आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: शहरातील प्रवीण जाधवकडे भारतीय धनुर्विद्या संघाचे नेतृत्व

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- श्रीशिवाजी कला वाणिज्य महाविद्यालयाचा गुणी धनुर्धर प्रवीण जाधवकडे भारतीय धनुर्विद्या संघाचे नेतृत्वा सोपवण्यात आले आहे. येत्या १९ ते २५ मार्च या कालावधीत बँकाॅक (थायलंड) येथील आशिया चषक स्पर्धेत तो सहभागी होणार आहे. 

सातारा येथे नुकत्याच झालेल्या आशिया चषक िनवड चाचणी स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे त्याची या स्पर्धेसाठी भारतीय संघात िनवड झाली आहे. या स्पर्धेसाठी भारतीय रिकर्व्ह संघात स्थान पटकावणारा प्रवीण एकमेव अमरावतीचा खेळाडू आहे. त्याच्या कारकीर्दीची सुरुवातही अमरावती येथील राज्य शासनाच्या धनुर्विद्या प्रबोधिनीतून झाली आहे. 

छत्रपती पुरस्कार विजेते संघटक डाॅ. हनुमंत लुंगे यांच्या मार्गदर्शनात गत दोन वर्षांपासून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या प्रवीणला महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. स्मिता देशमुख यांनीही वारंवार प्रोत्साहन िदले आहे. त्याचप्रमाणे प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही त्याला आवश्यक सहकार्य केले. त्यामुळेच कमकुवत आर्थिक परिस्थिती असलेल्या प्रवीणला भारतीय संघापर्यंतचा प्रवास पूर्ण करता आला. 

१५ ते १९ फेब्रुवारीदरम्यान आंध्रप्रदेशातील मछलीपट्टणम येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेत या प्रतिभावान धनुर्धराने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करताना रिकर्व्ह ७० मी. ओव्हरआॅल प्रकारात उत्कृष्ट कामगिरीसह अचूक लक्ष्यभेद करून सुवर्णपदक पटकावले. हे त्याने अमरावती विद्यापीठाला िमळवून िदलेले सलग दुसरे सुवर्ण होय. गतवर्षिही त्याने अप्रतिम कामगिरीसह सोनेरी पदकावर लक्ष्य साधले होते. 

धनुर्विद्या प्रशिक्षक प्रफुल्ल डांगे यांच्या मार्गदर्शनात प्रबोधिनीत तिरंदाजी या खेळाचे धडे घेणाऱ्या जाधवची भारतीय संघात िनवड झाल्याबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

गतवर्षीबँकाॅकमध्ये जिंकले होते कांस्य: प्रवीणनेगतवर्षी बँकाॅकमध्ये झालेल्या आशिया चषक धनुर्विद्या स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती. ही त्याच्या कारकीर्दीतील पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. त्यानंतर त्याने अमेरिकेतील कोलंबिया येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेसह मंगोलियातील उलानबतार येथील जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. यासोबतच राष्ट्रीय स्तरावरही तो कामगिरी करीत असल्याने त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. 
बातम्या आणखी आहेत...