आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसच्या बड्या नेत्यांची स्वाक्षरी अभियानाकडे पाठ; माजी मंत्री नितीन राऊत यांची गैरहजेरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- महाराष्ट्राचे भूमिपुत्र व पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नाैदलाचे अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी काँग्रेसने राज्यात स्वाक्षरी अभियान सुरू केले अाहे. मात्र, नागपुरात बुधवारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या अभियानात काँग्रेसमधील गटबाजीचे प्रदर्शनच झाले. माजी मंत्री नितीन राऊत आणि सतीश चतुर्वेदी गटाने नेहमीप्रमाणे या आंदोलनाकडे पाठ फिरवली हाेती.  दरम्यान, केंद्राने सर्वोच्च प्रतिनिधी मंडळ पाकिस्तानला पाठवून तेथील नेतृत्वाशी चर्चा करावी आणि कुलभूषण यांची सुखरूप सुटका करावी, अशी मागणी चव्हाण यांनी या वेळी केली.   

नागपूर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी उफाळून आली आहे. कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी सुरू करण्यात आलेल्या स्वाक्षरी अभियानातही बड्या काँग्रेस नेत्यांनी पाठ दाखवली. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत नागपुरात व्हरायटी चौकात पार पडलेल्या या आंदोलनात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहराध्यक्ष विकास ठाकरे वगळता नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी या नेत्यांची गैरहजेरी राहिली. किमान या कार्यक्रमात तरी काँग्रेस नेत्यांनी एकजूट दाखवायला हवी होती, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत होती. दरम्यान, काँग्रेसच्या वतीने राज्यात सुरू करण्यात आलेली स्वाक्षरी मोहीम तीन दिवस चालणार अाहे.

अशाेक चव्हाण म्हणाले की, पाकिस्तानी मिलिटरी न्यायालयाने जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा निषेधार्ह आहे. ते निर्दोष आहेत. त्यांनी काहीही चुकीचे केलेले नाही. त्यांच्या विरोधात कुठलेही पुरावे नाहीत, असे संसदेत परराष्ट्र मंत्र्यांनीही स्पष्ट केले आहे. जाधव यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी नैसर्गिक न्यायही पाकिस्तानात नाकारण्यात आला आहे. पाकिस्तानने नेहमीच अतिरेकी पाठवून भारतात अस्थिरता माजविण्याचे प्रयत्न केले आहेत. मुंबईवरील हल्ल्यातून ही बाब स्पष्ट झाली आहे, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.

पाकिस्तानवर थेट कारवाई करा : उद्धव ठाकरे
कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर प्रतिक्रिया देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, ‘या विषयावर फक्त भावना व्यक्त करून चालणार नाही किंवा पाकिस्तानला इशारे देऊनही चालणार नाही. आता थेट कारवाई करून दाखवावी लागेल. शिवसेना रस्त्यावर उतरून विरोध करते तेव्हा आमच्यावर टीका करतात. मात्र, अशी काही घटना घडली की लोकांचे देशप्रेम जागे होते.’
बातम्या आणखी आहेत...