्या गाळ्यांचे परस्पर हस्तांतरण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी डाफ यांनी एका शिक्षिकेसोबत असभ्य वर्तन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...