आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर, गोंदियात भाजपला 7 नगराध्यक्षपदे, काटाेलमधील यशाने विदर्भवाद्यांच्या अाशा उंचावल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांतील ११ नगर परिषदांच्या निकालांमध्ये भाजपला संमिश्र यश मिळाले आहे. चार नगर परिषदांमध्ये स्पष्ट बहुमत तर सात नगराध्यक्षांच्या पदांवर भाजपने ताबा मिळवला आहे. नगर परिषदांचे निकाल नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री अनिल देशमुख, राजेंद्र मुळक, आमदार सुनील केदार या नेत्यांसाठी धक्का देणारे ठरले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहजिल्ह्यातील या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले होते. काल रविवारी मतदानानंतर सोमवारी लागलेल्या निकालांमध्ये भाजपला संमिश्र यश मिळाल्याचे दिसत आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक, उमरेड, सावनेर, खापा नगर परिषदेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून रामटेक, उमरेड, सावनेर, कळमेश्वर, खापा, गोंदिया, तिरोडा अशा सात नगर परिषदांच्या नगराध्यक्ष पदांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. यापैकी रामटेक नगर परिषद भाजपने शिवसेनेकडून तर उमरेड नगर परिषद काँग्रेसकडून खेचून आणली. रामटेकमध्ये १७ पैकी १३ जागांवर भाजपने यश मिळवले तर शिवसेनेला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. त्याचवेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कामठी नगर परिषदेत भाजपला मोठाच धक्का बसला आहे. काँग्रेसने ३२ पैकी १६ जागांवर विजय मिळवत कामठी नगर परिषदेवर ताबा मिळवला आहे. तर भाजपला ८ तर सहयोगी बहुजन रिपब्लिकन एकता मंचाला २ जागा मिळाल्या आहेत. काटोल नगर परिषदेत विदर्भ माझा पक्षाने बाजी मारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल देशमुख यांना धक्का बसला असून नरखेडमध्ये राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळवता आलेले नाही. सावनेरमध्ये सुनील केदार यांचा प्रभाव संपवून भाजपने बाजी मारली तर उमरेड नगर परिषदेवर १० वर्षानंतर ताबा मिळवून भाजपने माजी मंत्री राजेंद्र मुळक यांना जोरदार धक्का दिला आहे. गोंदिया आणि तिरोडा या दोन नगर परिषदांमध्ये नगराध्यक्ष पदांवर भाजपला ताबा मिळवता आला असला बहुमत मात्र मिळाले नाही. गोंदियात १८ जागा मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला तर काँग्रेसने ९ जागा जिंकून दुसरे स्थान मिळवले आहे. तिरोडा नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने १७ पैकी ९ जागा मिळवत बहुमत मिळवले असले तरी नगराध्यक्षांचे पद मात्र भाजपला मिळाले आहे.
 
शिवसेनेने रामटेक पालिका गमावली
रामटेक न. प.वरील शिवसेनेचे एकहाती वर्चस्व भाजपने मोडून काढत आपला झेंडा रोवला. बंडखोरीमुळे शिवसेनेला पराभवाचा फटका बसला असून शिवसेनेचे माजी आमदार आशिष जयस्वाल यांच्यापुढे या निकालाने राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केला आहे.
 
‘विदर्भ माझा’ चा उदय : विदर्भ राज्याची मागणी घेऊन लढणाऱ्या विदर्भ माझा या पक्षाचा काटोल नगर परिषदेतील उदय हे या निकालाचे 00 ठरले आहे. पूर्वी स्थानिक नेते चरणसिंह ठाकूर यांची कुंतलपूर विकास आघाडी आणि भाजप या आघाडीची काटोल नगर परिषदेवर सत्ता होती. मात्र, अलीकडेच चरणसिंह ठाकूर यांनी भाजपला दूर लोटत विदर्भ माझा पक्षात प्रवेश केला व या पक्षाच्या नावावर यश मिळवले.
 
मतदारांचा हात राखूनच कौल
पालिका निवडणुकांच्या चाैथ्या टप्प्यात नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील ११ नगर परिषदांच्या निवडणुकीत अनेक नगर परिषदांमध्ये सात ठिकाणी ‘कमळ’ फुलले असले तरी विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशाची पुनरावृत्ती करण्यात सत्ताधारी भाजपला अपयश आल्याचे मानले जाते.   

विदर्भातील यशाच्या जोरावरच भाजपने शिवसेनेच्या साथीने महाराष्ट्राची सत्ता काबीज केली. मात्र, नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजपला ती कामगिरी कायम राखता आलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गृह जिल्हा असल्याने नागपूर जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले होते. राज्याच्या इतर भागातील अनपेक्षित यशाने हुरळलेल्या भाजपकडून मोठ्या विजयाचे दावे सुरू होते. ते दावे निकालाने फोल ठरवले आहेत.   

रामटेक, उमरेड, सावनेर, खापा अशा चारच नगर परिषदांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमताचे यश मिळाले, तर रामटेक, उमरेड, सावनेर, कळमेश्वर, खापा, गोंदिया, तिरोडा अशा सात नगरपालिकांमधील नगराध्यक्षपदांवर भाजपने ताबा मिळवला. मात्र, कामठी, काटोल,नरखेड, कळमेश्वर,तिरोडा नगर परिषदांमध्ये भाजपची कामगिरी सुमार ठरली. त्यापैकी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे बलस्थान असलेल्या कामठी नगर परिषदेतील अपयश भाजपच्या चिंता वाढवणारे ठरले आहे. काटोल नगर परिषदेत विदर्भ माझा या विदर्भवादी पक्षाचे अनपेक्षित यश भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना आत्मपरीक्षण करायला लावणारे ठरले आहे, तर दुसरीकडे ते विदर्भवाद्यांच्या आशा उंचावणारे ठरले आहे. अर्थात, या ठिकाणी चरणसिंह ठाकूर यांच्यासारखा नेता लाभल्यानेच ‘विदर्भ माझा’ या स्थानिक अाघाडीला हे यश मिळाल्याचे मानले जाते. एकूणच हे निकाल मुख्यमंत्री फडणवीसांना फारसा दिलासा देणारे नाहीत, अशी भावना भाजपच्या वर्तुळात व्यक्त होत आहे.