अमरावती - मेळघाटातील सुमन जांभेकर या आदिवासी महिलेला पुढील दोन महिन्यांत हक्काचे घरकुल बांधून देण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योग राज्यमंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी ‘दिव्य मराठी’ला दिली. केंद्र सरकारच्या घरकुल योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या लाभार्थींच्या यादीत सुमनचे नाव आहे, असेही पोटे यांनी स्पष्ट केले. तर मागील वर्षभरात सुमनला स्वस्त धान्य दुकानातून अन्न धान्य मिळण्यासाठी रेशन कार्ड का देण्यात आले नाही? या बाबतही चौकशी करण्यात येईल, असे अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील वर्षी २९ नोव्हेंबर २०१४ ला राणा मालूर या गावातील जाऊन ‘सुमन जांभेकर’ या महिलेच्या घरी भेट दिली होती. दोन वर्षीय चांदणी जांभेकर या चिमुकलीचा कुपोषणामुळे मृत्यू झाला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मोठ्या आस्थेने विचारपूस केली होती. २६ नोव्हेंबरच्या अंकात दिव्य मराठीने सुमनबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते.
सुमनच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी सर्वतोपरी मदत देण्यासंदर्भात उपस्थित अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सूचनाही केल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला एक वर्ष पूर्ण होत आले तरीही राणा मालूर या गावात शासकीय अधिकाऱ्यांनी ढुंकूंनही पाहिलेले नाही.
यासंदर्भात दिव्य मराठीने २६ नोव्हेंबर २०१५ च्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत प्रशासकिय यंत्रणेने सुमन जांभेकर या महिलेला घरकुल देण्यासंदर्भात शासन स्तरावर काय प्रगती आहे, याबाबत माहिती घेतली. केंद्र सरकारच्या घरकुल योजनेत सुमनचे नाव समाविष्ट असल्याची माहिती पुढे आली आहे.