आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात गडकरी वाड्यासमाेर नाराजांचा संताप; संघाच्या प्रभागात निष्ठावंत उमेदवाराला डावलले(महाकौल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- नागपूर महापालिकेच्या १५१ जागांसाठी भाजपकडे तब्बल ३२०० इच्छुकांनी नाेंदणी केली हाेती. अखेर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने १४८ उमेदवारांची नावे जाहीर केल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले इतर उमेदवार मात्र नाराज झालेे. त्यापैकी काहींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाड्यासमाेर संताप व्यक्त करत बंडखाेरीचा इशारा दिला.  तसेच निष्ठावंतांना डावलल्याबद्दल गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जाबही विचारला. दरम्यान, भाजपच्या उमेदवारी यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या समर्थकांना झुकते माप देण्यात अाल्याचे दिसते. 
 
अनेक वर्षे विहिंप व बजरंग दलाचे काम करणारे श्रीकांत आगलावे वर्षभरापूर्वी भाजपत आले. संघ मुख्यालय असलेल्या महाल परिसरातील प्रभाग २२ मधून त्यांनी उमेदवारी मागितली हाेती, मात्र भाजपने त्यांना तिकीट नाकारल्याने अागलावे व त्यांचे समर्थक संतप्त झाले. अागलावेंवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी करत त्यांच्या समर्थकांनी गडकरी वाड्यासमाेर गाेंधळ घातला. इतकेच नव्हे, तर या प्रभागात पक्षाचा दुसरा उमेदवार निवडून येऊ देणार नाही, असा इशाराही दिला.

त्यामुळे या प्रभागात ‘संघ विरुद्ध भाजप’ लढत होण्याची शक्यता आहे. प्रभाग-१ मधून सिंधी समाजाच्या प्रमिला मथराणी यांना उमेदवारी दिल्यामुळे पक्षातील महिला कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रभाग-२४ मधून चेतना टांक यांना उमेदवारी दिल्याने प्रभागातील महिला कार्यकर्त्यांनी लादलेल्या उमेदवाराला पराभूत करू, असा इशारा पक्षाला दिला.  

भाजपमध्ये बंडखोरी
प्रभाग ३३ मधून भाजपने रमेश सिंगारे यांना उमेदवारी दिल्यानेही पक्ष कार्यकर्त्यांत संताप व्यक्त हाेत अाहे. सतत एकालाच उमेदवारी मिळत असून इतरांनी काय करायचे असा त्यांचा प्रश्न अाहे. ज्येष्ठ नेत्या उमाताई पिंपळकर व नगरसेविका सुमित्रा जाधव यांच्या नेतृत्वात नाराज कार्यकर्त्यांनी नितीन गडकरी यांच्याकडे राग व्यक्त केला. सिंगारेंविराेधात भाजप कार्यकर्ते  डॉ. अरविंद तलहा यांनी बंडखाेरी केली असून त्यांनाच निवडून अाणण्याचा निर्धार नाराज कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची डाेकेदुखी वाढली अाहे.

यांना मिळाले तिकीट   
मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मुन्ना यादव यांच्या पत्नी लक्ष्मी, माजी स्थायी समिती अध्यक्ष संदीप जोशी, आमदार परिणय फुके यांचे बंधू संकेते, मुख्यमंत्र्यांची निवडणूक यंत्रणा सांभाळणारे अविनाश ठाकरे यांंना तिकिटे देण्यात आली. महापौर प्रवीण दटके, बंडू राऊत, नरेंद्र बोरकर, दयाशंकर तिवारी, रवींद्र उर्फ छोटू भोयर, आमदार नाना श्यामकुळे यांची स्नुषा पल्लवीे, जगदीश ग्वालबंशी हे गडकरी समर्थक उमेदवारही यादीत अाहेत.

 
 
बातम्या आणखी आहेत...