आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेट निवडणूक: अमरावतीमध्ये अव्यवस्था तर यवतमाळात बॅलेट पडले अपुरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत शहरातील श्री शिवाजी शारिरीक शिक्षण महाविद्यालयात मतदान करताना मतदार. - Divya Marathi
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत शहरातील श्री शिवाजी शारिरीक शिक्षण महाविद्यालयात मतदान करताना मतदार.
अमरावती- अमरावती शहरातील एक केंद्रावरील अव्यवस्था तसेच यवतमाळ शहरातील मतदान केंद्रावर बॅलेट अपुरे पडल्याचा प्रकार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आज (१५ ऑक्टोबर) पार पडलेल्या प्राधिकारणी निवडणुकीत समोर आला. सिनेट, विद्या परिषद अभ्यास मंडळासाठी प्राचार्य, प्राध्यापकांकडून सर्वाधिक मतदान केल्याची माहिती आहे. 

सिनेट, विद्या परिषद, अभ्यास मंडळ निवडणूक पाचही जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयांच्या ६३ मतदान केंद्रावर घेण्यात आली. प्राचार्य, संस्था व्यवस्थापन प्रतिनिधी, विद्यापीठ प्राध्यापक, महाविद्यालयीन शिक्षक, नोंदणीकृत पदवीधरांनी मतदार म्हणून सिनेट, विद्या परिषद आणि अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. अमरावती जिल्ह्यातील २० मतदान केंद्रावर एकूण १० हजार ३२४, अकोला जिल्ह्यातील सात मतदान केंद्रावर ४५५२, बुलढाणा जिल्ह्यातील तेरा मतदान केंद्रावर १५६२, यवतमाळ जिल्ह्यातील पंधरा मतदान केंद्रावर ४१८३ आणि वाशीम जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रावर ११९७ असे पाचही जिल्हे मिळून २१ हजार ८१८ मतदार होते. या निवडणूकीत सर्व संवर्गात २०५ उमेदवार रिंगणात होते. 

सर्वात जास्त मतदार अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर होते. मतदानासाठी दिवसभर भरगच्च गर्दी या केंद्रावर दिसून आली. यवतमाळ शहरातील लोकनायक बापुजी अणे महिला महाविद्यालय या केंद्रावर साधारणत: हजार मतदार मतदान प्रक्रियेत भाग घेणार होते. मात्र दुपारी वाजेपर्यंत मतदान झाल्यानंतर मतदान पत्रिका संपल्याची बाब समोर आली. त्यामुळे काही वेळ मतदानाचा खोळंबा झाला हाेता. मात्र, यवतमाळ जिल्ह्याची जबाबदारी असलेले विद्यापीठाच्या परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. जयंत वडते यांनी तातडीने परीक्षा केंद्रावर मतदान पत्रिका उपलब्ध करुन दिली. 

मतदान पत्रिका पोहचल्यानंतर यवतमाळच्या केंद्रावर पुन्हा मतदान प्रक्रिया सुरू झाली. अमरावती येथील श्री शिवाजी शारिरीक शिक्षण महाविद्यालय या मतदान केंद्रावर तब्बल ५८०० ते हजार मतदारांची व्यवस्था करण्यात आली होती. मोठ्या संख्येने असलेल्या मतदारांची एकाच बुथवर मतदान प्रक्रिया होणार असल्याने सकाळच्या सुमारास येथे गाेंधळ उडाला. सर्वच गटातील मतदारांना मतदान करण्याकरता तब्बल दोन ते तीन तासांचा कालावधी लागल्याची माहिती आहे. अन्य जिल्ह्यात तसेच भागात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याची माहिती आहे. यवतमाळ येथील मतदान केंद्रावर बॅलेट कमी पडल्याने काही वेळ मतदान थांबले होते. या केंद्रावर तातडीने बॅलेट पोहचवत मतदान प्रक्रिया लगेच आरंभ करण्यात आल्याची माहिती कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी दिली. 

नुटा- शिक्षण मंचमध्ये लढत 
सिनेट, विद्या परिषद तसेच अभ्यास मंडळातील सदस्य पदाकरीता नुटा आणि शिक्षण मंच दरम्यान चुरसपूर्ण लढत झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. प्राधिकारणी निवडणुकीत कोण बाजी मारणार हे मंगळवार १७ ऑक्टोबरला होणाऱ्या मतमोजणीनंतर समोर होईल. 

प्राचार्य-प्राध्यापकांचा चांगला प्रतिसाद 
सिनेट निवडणुकीत प्राचार्य गटात ९८ टक्के, प्राध्यापक गटात ८५ ते ९० टक्के, संस्था व्यवस्थापन गटात ९५ टक्के, विद्यापीठ प्राध्यापक गटात ९८ टक्के तर नोंदणीकृत पदवीधर गटात ५० ते ५५ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. 
बातम्या आणखी आहेत...