आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधकांना सत्ता दिली आहे तर आता पाच वर्षे प्रतीक्षा करा - सुप्रिया सुळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ :  नागरिकांनी निवडणुकीदरम्यान भाजप - सेना युतीवर विश्वास दाखवून पाच वर्षांसाठी त्यांच्या हाती सत्ता दिली आहे. त्यामुळे ही सत्ता टिकविण्याची त्यांची जबाबदारी आहे. मध्येच निवडणुका घेऊन नागरिकांवर खर्चाचा बोजा पाडण्यात काहीही अर्थ नाही. त्याऊलट मध्यावती ऐवजी त्याच पैशात शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी असे माझे वैयक्तीक मत असल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. यवतमाळ येथे दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. 
 
राष्ट्रवादीचे संघटन मजबूत करण्यासाठी, त्यांची बांधणी करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी संवाद यात्रा सुरू केली आहे. या यात्रेदरम्यान त्या बुधवारी दुपारी यवतमाळ येथे दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या की, शेतकरी कर्जमाफी हा सध्या सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. शासनाने कर्जमाफी केल्याचे पोस्टर लावले अद्याप त्यावर कुठलीही कारवाई नाही.
 
कर्जमाफीची घोषणा झाली म्हणजे कर्जमाफी झाली असे होत नाही. या सरकारला सहकारचा अद्याप अर्थच कळला नसल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. त्यामुळे कुणी कर्जमाफीचे श्रेय घेण्यासाठी धडपड करीत असेल तर ती व्यर्थ आहे. राज्यात लागू होत असलेल्या जीएसटी बद्दल त्या म्हणाल्या की जीएसटी लागू करण्याचा निर्णय युपीए सरकारचाच होता. त्यामुळे जीएसटीला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यात आता बरेच बदल करुन जीएसटी लागू करण्यात येत आहे. त्यात करण्यात येणारा बदल हो लोकांच्या गरजानुसार करणे आवश्यक आहे. 
 
राष्ट्रपती उमेदवाराबद्दल विचारणा केली असता सुप्रिया सुळे यांनी हा निर्णय गुरूवारी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत होणार असल्याचे सांगत त्या नावाबाबत बोलण्याचे टाळले. याशिवाय एनडीए चा उमेदवारी दलित चेहरा देण्यात आल्याने त्यात राजकीय खेळी तर नाही ना या प्रश्नावर बोलताना त्यांनी शेवटी माणसाचे कर्तृत्व मोठे असणे हीच बाब महत्वाची असल्याचे सांगितले.
 
यवतमाळ दौरा हा संवाद यात्रेच्या निमित्ताने असून त्याद्वारे पक्ष संघटन, बांधनी सामाजिक प्रश्न जाणून घेण्यासाठी आम्ही आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही वर्षात पक्षबदल करण्याच्या आणि कुणाही पक्षासोबत हातमिळवणी करुन सत्ता स्थापण करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याची अनेक चक्रावरणारी उदाहरणे जिल्हा परिषदेत दिसून येत आहेत. त्यामुळे आला प्रामाणिकपणा हा केवळ नावापुरता शिल्लक राहीला असल्याचेही त्या म्हणाल्या. या पत्रकार परिषदेला आमदार मनोहर नाईक, संदीप बाजोरीया, ख्वाँजा बेग, जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले यांच्यासह बऱ्याच प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते.
 
राष्ट्रवादीचे संघटन मजबूत करण्यासाठी, त्यांची बांधणी करण्यासाठी राज्यभरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या संवाद यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर सुप्रिया सुळे ठिकठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत आहेत. मागील तीन वर्षात राज्यामध्ये भाजप - शिवसेना युतीची सत्ता असल्याने सुळे कार्यकर्त्यांशी संवाद साधून संघटन वाढवण्याचा प्रयत्न करण्यासाठी संवाद यात्रेच्या माध्यमातून फिरत आहेत. 
 
 
बातम्या आणखी आहेत...