आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्धी महामार्गात पर्यावरण ‘समृद्धी’ कायम राहील, राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ग्वाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेण्यात येईल. समृद्धी महामार्गाच्या १५ किलोमीटर परिघात पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असे कोणतेही क्षेत्र नाही, अशी ग्वाही राज्य रस्ते विकास महामंडळाचे सुपरिटेंडंट इंजिनिअर यू. जे. दाबे यांनी दिली.

समृद्धी महामार्गाबाबत लोकांच्या मनात कोणतीही शंका राहू नये तसेच कामाला गती मिळावी, यासाठी पहिली जाहीर सुनावणी हिंगणा तालुक्यातील वडगाव गुजर या गावात घेण्यात आली. त्यावेळी ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. महामार्गासाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीबाबत कनेक्टर व इंटरचेंज पद्धतीने रस्त्याचे बांधकाम करण्यात येईल, असे दाबे यांनी स्पष्ट केले.  
 
नागपूर ते वर्धा या ८९.३५ किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी ही सुनावणी घेण्यात आली. शिवमडगा येथून सुरू होणारा महामार्ग हिंगणा तालुक्यासह वर्धा जिल्ह्यांतील तीन तालुक्यांतून जाणार आहे. महामार्गासाठी नागपूर जिल्ह्यातील २१ व वर्धा जिल्ह्यातील ३४ गावातील १५२०.०४ हेक्टर जमीन लागणार आहे. त्यापैकी ४९.२२ हेक्टर वनजमीन आहे. या वेळी शेतकऱ्यांनी भूसंपादन व प्रकल्पाबाबत उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन निवासी उपजिल्हाधिकारी के. एन. के. राव यांनी केले.
 
 वैयक्तिक पातळीवर कोणालाही माहिती हवी असल्यास नागपूर येथील उद्योग भवनातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात उपलब्ध असल्याची माहितीही राव यांनी दिली आहे. ७०२ किलोमीटर लांबीच्या या महामार्गावरील राज्यातील अन्य १० जिल्हे, २४ तालुके अाणि ३८५ गावे जोडली जाणार आहे. महामार्गामुळे शिक्षण, कृषी अाधारित रोजगार स्थानिकांना उपलब्ध होईल. लोकांच्या जीवनात समृद्धी आणणारा हा महामार्ग असल्याचे राव यांनी स्पष्ट केले. येत्या २०१९ पर्यत महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजे एक मार्ग सुरू व्हावा, असे प्रयत्न आहे.
बातम्या आणखी आहेत...