आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय पतसंस्थेत लाखो रुपयांची अनियमितता, आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- जिल्हाशालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेत लाखो रुपयांची अनियमितता आढळून आली आहे. या प्रकरणाच्या तक्रारीवरून तब्बल अडीच ते तीन तास अध्यक्ष, सचिव आणि व्यवस्थापकाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेने केली. पतसंस्थेतील या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बनावट स्वाक्षरी करून व्यवहार दर्शवण्यात आल्याची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे आली आहे.

जिल्हा शालेय शिक्षण पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात सभासद आहेत. कोट्यवधी रुपयांचे पतसंस्थेचे व्यवहार चालतात. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनललाच बहुमत मिळाले आहे. यासाठी सत्ताधाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. अनेक सभासदांना वेळेवर मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी कर्जाची वसुली आणि दीर्घ मुदतीचे कर्ज एकाच तारखेला मंजूर करण्याची करामत अध्यक्ष, सचिव, व्यवस्थापकांनी केली आहे. विशेष म्हणजे संचालक मंडळाची मंजुरी घेता हे कर्ज मंजूर झाले. ही बाब तक्रारींतून जिल्हा उपनिबंधकाकडे मांडण्यात आली होती. जिल्हा उपनिबंधक जितेंद्र कंडारे यांनीसुद्धा अनियमितता झाल्याचे स्पष्ट अहवालात म्हटले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे यासंदर्भात लेखी तक्रार करण्यात आली. या तक्रारीमध्ये संचालक मंडळाचा कारनामा नमूद करण्यात आला आहे. पतसंस्थेच्या रकमेत लाखो रुपयांची अफरातफर करणे, बनावट व्यवहार दर्शवून बनावट कागदपत्र तयार केले. या माध्यमातून लाखो रुपयांची माया गोळा केल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. यासंदर्भात २३ जुलै २०१५ रोजी तक्रार करण्यात आली. त्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशी सोपवली होती. यासाठी शनिवार, १५ ऑगस्ट रोजी एपीआय चंद्रशेखर कडू यांनी तीन ते चार जणांचे स्टेटमेंट घेतले आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

वसुली आणि कर्जमंजुरीचा फंडा : पतसंस्थेचेकर्ज घेणारे बरेच सभासद आहेत. यातील जवळपास ४७ सभासदांकडून एकाच दिवशी कर्जाची वसुली करण्यात आली. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी त्या सभासदांना दीर्घ मुदतीचे कर्ज मंजूर करण्याचा अजब गजब फंडा संचालक मंडळाने वापरला. त्यात उर्वरित संचालक मंडळही अनभिज्ञ असल्याचे चौकशीत समोर आले.

चौकशीला दुजोरा
प्रकरणाचीतक्रार देऊन वीस दिवसांचा कालावधी लोटल्या गेला आहे. यापूर्वी एकावेळी अध्यक्ष, सचिव, व्यवस्थापकाला बोलावण्यात आले होते. त्यानंतर आता शनिवार, १५ ऑगस्ट रोजी पुन्हा आर्थिक गुन्हे शाखेने अध्यक्ष, सचिव, व्यवस्थापकाला बोलावून चौकशी केली. तब्बल तीन तास बंदद्वार ही चौकशी पार पडली.
उपनिबंधकांनी ठेवला अनियमततेचा ठपका
यासंदर्भातपूर्वी जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रार देण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारावर जिल्हा उपनिबंधक जितेंद्र कंडारे यांनी चौकशी केली. चौकशीमध्ये बऱ्याच सभासदांच्या कर्जाची वसुली आणि नवीन दीर्घ मुदतीचे कर्ज मंजूर झाल्याची स्पष्ट नोंद आहे. विशेष म्हणजे त्यांनीसुद्धा पतसंस्थेच्या संचालक मंडळाची अनियमितता असल्याचे अहवालात म्हटले आहे.

"त्या' तिघांचे म्हणणे नोंदवले आहे
याप्रकरणाची चौकशी करण्याच्या अनुषंगाने तिघांना बोलावण्यात आले होते. याबाबत त्यांचे म्हणणे शनिवारी नोंदवण्यात आले आहे. सध्यातरी आम्ही म्हणणे नोंदवून घेतले आहे. त्यामुळे आतापासून फसवणूक झाली म्हणता येणार नाही. यासह आम्ही सभासदांचे म्हणणेही नोंदवून घेऊ. त्यानंतर आर्थिक अफरातफर आढळून आल्यास फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात येईल. चंद्रशेखरकडू, एपीआय, यवतमाळ.