आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेरॉल्डच्या भूखंडावर ११ मजली इमारत, वृत्तपत्र कचेरी, संशोधन केंद्राचा पत्ताच नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - काँग्रेसचे मुखपत्र असलेले नॅशनल हेरॉल्ड आणि कौमी एकता या वृत्तपत्रांची मालकी असलेल्या मे. असोसिएटेड जर्नल्स या कंपनीला मुंबईत अतिशय मोक्याच्या ठिकाणी वर्तमानपत्राच्या कार्यालयासाठी जमीन देण्यात आली होती. जमिनीची रक्कम कंपनीने वेळेत अदा न केल्याने झालेले २.७९ कोटींचे व्याज मागील सरकारने माफही केले होते. आता या जागेवर वर्तमानपत्राच्या कार्यालयाऐवजी आलिशान ११ मजली इमारतीचे काम सुरू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ही कंपनी गांधी कुटुंबीयांच्या मालकीची आहे.

राज्य शासनाने चार ऑगस्ट १९८३ रोजी मे. असोसिएटेड जर्नल्स या कंपनीला नॅशनल हेरॉल्ड आणि कौमी एकता वृत्तपत्र चालवण्यासाठी तसेच नेहरू मेमोरियल लायब्ररी व संशोधन केंद्र उभारण्यासाठी ४१८६ चौरस मीटर जमीन दिली. सदर जमीन १९६४ पासून मागासवर्गीय वसतिगृहासाठी मंजूर होती. तत्कालीन मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले यांनी सदर जमीन संचालक, समाजकल्याण यांच्याकडून काढून घेत गांधी कुटुंबीयांना आंदण दिली. कंपनीने या जागेवर वृत्तपत्र कचेरी, ग्रंथालय, संशोधन केंद्र यापैकी काहीही उभारले नाही. शासनाने ही जागा ३० वर्षांच्या लीजवर दिली होती. पण, काहीही वापर न करूनही लीज वाढवून मिळावे, अशी मागणी कंपनीने केली आणि शासनानेही लीज वाढवून दिले. १४ जून २०१३ रोजी मेसर्स असोसिएट जनरल कंपनीचे अध्यक्ष मोतीलाल वोरा यांना आरंभ प्रमाणपत्र (सीसी) जारी केले गेले. सदर जमीन विमानपत्तन प्राधिकरणाच्या सीमारेषेत येत असल्यामुळे पाच फेब्रुवारी २०१४ रोजी विमानपत्तन प्राधिकरणाने एनओसी दिली. एनओसीनंतर इमारत बांधण्याचे काम सुरू झाले असून तळमजल्यापासून अकराव्या मजल्यापर्यंत १४ कार्यालये असून कोठेही वर्तमानपत्राची कचेरी, ग्रंथालय, संशोधन केंद्राचा उल्लेख नाही. या जमिनीचे सध्याचे बाजारमूल्य २५० कोटी रुपये असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली.

अनिल गलगली यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दोनदा पत्र पाठवून याबाबत माहिती देऊन जमीन परत घेण्याची विनंती केली होती; परंतु शासनाने कोणतीही कारवाई केली नाही. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने तीन लाख २९ हजार ८४२ रुपये दंड आकारून संस्थेला बांधकाम पूर्ण करण्याची आणखी एक मुदतवाढ दिली आहे.
आणखी एक आदर्श ‘साईप्रसाद'
२००० मध्ये कंपनीला दिलेल्या भूखंडाच्या हद्दीत बदल करून पोटविभागणी करत एक जागा साईप्रसाद हाउसिंग संस्थेला देण्यात आली. या सोसायटीची स्थापना काँग्रेसचे नेते राजीव चव्हाण यांनी केली होती. माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह या सोसायटीचे सदस्य आहेत. मुंबई उपनगराचे पालकमंत्री असताना कृपाशंकर सिंह यांनी संस्थेवर कृपा केली होती. बांद्रा रेल्वेस्थानकापासून अगदी हाकेच्या अंतरावर आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला लागून ही जमीन आहे. या सोसायटीत केवळ कृपाशंकर सिंहच नव्हे, तर अनेक आयएएस आणि अन्य वरिष्ठ सनदी अधिकारी हे फ्लॅटधारक आहेत. सध्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, माहिती आयुक्त अजित जैन, माजी पालिका आयुक्त जयराज फाटक, वरिष्ठ पोलिस अधिकारी हिमांशु राय, बिपिन कुमार सिंह, मिलिंद शंभरकर, हेमंत कोटीकर, डॉ. अविनाश ढाकणे, किशोर गजभिये, जिल्हाधिकारी एस. संगीतराव यांचे भाऊ आणि मुलगी यांचे फ्लॅट या इमारतीत असल्याची माहिती अनिल गलगली यांनी दिली.