आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्जिकल स्ट्राइकबाबत सरसंघचालकांनी केले माेदी सरकारचे काैतुक, गोरक्षकांची पाठराखण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उपस्थितांना मार्गदर्शन करताना सरसंघचालक. - Divya Marathi
उपस्थितांना मार्गदर्शन करताना सरसंघचालक.
रेशीमबागेतून.... नागपूर- काश्मीरसह मीरपूर, मुजफ्फराबाद, गिलगिट आणि बाल्टिस्तानचा प्रदेश भारताचे अविभाज्य अंग असल्याचे स्पष्ट करताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पाकव्याप्त काश्मिरात अलीकडेच झालेल्या सर्जिकल स्ट्राइकबाबत मोदी सरकार लष्कराची पाठ थोपटली. भविष्यातही अशा कणखर धोरणाची गरज असल्याची सूचना त्यांनी केली.
नागपुरात मंगळवारी झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात डॉ. भागवत बोलत होते. भारतीय आर्थिक सेवेच्या सन १९७६ च्या तुकडीचे अधिकारी राहिलेले ज्येष्ठ समाजसेवी सत्यप्रकाश राय हे कार्यक्रमास पाहुणे म्हणून उपस्थित होते.

‘पाकव्याप्त काश्मिरात घुसून भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईमुळे जगभरात अापल्या देशाची प्रतिष्ठा वाढली असून दहशतवादी आणि त्यांच्या पाठीराख्यांना योग्य तो संदेश दिला गेला अाहे. भारतीय सैन्यदलांची कारवाई कौतुकास पात्र आहे. भविष्यातही अशाच कणखर भूमिकेची गरज असून सैन्यदलांनी आता एक क्षणही गाफील राहून चालणार नाही. सीमांचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक त्या साऱ्या बाबींची पूर्तता करावी. मात्र, त्याच वेळी जम्मू- काश्मीरमधील राज्य सरकारनेदेखील यात सहकार्याची भूमिका बजावली पाहिजे,’ अशी अपेक्षा भागवत यांनी या वेळी व्यक्त केली. जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. विकासाचा हा निधी नेमका कुठे खर्च होतो? सरकारकडून काही मिळाले नसल्याची भावना लोकांमध्ये का निर्माण होते?, असे खडे बोलही भागवत यांनी तेथील मेहबूबा मुफ्ती सरकारला सुनावले. मागील दोन वर्षांतील मोदी सरकारची कामगिरी देशातील नैराश्य दूर करून विश्वास निर्माण करणारी असल्याचे ते म्हणाले.

जातिभेद देशासाठी लज्जास्पद : सत्यप्रकाश राय
जातिभेद, अस्पृश्यतेची भावना देशासाठी लज्जास्पद आहे. त्यासाठी साराच समाज जबाबदार असल्याचे परखड मत ज्येष्ठ समाजसेवी सत्यप्रकाश राय यांनी मांडले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशात स्वच्छतेचे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे कार्य सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रमाणेच मोठे आहे. आजही मानवी विष्ठा डोक्यावर वाहून नेण्याचे कार्य सफाई कर्मचारी करीत आहेत. समाजातील या कर्तव्यपरायण लोकांची समाजाने देशाने दखल घेऊन त्यांना योग्य तो सन्मान देण्याची गरज असल्याचे राय म्हणाले. संघाने या दिशेने अतिशय स्तुत्य कार्य केले असून जगात त्याला तोड नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
काय म्हणाले सरसंघचालक
Áजातीय भेदभावाच्या घटना लाजिरवाण्या.
Áजातीयता दूर करण्यासाठी समाजाने मूकदर्शक बनता संघाला सहकार्य करावे.
Áजातीय विद्वेष पसरवणाऱ्या शक्तींना वेगळे पाडावे.
Áराज्यांमधील पक्षांच्या राजकारणाला मर्यादा असावी.
Áप्रामाणिक गोरक्षकांची तुलना उपद्रवींशी नको.
Áशिक्षण आवश्यक, सामान्यांच्या आवाक्यातील असावे.
भेदातून घडलेल्या घटना लज्जास्पद
मध्यप्रदेशातील सर्वेक्षणात आजही ४० टक्के गावांमधील मंदिरांत, ३० % गावांमधील सार्वजनिक विहिरींवर, ३५ टक्के गावांतील स्मशानघाटांवर जातीय भेदभाव कायम असल्याचे चित्र आहे. आंध्र, कर्नाटक, तेलंगणातही असे सर्वेक्षण सुरू आहे. हा भेदभाव दूर करण्याचे प्रयत्न संघ करत अाहे. भेदाभेदातून घडलेल्या घटना लज्जास्पद आहेत. समाजाचे विघटन करण्याचे प्रयत्न काही शक्ती करीत आहेत. त्यापासून सावध राहा, असे भागवत म्हणाले.
शिक्षण व्यवस्थेत सुधारणा हव्यात
समाजातमूल्यांचा प्रसार करण्यासाठी शिक्षणाच्या सार्वत्रिक प्रसाराची नितांत गरज आहे. त्यासाठी शिक्षणाचे व्यापारीकरण होता कामा नये. ते अतिशय कमीत कमी दरात सर्वांना उपलब्ध व्हायला हवे. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा घडवण्याची गरज आहे. त्यासाठीची प्रतीक्षा आता पुरे झाली असून आता काहीतरी करण्याची गरज आहे. समाजात एकतेची भावना, जबाबदार नागरिक घडवणारे शिक्षण हवे, अशी अपेक्षा भागवत यांनी व्यक्त केली.
केवळ विरोधासाठी विरोध करू नका
अापल्या देशात विरोधी पक्षांनी सरकारच्या विरोधात बोलणे हा लोकशाहीचा भाग मानला जाताे. ताे विराेधकांचा अधिकार असल्याचेही सांगितले जाते. मात्र केवळ विरोधासाठी विरोध होता कामा नये. या परिस्थितीचा फायदा विध्वंसकारी शक्ती घेत असतात. त्यामुळे समाजात दुही माजणार नाही, याचे भान प्रसारमाध्यमांनीही बाळगण्याची गरज असल्याचे आवाहन भागवत यांनी केले.
‘उपद्रव माजवणाऱ्यांशी गाेरक्षकांची तुलना नकाे’
गोरक्षणाचे प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची गोरक्षणाच्या नावावर केवळ उपद्रव माजवणाऱ्या तत्त्वांशी तुलना करणे अयोग्य अाहे. त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची गरज आहे. देशभरात प्राणी क्रूरताविरोधी कायदा अस्तित्वात आहे. कायद्याच्या चौकटीत राहून प्रामाणिक गोरक्षक आंदोलनाच्या मार्गाने गोरक्षणाचे काम करीत आहेत, याकडेही भागवत यांनी लक्ष वेधले.

संघाने पारंपरिक हाफ पँट वगळून गणवेशात फुल पँटचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्यावर प्रथमच संघाचे स्वयंसेवक विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने फुल पँटमध्ये झळकले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नव्या गणवेशाबद्दलची उत्सुकता झळकत होती. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह मंचाच्या शेजारी विशेष अतिथींच्या कक्षात बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखील नव्या गणवेशात सहभागी झाले होते. लोकप्रिय भोजपुरी गायक, अभिनेता भाजपचे खासदार मनोज तिवारी, पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह देशविदेशातून विविध क्षेत्रांतील मान्यवर या वेळी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...