आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डिवचण्या’ मुळे पोलिस शिपाई शशिकांत कडू झाले ‘डॉक्टरेट’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिस शिपाई शशिकांत कडू - Divya Marathi
पोलिस शिपाई शशिकांत कडू
अमरावती - इच्छाशक्ती,जिद्द असली तरीही अपयशाने खचून जाता सामान्य माणूसही यशाचे शिखर गाठू शकतो. सातत्याने काही व्यक्तींच्या डिवचण्याने मनोधैर्य खच्ची होवून हातपाय गाळणारे ही आपल्या सभोवताली दिसून येतात. यावर मात करण्यापेक्षा शिक्षण करिअर सोडणारे ही अनेक आहेत. परंतु असे डिवचणेच पोलिस नाईक शिपाई असलेले शशिकांत कडू यांच्यासाठी प्रचंड उर्जा निर्माण करणारे ठरले. या उर्जेतूनच पोलिस दलातील सततची धावपळीची नोकरी करून कडू यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची आचार्य पदवी संपादन करून ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ ही म्हण सार्थ ठरवत आता पोलिस शिपाई डॉ. शशिकांत कडू झाले. टीकेमुळे नैराश्याच्या गर्तेत जाऊन अपयश पदरी पाडून घेणाऱ्यांसाठी डॉ. कडू खऱ्या अर्थाने दीपस्तंभ ठरले आहे. 
 
डॉ. शशिकांत रुपरावजी कडू हे सध्या ग्रामीण पोलिस दलात नायक पोलिस शिपाई म्हणून कार्यरत आहे. २००६ मध्ये पोलिस दलात भरती झालेले कडू यांनी भारतीय महाविद्यालयातून बीए भूगोल विषयात एम. ए. पुर्ण केले होते. त्याचवेळी त्यांनी पीएचडीची पात्रता परिक्षा (पॅट) उत्तीर्ण केली होती. मात्र सततची व्यस्त नोकरी असल्यामुळे रजेची अडचण येत होती. दरम्यान २००९ मध्ये नोकरी सांभाळुन त्यांनी एम. फिल. पुर्ण केले. दरम्यान पुर्वीच त्यांनी पीएचडी पुर्ण करण्याचा निश्चय केला होता. मात्र पीएचडी करण्यासाठी प्रत्यक्षात गावागावांत जाऊन, शेतकऱ्यांच्या, ग्रामपंचायतींच्या भेटी घेणे आवश्यक होते. हे काम एक, दोन दिवसांचे नव्हते. त्यामुळे शासनाकडून रजा मिळने आवश्यक होते. मात्र रजेसाठी अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे पीएचडीचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवलेल्या शशिकांत यांच्यासाठी आता पहीले लक्ष्य होते, शासनाकडून सुटी मिळवणे. कारण विना परवानगी हे काम करणे योग्य नव्हते. म्हणून त्यांनी मुंबईपर्यंत पायपीट केली. अखेर त्यांना २०१५ मध्ये पावणे दाेन वर्षांची रजा राज्यपालांकडून मंजूर झाली. त्यानंतर पुन्हा एकदा नव्या उमेदीने त्यांनी कामाला सुरूवात केली.
 
मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागातील गावात जाऊन माहीती संकलित करून शासनांच्या विवीध योजनांचा अभ्यास करून आपले काम अंतिम टप्प्यात आणले. अखेर मार्च २०१७ मध्ये त्यांची मुलाखत झाली आणि २३ मार्च २०१७ ला विद्यापीठाकडून पीएचडी मिळत असल्याबाबत ‘नोटिफिकेशन’ काढले.पोलिस दलासारख्या धावपळीच्या नोकरीत पीएचडी पुर्ण करणे म्हणजे एकप्रकारे शिवधनुष्य उचलण्यासारखेच होते. शशिकांत यांनी पीएचडीच्या रुपातली शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले. 
 
गवतउपटण्यातच कर ‘पीएचडी’ 
पीएचडीबाबत आपल्याला काहींनी डिवचल्याचे शशिकांत यांनी सांगितले. त्यातील एक प्रसंग त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितला. ते म्हणाले, मी पोलिस दलात भरती झालो. प्रशिक्षणासाठी गेलो. प्रशिक्षणाला सुरूवात होण्यापूर्वीच नवीन पोलिसांची ओळख परिचय सुरू होता. माझा नंबर आला, त्यावेळी माझ्या मित्रांनीच माझ्या शिक्षणाबाबत माहती दिली. त्यामुळे संबधित अधिकारी माझ्याजवळ आला, म्हणाला तुला पीएचडी करायची आहे, मी हो म्हटले, त्यावर त्याने म्हटले समोर दिसत आहे, ते गवत उपटून टाक, यातच आता तू पीएचडी कर. 
 
डॉक्टरेटचा प्रबंध सादर करण्यासाठी विषयही निवडला होता गंभीर 
डॉ.शशिकांत कडू यांनी आपल्या प्रबंधासाठी सामाजिकदृष्ट्या गंभीर नोकरी सांभाळून अभ्यासाच्या दृष्टीने किचकट विषय निवडला. ‘अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण विकास योजनांचे भौगोलिक मुल्यमापन : १९८१ ते २०११’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. यासाठी प्रा. डॉ. अरुणा प्रभाकर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रा. डॉ. रजनी देशमुख, पोलिस अधीक्षक लखमी गौतम, जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ अनिल भंडारी, आई वडील, भाऊ यांच्यासह मित्र मंडळीचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. 
 
आमच्यासह पोलिस दलातील अधिकारी,कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणा 
- अमरावती येथील पोलिस शिपाई शशिकांत कडू यांनी डॉक्टरेट मिळवली आहे, ही आमच्यासह पोलिस दलातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. पोलिस दलातील सदैव धावपळीची नोकरी सांभाळून त्यांनी मिळवलेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यांनी भविष्यात यापेक्षाही अधिक यश संपादन करावे.
’’ लख्मीगौतम, पोलिस अधीक्षक. 
 
ग्रामीण भागात जाऊन जनजागृती साठी करणार पीएचडीचा उपयोग 
- पीएचडीचा उपयोग पोलिस दलात काम करताना फारसा होणार नसला तरी ग्रामीण भागात जाऊन शासकिय योजनांचे महत्व पटवून देणार आहे. कारण अनेक योजना गरजवंत व्यक्तीपर्यंत पोहचत नसल्याचे अभ्यासात पुढे आले आहे. पीएचडी करण्याचा निर्धार केला होता, अनेकांनी डिवचले त्यामुळे तो निर्धार अधिक मजबूत झाला आणि अखेर पुर्ण केला.
’’ डॉ.शशिकांत कडू,पोलिस नाईक, अमरावती ग्रामीण पोलिस दल. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...