आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्व विदर्भाला पावसाने झोडपले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा, ३४ तालुक्यांत अतिवृष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूर्व विदर्भात पावसाने सरासरी ओलांडली असून आतापर्यंत ३९८.२ मिलिमीटर म्हणजे सर्वसामान्य प्रमाणाच्या तुलनेत २८ टक्के अधिक पावसाची सरासरी ओलांडली आहे. चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा या तीन जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून नद्यांना पूर आला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटल्याने गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, विदर्भातील अनेक जिल्ह्यात रविवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा नागपूर वेधशाळेने दिला आहे.
मागील काही दिवस पावसाने खंड दिल्यावर पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र, तीन दिवसांत पूर्व विदर्भाच्या सहा जिल्ह्यांमध्ये कुठे मुसळधार, तर कुठे संततधार पाऊस झाल्याने तूट भरून निघाली. याशिवाय तब्बल ३४ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. पूर्व विदर्भात ९ जुलैपर्यंत सरासरी ३१३.७३ मिली मीटर पावसाचे प्रमाण असताना आतापर्यंत ३९८.२ मिलिमीटर पावसाची म्हणजे २८ टक्के अधिक पावसाची नोंद झाल्याची माहिती नागपूर वेधशाळेच्या सूत्रांनी दिली. सर्वत्र दमदार पावसामुळे पेरण्यांना वेग आला आहे.
शनिवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासात पूर्व विदर्भात सरासरी ७४.३४ मिलिमीटर पाऊस झाला असून सर्वाधिक पावसाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात १२०.५५ मिलिमीटर इतकी झाली. त्याखालोखाल गडचिरोली जिल्ह्यात ९५.३८ मिलिमीटर, तर वर्धा ९२.७५ मिलििमटर पाऊस झाला. नागपूर जिल्ह्यात ४२.२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात आले. नागपूर जिल्ह्यात ९ जुलैपर्यंत सरासरी २८० मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, आतापर्यंत ३१७.३४ मिलिमीटर पावसाची म्हणजे १३ टक्के अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात सर्वाधिक ७९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वर्धा जिल्ह्यात सरासरी २७२.४३ मि.मी. पाऊस या कालावधीत पडतो. मात्र, आतापर्यंत ४१४.५० मि.मी. म्हणजेच ५२ टक्के अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील वर्धा, देवळी, आष्टी, कारंजा, आर्वी, हिंगणघाट व समुद्रपूर या सात तालुक्यात अतिवृष्टीचा तडाखा बसला असून वर्धा नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यात ९ जुलैपर्यंत सरासरी ३२६.१७ मिली मीटर पाऊस पडतो.
मात्र आतापर्यंत ३२५ मिली मीटर म्हणजेच सरासरीइतक्या पावसाची नोंद झाली आहे. तुमसर, साकोली व लाखनी या तीन तालुक्यात ६५ ते ८० मिली मीटर दरम्यान सर्वाधिक पाऊस झाला आहे. शेजारच्या गोंदिया िजल्ह्यात ९ जुलैपर्यंत ३४९.३८ मिलिमीटर पाऊस पडतो. आतापर्यंत ३६५.५३ मिलिमीटर म्हणजे ५ टक्के अधिक पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्याने सांगितले.
लोकबिरादरीला बेटाचे स्वरूप : भामरागड तालुक्यासह सुमारे दोनशे गावांचा संपर्क तुटल्याचे सांगण्यात येत असून ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाला अक्षरश: बेटाचे स्वरूप आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, विदर्भातील अनेक जिल्ह्यात उद्या रविवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे.

खराब हवामानाचा मुख्यमंत्र्यांना फटका
नागपूर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी नागपुरातील खराब हवामानाचा फटका बसला. खराब दृश्यतेमुळे (व्हिजिबिलिटी) विमान नागपूर विमानतळावर उतरू न शकल्याने ते परत मुंबईला रवाना करावे लागले. शनिवारी फडणवीस किमान पाच कार्यक्रमांना उपस्थिती लावणार होते. त्यासाठी ते सकाळी सव्वाआठ वाजता विमानाने मुंबईहून निघाले. विमान नागपूरजवळ आल्यावर परिसरातील खराब दृश्यतेमुळे (व्हिजिबिलिटी) ते नागपूर विमानतळावर उतरवता आले नाही. त्यामुळे ते परत मुंबईला रवाना करावे लागले. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यक्रमांना हजेरी लावली.

कोल्हापूरला धुवाधार; २० दुचाकींचे नुकसान
कोल्हापूर | गेले काही दिवस मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या करवीरवासीयांना पावसाने दिवसभर झोडपून काढले. पावसाळा सुरू झाल्यानंतरचा हा दिवसभर आणि दणकेबाज पडणारा पहिलाच पाऊस होय. यामुळे महालक्ष्मी मंदिराशेजारी इंदुमती गर्ल्स हायस्कूलची संरक्षक भिंत कोसळून त्याखाली २० दुचाकींचा चेंदामेंदा झाला. सकाळपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली होती. रपरप पडणाऱ्या पावसाने शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या जयंती नाल्याला नदीचे स्वरूप आले. ठिकठिकाणी पाणी साठले. पहिल्याच जोरदार पावसाने अनेक ठिकाणी रस्त्यांची वाट लागली. दुपारच्या सुमारास जुन्या राजवाड्याजवळील शाळेची संरक्षक भिंत पडली. मंदिरासाठीची पार्किंग समोर असल्याने तेथे चारचाकी लावल्या जातात, तर भिंतीशेजारी दुचाकी लावल्या जातात. सुमारे २० दुचाकी या भिंतीखाली गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.

पंचगंगा पात्राबाहेर
पंचगंगेचे पाणी झपाट्याने वाढत असून नदीच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रात्री उशिरा पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...