आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात गडकरींच्या चिरेबंदी वाड्यावर निवडणुकीची ‘दंगल’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- निवडणुकीला अवकाश असल्याने उपराजधानी नागपूरच्या गल्लीबोळांमध्ये महापालिकेच्या रणधुमाळीचा माहौल अद्याप तयार झाला नसला तरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल परिसरातील वाड्याचा परिसर मात्र काही दिवसांपासून गजबजून गेलेला दिसताे. व्यापक जनसमर्थनाची छाप पाडण्यासाठी जास्तीत जास्त कार्यकर्ते सोबत घेऊन भाजप नेत्यांच्या वाड्यावर चकरा सुरू झाल्या अाहेत. त्या आटोपल्यावर आता उमेदवारीचा निकाल जाणून घेण्यासाठी वाड्यावर गर्दी होत आहे.
   
नागपूर महापालिकेची निवडणूक जवळ आली तरी शहरात कुठेही वातावरण दिसत नाही. उमेदवारांच्या याद्या पक्ष कार्यालयात फायनल होत नसल्याने भाजप आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांची कार्यालये सध्या ओस पडलेली आहेत. त्यातही काँग्रेसची यादी नागपुरात तयार होणार नसल्याने इच्छुक उमेदवार कार्यकर्त्यांसह मुंबईत तळ ठोकून आहेत, तर भाजपमधील इच्छुकांनी महाल परिसरातील गडकरी वाड्यावर गर्दी केली आहे. १५१ जागांसाठी तब्बल तीन हजार इच्छुक उमेदवारीच्या रिंगणात आहेत. ‘एक अनार, सौ बिमार’ अशा अवस्थेमुळे भाजपने अगदी अखेरच्या क्षणी यादी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
  
‘साहेब नागपुरात कधी दाखल होणार?’ याची माहिती घेऊन उमेदवारीसाठी इच्छुक नेते आणि कार्यकर्ते वाड्यावर गर्दी करत होते. आता उमेदवारीच्या निकालाची वेळ येऊन ठेपली असताना शेवटचा जोर लावण्याची स्पर्धा वाड्यावर रंगत आहे. ज्यांचे तिकीट पूर्वीच पक्के झाले अशांचे ऑनलाइन अर्जही तयार आहेत. केवळ पक्षाचे एबी फॉर्म जोडण्याची सोय तेवढी ठेवली गेली आहे. यादी फायनल करण्यासाठी गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाड्यावर पोहोचले. तेथे दोन तासांच्या बैठकीनंतर यादीला अंतिम स्वरूप देण्यात आले. दुपारनंतर फायनल झालेल्या उमेदवारांपैकी बहुतेकांना वाड्यावरूनच कामाला लागण्याचे निरोप देण्यात आले. त्याच वेळी पत्ता कट झालेल्या इच्छुकांना क्रमाक्रमाने बोलावून त्यांची समजूत घालण्याचा अध्याय  सुरू हाेता. गडकरी हे प्रत्येकाला वाड्यावरील खास खलबतखान्यात बोलावून समजूत घालत असल्याचे चित्र रात्री उशिरापर्यंत कायम होते.   

नेत्यांना एकच काळजी
भाजपची नागपुरातील यादी गुरुवारी सायंकाळपर्यंत तरी जाहीर झाली नव्हती. ती रात्री उशिरा किंवा उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच जाहीर होण्याची चर्चा सुरू होती. पत्ता कट झालेल्या नाराज इच्छुकांची नेमकी प्रतिक्रिया काय राहणार? या चिंतेने गडकरी-फडणवीस या नेत्यांना ग्रासलेले आहे. वाड्यापुढे नाराजांची निदर्शने होऊ नयेत, याचीच काळजी या नेत्यांना नागपुरात घ्यावी लागत आहे.
बातम्या आणखी आहेत...