आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष: पोलिस वसाहतींची दयनीय अवस्था, देखभालीअभावी उदभवताहेत विविध समस्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - नागरिकांच्याजी वित्वाची आणि त्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडण्यासाठी २४ तास कर्तव्यावर दक्ष राहणाऱ्या पोलिसाच्या परिवाराची सुरक्षाच आता धोक्यात आली आहे. पोलिसांच्या शासकीय निवासस्थानांची दयनीय अवस्था झाल्यामुळे त्या ठिकाणी राहणाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 
 
पोलिसांचे काम हे आकस्मिक सेवेत मोडल्या जाते. त्यामुळे त्यांना २४ तास कर्तव्यावर हजर रहावे लागते. यात येणाऱ्या अडचणी पाहता पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना सोयीचे व्हावे म्हणून शहरातील पोलिस मुख्यालयाच्या मागील बाजूस आणि पळसवाडी परिसरात पोलिस निवासस्थाने बांधण्यात आली होती. त्यानंतर काही वर्षांनी गरजेनुसार पोलिस कवायत मैदाना शेजारी नव्या इमारती बांधल्या. या सर्व निवास स्थानांच्या निर्मितीला आज बरीच वर्षे लोटली आहेत. काही निवास स्थानांनी तर त्यांची शंभरी पूर्ण केली आहे. त्यामुळे निवास स्थानांची अवस्था दयनीय झाली आहे. 

बदलत्या काळात नागरिकांच्या राहणीमानात सुधारणा होत गेली. मात्र पोलिस कर्मचाऱ्यांसाठी बांधलेली निवासस्थाने आजही दीड खोल्याचींच आहेत. पोलिस वसाहत परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आत या परिसरात मोठ्या प्रमाणात घाण साचली आहे. इमारतीच्या मागील बाजूने असलेली पाइपलाइन फुटल्याने घाण पाणी रस्त्यावर येते. काही ठिकाणी तर नाल्या बांधल्या नाहीत. जेथे आहेत त्या तुंबलेल्या असतात. या प्रकारामुळे परिसरात डास आणि इतर कीटकांचा सुळसुळाट झाला आहे. 

त्यांच्या उपद्रवामुळे आणि परिसरात पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे लहान मुलांसोबतच पोलिसांच्या परिवारातील इतर सदस्यांवर आजारी पडण्याची वेळ येऊ लागली आहे. या संदर्भात तक्रार करायची तर कुणी करायची असा प्रश्न निर्माण झालेला असतो. त्यामुळे अधिकारीही तक्रार करण्यात येत नसल्याचे सांगत या बाबीकडे दुर्लक्ष करतात. मात्र ही परिस्थिती अशीच राहिल्यास पोलिस कर्मचारी शासकीय पोलिस वसाहतीत राहणेच बंद करतील, हे मात्र निश्चित आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

नव्या इमारतींचे प्रस्ताव शासनाकडे धूळ खात 
जीर्ण निवासस्थाने पाडून त्या ठिकाणी सुसज्ज निवासस्थानांची निर्मिती करावी, यासाठी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने काही प्रस्ताव पोलिस महासंचालक कार्यालयातून शासनाकडे पाठवले आहेत. मात्र ते मंजुरीअभावी धूळ खात आहेत. 

आराम करण्याचीही पंचाईत 
पोलिस वसाहतीत असलेल्या लहानशा घरात रात्रपाळीत काम करून परतल्यावर या कर्मचाऱ्याला दिवसाच्या वेळी चार तास झोप काढण्याचीही पंचाइत असते. घरात दिवसभर काहीना काही कामे सुरू असताना या कर्मचाऱ्यांना आराम करण्यासाठी एक खोलीही उपलब्ध नसते. 

असुविधेमुळे बहुतांश निवासस्थाने रिकामीच 
काही निवासस्थाने जीर्णावस्थेत आहेत. त्यामुळे त्यामध्ये राहण्याची परवानगी नाही. काही निवासस्थानांची वीज बिले मोठ्या प्रमाणात थकली. काही ठिकाणी जागा अपुरी अाहे. त्यामुळे बहुतांश निवासस्थाने रिकामीच आहेत. 

दीड खोलीत चालतो संसार 
जुन्या पोलिस निवास स्थानात प्रवेशद्वाराच्या तोंडावर शौचालय बांधले आहेत. त्यानंतर थोडी मोकळी जागा आणि एक खोली अशा दीड खोलीच्या घरात पोलिसांना त्यांच्या परिवारासह वास्तव्य करावे लागत आहे. त्यानंतर बांधलेल्या इमारतीत खोल्या आहेत. 

घरभाड्यासंदर्भात योग्य अंमलबजावणी हवी 
ज्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या वतीने निवासस्थान देण्यात येते, त्यांच्या पगारात घरभाडे जोडण्यात येत नाही. मात्र मूळ पगाराच्या दहा टक्के मिळणाऱ्या या घर भाड्याच्या पैशात स्वत:जवळील काही पैसे टाकून पोलिस कर्मचारी शासकीय निवासस्थानांऐवजी भाड्याच्या घरात राहणे पसंद करतात. त्यामुळे नव्याने निवासस्थाने तयार केल्यावरही ती रिकामी राहू नये, यासाठी घर भाड्याच्या पैशासंदर्भात योग्य नियम लावणे आवश्यक आहे. 

कल्याण निधीचा उपयोग करणार 
- पोलिस प्रशासनाने जुन्या इमारतीच्या नूतनीकरणाचे प्रस्ताव पाठवले आहेत. पोलिस वसाहतीत राहणारे कर्मचारी शासनाचे विविध कर भरतात. मात्र त्यानंतरही पालिका प्रशासन याकडे विशेष लक्ष देत नाही. निवास स्थानांच्या डागडुजीचे आणि देखभालीचे काम बांधकाम विभागाचे आहे. मात्र तेही विशेष लक्ष पुरवत नाहीत. त्यामुळे आता पोलिस कल्याण निधीचा उपयोग या समस्या सोडवण्यासाठी करण्याचा विचार आहे.''
काकासाहेबडोळे, अप्पर पोलिस अधीक्षक. 

समस्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता 
जनतेच्या सेवेमध्ये रांत्रदिवस कार्यरत राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे, त्यांच्या कुटुंबांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे शासनासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पोलिस वसाहतीमध्ये असुविधेचा सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...