आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाययोजना सुचवणार: ध्वनी प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी ‘नीरी’चा लवकरच व्यापक प्रकल्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नागपूर - महाराष्ट्र ध्वनी प्रदूषणमुक्त करण्याची जबाबदारी नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेला (नीरी) सोपवण्यात आली आहे. नीरीकडून लवकरच राज्यातील २७ प्रमुख शहरांमधील ध्वनी प्रदूषणाचे सर्वेक्षण हाती घेतले जाणार असून प्रदूषणमुक्तीसाठी उपाययोजना सुचवल्या जाणार आहेत.   

‘नीरी’चे संचालक डॉ. राकेशकुमार यांनी खास ‘दिव्य मराठी’शी बोलताना या प्रकल्पाबाबत माहिती दिली. राज्यातील वाढत्या ध्वनी प्रदूषणाकडे लक्ष वेधून गेल्यावर्षी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारचे कान उपटले होते. त्यानंतर राज्य शासनाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला अहवाल मागितला होता. मंडळाने राज्यातील २७ शहरांची निवड करून त्या शहरांमध्ये सुरुवातीला नेमक्या ध्वनी प्रदूषणाचे सर्वेक्षण हाती घेण्याची शिफारस केली. मंडळाच्या शिफारशीवरूनच नीरीकडे या संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नीरीचे क्लीनर टेक्नॉलॉजी आणि मॉडेलिंग डिव्हिजन यासाठी कामाला लागले आहे.    
 
नीरीच्या या विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. रितेश विजय यांनी सांगितले की, प्रदूषण नियंत्रण मंडळानेच २७ शहरांची निवड केली आहे. या शहरामध्ये प्रामुख्याने मुंबई, ठाणे, कल्याण, विरार, मिरा-भाईंदर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, नाशिक, सोलापूर, जळगाव, मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, लातूर, विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूरसह राज्यातील इतर काही शहरांचा समावेश करण्यात आला आहे. या २७ शहरांमध्ये सुरुवातीला नॉइज मॅपिंग आणि नॉइज पोल्युशनचे सर्वेक्षण टप्प्याटप्याने हाती घेतले जातील. ध्वनी प्रदूषणाचे मोजमाप करताना संबंधित शहरांचे आकारमानानुसार ४० ते ५० भाग पाडून या सर्व ठिकाणांवर नॉइज लेव्हल मीटर लावले जातील. त्यातून परिसरातील नेमक्या ध्वनी प्रदूषणाची स्थिती कळू शकणार आहे. दिवसाचे, रात्रीचे, कामकाजांच्या दिवसांचे ध्वनी प्रदूषणाचे आकडेही गोळा केले जातील, असे डॉ. विजय म्हणाले.
 
सार्वजनिक ठिकाणी नॉइज लेव्हल मीटर : रेल्वेस्थानक, बसस्थानक, महत्त्वाचे वर्दळीचे रस्ते, विमानतळ, औद्योगिक क्षेत्र, बाजारपेठा, महापालिकांचे शांतता झोन, शाळा व महाविद्यालयांचे परिसर अशा महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये नॉइज लेव्हल मीटर बसवले जाणार आहेत.  
 
आजारांना निमंत्रण : सतत ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक आजारांसह निद्रानाश, रक्तदाब, हृदयविकार अशा अनेक समस्या निर्माण होत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे निष्कर्ष आहेत.
 
ध्वनी प्रदूषणात अतिरिक्त २ ते ५ डेसिबलची भर
काही निवडक शहरांमधील वाढत्या ध्वनी प्रदूषणावर ‘नीरी’ने गेल्याच वर्षी अभ्यास करून अहवाल मांडला होता. शहरांमध्ये वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या मानकांच्या तुलनेत ध्वनी प्रदूषणावरची कमाल मर्यादा केव्हाच ओलांडली गेली असून वाहनांच्या हॉर्नमुळे ध्वनी प्रदूषणात अतिरिक्त २ ते ५ डेसिबलची भर पडत असल्याचा निष्कर्ष नीरीने अभ्यासातून काढला होता. देशभरात त्यावर काही प्रमाणात निर्बंध घालण्याची गरज असल्याची शिफारसही करण्यात आली होती.
बातम्या आणखी आहेत...