आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षाचे तिकिट मिळवण्यासाठी उमेदवारांची होतेय दमछाक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा - जिल्हापरिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तारखा जवळ येताच पक्षाच्या तसेच संभाव्य उमेदवारीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींसमोर शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केली आहे. पक्षाच तिकिट मिळाल्यास बंडखोरीची संकेतही उमेदवारांकडून देण्यात येत आहेत. जातीय समीकरणाची जुळवाजुळव करून मतदार संघातील कार्यकर्त्यांचा असलेला जनसंपर्क या सर्वांचा विचार करूनच उमेदवारी देण्याच्या मानसिकतेत पक्षश्रेष्ठी असल्याचे एकंदरीत चित्रावरून दिसून येत आहे. त्यामुळे हौसे गौसे नवसे उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
 
वैयक्तिक हितापोटी निवडणुकीसाठी पक्षांतर करणाऱ्या उमेदवारांची पक्षाकडे लांबच लांब यादी असून त्यात कुणाला उमेदवारी मिळणार या प्रश्नाचे उत्तर अद्यापही गुलदस्त्यात आहे. अचलपूर तालुक्यामध्ये पाच जिप सर्कल दहा पंचायत समिती गण आहेत. त्यामध्ये असदपूर जिप सर्कल हे खुल्या प्रवर्गासाठी असल्याने या ठिकाणी तालुक्यातीलच सर्वच उमेदवार कस लावणार आहेत. शिंदी जिप सर्कल अनुसूचित जमाती महिला वर्गासाठी राखीव आहे. परिणामी येथे हवा तो उत्साह दिसून येत नाही. तसेच पथ्रोट जिप सर्कल अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी सर्वसमावेशक उमेदवार निश्चित केल्याने या सर्कलमध्ये देखील सर्वत्र शांतताच पहायला मिळत आहे. कांडली जिप सर्कल ओबीसी महिलेसाठी राखीव झाले आहे. येथील मतदारांची संख्या पाहता हे गाव निर्णायक ठरणार आहे.
निवडणूक लढविण्याकरिता दिग्गजांनी चाचपणी केली आहे. मात्र येथे आपला निभाव लागणार नाही हे लक्षात येताच अनेकांनी आपला मोर्चा अन्यत्र वळवला आहे. बहुतेक उमेदवारांना निवडणुकीनंतर आपल्या आश्वासनांचा विसर पडलेला दिसतो. परिणामी मतदारसंघ विकासापासून दूरच राहिल्याने काम करणाऱ्या उमेदवारालाच मतदार प्राधान्य देतील, असे चित्र निर्माण झाले आहे. 

सर्वांचे लक्ष लागलेल्या धामणगाव गढी जिप सर्कलमध्ये उमेदवारांची भाऊगर्दी पाहता सर्कलच्या विकासापेक्षा उमेदवारांनी तिकीटसाठी जोर लावला आहे. बहुतेक इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या प्रचार कार्यालाही लागले आहेत. मात्र विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याबाबत थंडीतही शेकोटीभोवती गप्पा रंगताना दिसत आहेत. 

अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या १६६ गावांमधून १० पंचायत समिती जिल्हा परिषदेचे सदस्य निवडले जाणार आहे. त्याकरिता लाख ६७ हजार ३६४ लोकसंख्या असणाऱ्या संपूर्ण तालुक्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या ३३ हजार २१३ आहे, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या २३ हजार ३४७ आहे. सर्वाधिक लोकसंख्या ही कांडली सर्कलची असून सर्वाधिक कमी लोकसंख्या असदपूर सर्कलची आहे. 
बातम्या आणखी आहेत...