नागपूर - नोटाबंदीनंतर देशभरात सामान्य लोकांची झालेली अडचण काही प्रमाणात सध्या कमी झाली असली तरी अजूनही बँका आणि एटीएममधून काढावयाच्या रकमेवर मर्यादा कायम आहेत. त्यामुळे नोटाबंदीनंतरचा गोंधळ अजूनही पुरता संपलेला नाही. यावर पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) उपाय काढला असून बँकेने विदर्भात ७१ ‘बिझनेस करस्पाँडंट’ची नियुक्ती केली आहे. त्यापैकी २६ प्रतिनिधींजवळ ‘मायक्रो एटीएम’ देण्यात आले आहे.
अजूनही सामान्य लोकांची १०० आणि ५०० च्या नोटांची अडचण काही प्रमाणात कायम आहे. अजूनही पैसे काढायला बाहेर पडले की एटीएम सुरू आहे की नाही, हव्या त्या नोटा मिळतात की नाही, ही चिंता असतेच. शिवाय, या एटीएमवरून त्या एटीएमवर फिरण्याची पाळी कायम असते. पंजाब नॅशनल बँकेने यावर उपाय म्हणून आता चालते-बोलते ‘एटीएम’ देईल हव्या त्या नोटा!
एटीएमच तुमच्या जवळ आणले आहे. हे एटीएम तुमच्याजवळ आले की तुम्हाला किती रक्कम हवी, कुठल्या नोटा हव्यात ते करस्पॉंडंट विचारतात. तुमचे कार्ड स्वॅप करत ५०, १०० आणि ५००शेच्या नव्या, करकरीत नोटा तुमच्या हाती ठेऊन तुम्ही आभार मानण्याच्या आत हे मानवी ‘एटीएम’ दुसरा काॅल अटेंड करायला निघून गेलेले असते...
पंजाब नॅशनल बँकेने विदर्भात ७१ बिझनेस करस्पॉडंटपैकी २६ प्रतिनिधींजवळ ‘मायक्रो एटीएम’ आहे. शहरातील इंदोरा आणि स्टेशन मार्गावर दोन ‘मायक्रो एटीएम’धारक प्रतिनिधी सेवा देत आहेत. ग्राहक त्यांना फोन करून बोलावून घेतात. गर्दीतही हे प्रतिनिधी गरजू खातेदाराला अचूक ओळखतात आणि त्याची गरज भागवतात. ग्राहकांना ही सेवा नक्कीच आवडली आहे.
असे काम करते ‘मायक्रो एटीएम’
या मायक्रो एटीएमद्वारे पैसे मिळण्यासाठी ग्राहकाच्या खात्यात पैसे आणि एटीएम कार्ड अनिवार्य आहे. ग्राहकांनी रकमेचा आकडा सांगितल्यानंतर प्रतिनिधी संबंधित ग्राहकाचे एटीएम कार्ड मायक्रो एटीएममध्ये स्वाइप करतो. यानंतर ग्राहकांना केवळ एटीएम कोड टाकायचा असतो. एवढी प्रक्रिया होताच एका मिनिटातच करकरीत नोटा ग्राहकांना मिळतात.