आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी नोकरीतील सरोगेट मदरही प्रसूती रजेसाठी पात्र, नागपूर खंडपीठाचा निर्वाळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- सरकारी नोकरी करणारी सरोगेट आईही प्रसूती रजेसाठी पात्र आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. नागपुरातील एका महिला प्राध्यापकाने दाखल केलेल्या रिट याचिकेवर न्या. वासंती नाईक आणि न्या. अनंत बदर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला.

याचिकाकर्त्या प्राध्यापिकेच्या १५ वर्षांच्या एकुलत्या मुलाचे २८ जुलै २०१० रोजी निधन झाले. यानंतर त्यांनी दुसऱ्या मुलासाठी अनेक परिश्रम घेतले. अनेक उपचारानंतरही त्या गर्भधारणा करू शकण्यास सक्षम नसल्याने डॉक्टरांनी त्यांना सरोगसीचा उपाय सुचवला. मुंबईतील जसलोक रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी सरोगसीद्वारे बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. मार्च २०१३ रोजी एका महिलेच्या गर्भाशयात बिजांड टाकून भ्रूण वाढवले. संबंधित महिलेने १४ डिसेंबर २०१४ रोजी बाळाला जन्म दिला. करारानुसार ते बाळ याचिकाकर्त्यांना मिळाले. या बाळाच्या जन्मापासून ते संगोपनासाठी याचिकाकर्त्यांनी सुटी घेतली होती. दरम्यान, त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या माध्यमातून उच्च शिक्षण संचालकांना प्रसूती रजेसाठी अर्ज केला होता. परंतु, उच्च शिक्षण संचालकांनी २८ जुलै १९९५ च्या राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार सरोगेट आई प्रसूती रजेसाठी पात्र नसल्याचे कळवले. त्यामुळे प्राध्यापिकेने उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला.
बातम्या आणखी आहेत...