आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात उन्हाचा फटका; मतदान 53 टक्क्यांपर्यंत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर   - मतदार याद्यांमधील घोळ, ईव्हीएममधील तांत्रिक बिघाडाचे काही प्रकार वगळता नागपूर महापालिकेसाठी शांततेत मतदान पार पडले. अत्यंत संथगतीने पार पडलेल्या मतदानामुळे उपराजधानीत मतदानाची टक्केवारी ५२ ते ५३ टक्क्यांच्या आसपास राहण्याचे संकेत मिळाले आहेत. गेल्या वेळी सरासरी ५२ टक्के मतदान झाले हाेते.  

निवडणुकीच्या प्रचारात राजकीय पक्षांमध्ये मोठी स्पर्धा दिसून आली असली तरी नागपुरात मतदारांमध्ये मात्र फारसा उत्साह दिसला नाही. सकाळच्या प्रहरात अनेक मतदान केंद्रांवर शुकशुकाट जाणवत होता. सकाळी दहानंतर मतदार किरकोळ संख्येने मतदान केंद्रावर पोहोचल्याचे दिसत होते. दुपारी बारानंतर मात्र काही प्रमाणात वेग आला.
 
दुपारी दीडपर्यंत नागपुरात केवळ सरासरी ३० टक्के मतदान झाल्याचे आढळून आले. दीड ते साडेतीन या दोन तासांत मतदानाला बऱ्यापैकी वेग येऊन टक्केवारी ४५.७२ टक्क्यांपर्यंत पोहोचली. दुपारी साडेतीननंतर अनेक केंद्रांवर मतदारांच्या छोट्या-छोट्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. मतदार याद्यांचा घोळ या वेळीही दिसून आला.  
 
शहरात सरासरीच्या तुलनेत तापमानही चार ते पाच अंशांनी वाढल्याने त्याचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाल्याचे मानले जात आहे. फेब्रुवारी महिन्यात नागपुरात सरासरी ३० ते ३१ अंश सेल्सियस तापमान राहते. मंगळवारी दुपारी तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सियस होते.  
 
हनुमाननगर मतदान केंद्रासह काही केंद्रांवर ईव्हीएम बंद पडल्याचे प्रकार घडल्याने मतदानात अडचणी निर्माण झाल्या होत्या. सायंकाळी पाचनंतरही अनेक केंद्रांवर रांगा कायम राहिल्याने मतदानाची प्रक्रिया बरीच रेंगाळली.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, माजी मंत्री विलास मुत्तेमवार या नेत्यांनी सकाळीच मतदान केले.
बातम्या आणखी आहेत...