आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारा लाखांचा संत्रा पावणे सहा लाखांत!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - केंद्राने हजार, पाचशे रुपयांच्या नोटाबंदीचे परिणाम सामान्य शेतकऱ्यांसाठी दूरगामी फायदा करणारे असले तरी सध्या मात्र हा निर्णय संत्रा उत्पादकांसाठी कंबरडे मोडणारा ठरला आहे. त्यामुळे नोटाबंदीच्या निर्णयापुर्वी सुमारे बारा लाख रुपयांना विकलेली बाग सध्या पावणे सहा लाख रुपयांत व्यवहार होऊनही व्यावसायिक अडचणीमुळे खरेदीदार तोडून नेत नसल्याने संत्रा उत्पादकांचे ठोके वाढले आहे.
भविष्यातील शेतमालाच्या लुटल्या जाणाऱ्या नफ्याला या निर्णयामुळे खीळ बसण्याची आशा निर्माण झाल्यामुळे घामाच्या लाखो रुपयांवर पाणी सोडून संत्रा उत्पादक शेतकरी नोटाबंदीबाबत मात्र सकारात्मक दिसून येत आहे. हजार पाचशे रुपयांच्या नोटाबंदीमुळे जनसामान्यांच्या व्यवहार करताना नाकीनऊ येत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. परंतु देशहित काळ्या पैशाला यामुळे आळा बसण्याची आशा शेतकऱ्यांमध्येही निर्माण झाल्याने होणारी ससेहोलपट सध्या शेतकरी सहन करीत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. एका दाण्याचे हजार दाणे करूनही शेतकऱ्यांचे दाण्याचेही मुद्दल निघत नसल्यामुळे शेतीव्यवसायाची दशा झाल्याचे वास्तव आहे. उर्वरित दाण्यांवर नफा कमावून बाजार व्यवस्थेतील अडते खरेदीदारांच्या प्रचंड तिजोऱ्या फुगल्या आहेत. परंतु नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतमालाचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर कमालीचे कायदेशीर निर्बंध आले आहे. त्यामुळे किमान आतापर्यंत शेतमालाचा लुबाडला जाणारा नफा भविष्यात शेतकऱ्यांच्या खिशात पडण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्यात इतर पिकांपेक्षा बागायत पट्ट्यातील संत्रा पीक शेतकऱ्यांची दशा पालटविणारे ठरले आहे. त्यामुळे चांदूर बाजार, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, मोर्शी, वरूड आदी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडे संत्र्याच्या व्यवहारातही प्रचंड लुबाडणूक होऊनही काही सुबत्ता आल्याचे दिसून येते. परंतु मागील दोन वर्षे प्रचंड संत्राचे उत्पादन होऊनही शेतकऱ्यांचा बागेवर केलेला खर्च निघू शकला नव्हता. दरम्यान, यावर्षी संत्र्याचे दर ४० हजार रुपये प्रति क्विंटल, १५०० रुपये प्रति कॅरेटवर गेल्यामुळे यावर्षी संत्रा शेतकऱ्यांचे अश्रू पुसणारा ठरणार होता. नोहेंबरपुर्वी दहा-बारा लाख रुपयांना खरेदीदारांनी मागितलेली बाग बहुतांश शेतकऱ्यांनी चढ्या दराच्या आशेने विकल्या नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी विकल्या त्यांचा चांगला फायदा झाला. परंतु नोटाबंदीच्या निर्णयापुर्वी मागीतलेल्या चढ्या दराच्या बागा सध्या चलनाचा तुटवडा, खरेदीदारांच्या व्यवहारावर आलेले निर्बंध, लाखो रुपये मिळणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारे योग्य आर्थिक मार्गदर्शन यामुळे संत्र्याचा बाजार कमालीचा कोसळला असून शेतकऱ्यांना निम्म्या किंमतीत बागा विकूनही खरेदीदार संत्रा तोडत नसल्यामुळे गंभीर संकट निर्माण झाले आहे.

संत्रा उत्पादकांसमोर पेच : ग्रामीणभागात संत्रा कापूस खरेदीदारांकडे खरेदीचा कोणताच परवाना नसतो. त्यातच दोन्ही शेतमाल बाजार समितीच्या यार्डात जाऊ शकत नसल्यामुळे कायदेशीर व्यवहार नोंदवण्याची सोय उपलब्ध नाही. त्यातच सध्या संत्रा खरेदीदार बागा खरेदी करताना धनादेश देण्यास तयार आहेत. परंतु खरेदीदार ओळखीचा नसल्यामुळे लाखो रुपयांचा धनादेश घेऊन तो बंॅकेत ‘क्लीयर’ झाल्यास दाद कुणाकडे मागावी असा पेच निर्माण झाला आहे. त्यातच खरेदीदार स्वत:च्या नावाने असलेल्या खात्याचा धनादेश देता भलत्याच खात्याचा धनादेश देत असून शेतकरी सदर धनादेश स्विकारण्यास नकार देत आहे. लाखो रुपयांचा व्यवहाराची नोटरी, रजिस्ट्री नोंदणी करण्यास व्यापाऱ्यांची ना असल्याने संत्रा उत्पादकांसमोर मोठे पेच निर्माण झाला आहे.

बागविकली पावणे सहा लाखात! :वणी येथील अमोल शेळके यांची चार एकरातील संत्राबाग नोटांबदीपुर्वी खरेदीदारांनी बारा लाख रुपयांना मागितली होती. परंतु बागेत संत्री अधिक असल्यामुळे शेळके यांनी बाग विक्रीस नकार दिला होता. दरम्यान, नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर खरेदीदारच फिरणे बंद झाले आहे. त्यातच एका व्यापाऱ्याला शेळके यांनी बाग लाख ७१ हजार रुपयांना विकली. खरेदीदाराने २० हजार रुपयांचे टोकन दिले असून अद्यापही तोडणी केल्यामुळे खरेदीदार बाग टाकून देतो की काय अशी भिती निर्माण झाली आहे. निर्णय चांगला असला तरी आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडला असल्याचे शेळके यांनी सांिगतले.
संत्र्यावरनियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान :जिल्ह्यातील संत्रा बाजारावर तालुक्यातील बाजार समित्यांचे कोणतेच नियंत्रण नाही. बाजार समित्या केवळ सेस वसुल करण्यासाठी नाके उभारून मोकळ्या झाल्या आहेत. शेतमाल असूनही संत्र्याचा कोणताच व्यवहार बाजार समितीच्या अखत्यारित होत नसल्यामुळे कायदेशीर दाद मागण्याची सोयही शेतकऱ्यांना नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसगत होत आहे.


व्यवसायाला फटका
^नोटाबंदीचाजबरफटका संत्रा व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे संत्र्याचे दर कमालीच घसरले आहेत. संत्र्याच्या व्यवहारातही मोठ्या अडचणी निर्माण झाल्याने या व्यवसायाला जबर फटका बसला आहे. नरेशपिंगे, व्यापारी, अंजनगाव सुर्जी.

चलन टंचाईचा परिणाम
^नोटाच्या चलनाची टंचाई निर्माण झाल्यामुळे संत्र्याच्या व्यवहार प्रभावीत झाले आहे. त्यामुळे संत्र्याचे दर कोसळले असून यात राजस्थानचा संत्रा आता बाजारात आल्यानेही बाजारपेठेवर परिणाम झाले आहेत. गिरीष कंधारी, व्यापारी, घाटलाडकी

सोळा लाखांचे झाले आठ लाख
माधान येथील दिनेश ढोक यांचा सात एकरातील बगीचा खरेदीदारांनी १२ लाखांना मागितला.परंतु बागेत संत्री अधिक असल्याने ढोक यांनी होणारा व्यवहार रद्द केला. परंतु नोटाबंदीनंतर ढोक यांना याच बागेची सहा लाख रुपयांत मागणी झाली. अखेर ढोक यांनी नोटाबंदीपुर्वी ३५ ते ४० हजार रुपये टन भाव असणारे संत्री २७ हजार रुपये प्रति टनाने विकली. त्यामुळे ढोक यांना केवळ आठ लाख रुपये मिळाले. सरकारचा निर्णय चांगला आहे. परंतु संत्रा उत्पादकांचे नुकसान झाल्याचे ढोक यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...