आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे जि. प. बांधकाम सभापतींकडून खरडपट्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ -- उमरखेड तालुक्यातील रस्त्याच्या निकृष्ट कामाची जिल्हा परिषद बांधकाम सभापतींनी चिरफाड केली. दोन रस्त्याची आणि एका दलित वस्तीच्या कामाची पाहणी केली. दरम्यान, कामाच्या निकृष्टतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. कामात सुधारणा कारा, अन्यथा कारवाई करण्याचा इशाराही या वेळी उपस्थित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्यांना दिला. विशेष म्हणजे ब्राम्हणगावच्या पीएचसीचे काम पाहून कौतूक केले. 
 
जिल्ह्यातील सोळाही तालुक्यात जाऊन प्रत्यक्ष बांधकामाचा आढावा घेण्याचे नियोजन बांधकाम समिती सभापती निमिष मानकर यांनी केले आहे. याची सुरुवात उमरखेड तालुक्यापासून करण्यात आली. या वेळी बांधकाम विभागाच्या कार्यालयात आयोजित बैठक अपुऱ्या सोयी सुविधेमुळे पंचायत समिती सभागृहात घेण्याचे ठरले. परंतु त्या ठिकाणी सुद्धा वीज खंडित झाल्याने स्थानिक विश्रामगृहात ही बैठक घेण्यात आली. बैठकीची सुरुवातच विविध शिर्षकाखाली (हेड) प्राप्त निधीतून झालेल्या कामापासून केली. यात महत्त्वाचे म्हणजे बांधकाम विभागाने केलेल्या बहुतांश कामाचे इस्टिमेटच उपलब्ध नव्हते. या कामाचे इस्टिमेट ताबडतोब उपलब्ध करून देण्याचे निर्देश सभापती निमीष मानकर यांनी दिले. तरीसुद्धा इस्टिमेंट देण्यात आले नाही. निव्वळ चालढकल करण्यात आली. तालुक्यातील टाकळी - तिवडी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. परंतु जो रस्ता चांगला आहे, त्या ठिकाणावरच साहित्य आणून कामाला सुरुवात करण्याचा घाट काँग्रेसचे गटनेते राम देवसरकर यांनी हाणून पाडला होता. या रस्त्याबाबत विचारले असता अधिकाऱ्यांकडून थातुरमातूर उत्तरे देण्यात आली. यापूर्वीचे आणि सध्याचे इस्टिमेंटही अधिकाऱ्यांकडे नव्हते. अशीच परिस्थिती ब्राम्हणगाव-सिंदगी रस्त्याची आहे. या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने एकदा, जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दोन वेगवेगळ्या शिर्षकाखाली काम केले. हे काम गुणवत्ता पूर्ण झालेले नाही. या दोन्ही रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे ठरले. तत्पूर्वी पंचायत समितीत सरपंच संघटनेच्या समस्या सभापती निमीष मानकर, राम देवसरकर, जिल्हा परिषद सदस्य खोकले यांनी ऐकून घेतल्या. त्या अनुषंगाने पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यानंतर पंचायत समितीच्या कामाचा आढावा घेतला असता, त्यात चक्क पंचायत समिती सभापतींना उडवा उडवीचे उत्तरे देण्यात आली. कामाच्या दर्जाबाबत सभापती मानकर यांनी प्रश्न उपस्थित केले असता, कामाची गुणवत्ता, टक्केवारी ठरवताना बीडीओंसह कनिष्ठ अभियंते सुद्धा निरुत्तर ठरले. पंचायत समितीच्या कामात सुधारणा करा, अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असे सभापती मानकर यांनी ठणकावून सांगितले. एकंदरित कामाच्या गुणवत्तेसह सुसूत्रता आणण्याच्या सूचना सभापतींनी केल्या. विशेष म्हणजे ब्राम्हणगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पाहून अधिकाऱ्यांची पाठ थोपटली. आदर्श म्हणून ही पीएचसी उदयास येईल, असेही पाहणी दरम्यान सभापती म्हणाले. 
कामसुधारण्याचे दिले निर्देश : रस्त्याच्याकामाची गुणवत्ता असो वा एकच रस्ता वारंवार करण्याचा प्रकार असो अशा प्रकारचे कुठलेही काम करू नका, अशा स्पष्ट सूचना केल्या आहेत. या बैठकीत आढळून आलेल्या चुका सुधाराव्या आणि पुढील बैठकीत या चुका होऊ नये असेही मानकर यांनी सांगितले. 

काही कामांची अडवली देयके 
मागील काही वर्षातील कामे पूर्णावस्थेत आहेत. मात्र, अशा कामांची अंतिम देयके अदा करण्यात आलेली नाहीत. या विषयी विचारणा केली असता लवकरच बिल टाकण्यात येईल, असे सांगण्यात आले, बिल थांबवण्यामागचे कारणही क्षुल्लक असल्याचे सांगण्यात आले आहे. 

बुकलेटमध्ये आढळून आल्या अनेक त्रुटी 
आढावा बैठकीत सभापतींना बुकलेट देण्यात आले. या बुकलेटमध्ये बहुतांश ठिकाणी त्रुटी आढळून आल्या. यावरही बांधकाम सभापती मानकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. असा प्रकार पुढील सभेत आढळून आल्यास त्यासंदर्भात दखल घेऊ, त्यामुळे असे पुन्हा करू नये अशी सूचना वजा इशारा दिला. 

बीडीओंवर झडल्या आरोपांच्या फैरी 
आपल्या कामाचे मूल्यांकन जिल्हाधिकाऱ्यांनी आणि सीईओंनी केल्याच्या तोऱ्यात असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांवर चांगलीच तोफ डागण्यात आली. यात नरेगातून तालुक्यात अनेक कामे झाली. मात्र, मस्टर काढताना आणि बिल अदा करताना चालढकल केल्या जात असल्याचा आरोप सरपंचांनी केला. मात्र, गटविकास अधिकाऱ्यांनी या आरोपात तथ्य नसल्याचे सांगितले. एकंदरित पंचायत समितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत गटविकास अधिकाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. 
बातम्या आणखी आहेत...