आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिंत कोसळली,शाळेत परवानगी नाकारली,आता बसावे तरी कुठे?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिरजगाव कसबा -  येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेच्या इमारतीची भिंत कोसळल्याने मुलांना शाळेत बसण्याची परवानगी शाळा व्यवस्थापनाने नाकारली असून दुसरीकडे विद्यार्थ्यांची बसण्याची पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्वरित भिंत बांधण्यात यावी असा ठराव शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत शनिवारी (दि. २६) घेण्यात आला. 
 
शिरजगाव कसबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलाच्या शाळेची तिरपी झालेली भिंत गुरूवारी (दि. २४) दुपारच्या सूुमारास कोसळली. विद्यार्थ्यांना हरतालिकेनिमित्त साडेतीन वाजता सुटी दिल्यानंतर तासाभरातच ही भिंत कोसळली होती. दरम्यान शनिवारी (दि. २६) झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत शाळेची आधार भिंत त्वरीत बांधण्याचा ठराव घेण्यात आला असून भिंतीचे बांधकाम केल्यास मुळ इमारत ढासळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने भिंत त्वरीत बांधण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. दरम्यान संबंधित दुमजली शाळा भरवस्तीत असून भिंत कोसळल्याने मुख्य इमारतीस धोका निर्माण झाला आहे. इमारत मुख्य वस्तीत असून बाजार ओळीत आहे. त्यामुळे इमारत कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांना शाळेत बसण्याची परवानगी नाकारली आहे. पर्यायी बसण्याची व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे भिंत बांधण्यासाठी त्वरीत उपाययोजना करण्याचे व्यवस्थापन समितीच्या ठरावात म्हटले आहे. व्यवस्थापन समितीचा ठराव शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला अाहे. दरम्यान विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी बसण्याची व्यवस्था कुठे करता येईल का याचा निर्णय आठवडाभरात घेतला जाणार असल्याची माहिती मुख्याध्यापक डी. पी. चव्हाण यांनी दिली. भिंतीचे बांधकाम त्वरीत करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले असून विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील मेंगजे यांनी सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...