आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यवतमाळमध्ये जमावाकडून जाळपोळ, तुफान दगडफेक, पोलिसांचा लाठीमार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ : वायपीएस शाळेतील बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर सलग पाचव्या दिवशी शहरात तीव्र पडसाद उमटले. संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांना अटक करावी या मागणीसाठी शनिवारी सकाळी दारव्हा नाका परिसरात पुन्हा जमाव एकत्र आला. संतप्त लोकांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. अांदाेलक व पाेलिसांच्या झटापटीत माध्यमांच्या प्रतिनिधींसह ४० जण जखमी झाले.
यवतमाळ पब्लिक स्कूलमधील बालिकांवर अत्याचाराचा प्रकार उघडकीस आल्यापासून पालक आणि नागरिक भडकले आहेत. यात संस्थालकही दोषी असल्याचा लोकांचा आरोप आहे. किशोर दर्डा यांना अटक करावी या मागणीसाठी शनिवारी सकाळी लोक एकत्र आले. वाढती गर्दी पाहून अपर पोलिस अधीक्षक काकासाहेब डोळे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. किशोर दर्डा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून अटकेसाठी पोलिस पथके रवाना झाल्याची माहिती त्यांनी पालकांना दिली. शिवाय या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र जमाव त्याच ठिकाणी ठाण मांडून राहिला.

जाळपोळ, तोडफोड
दरम्यान, काही तरुणांनी रस्त्यावर टायर पेटवण्यास सुरूवात केली. या ठिकाणी असलेल्या प्रवासी निवाऱ्याची तोडफोड सुरू केली. काही वेळानंतर जमाव मातोश्री सभागृहाकडे वळला. दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी मज्जाव करताच काही तरुणांनी पोलिसांवर, पालकांवरही दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत २ पोलिस अधिकारी आणि १० कर्मचाऱ्यांसह इतर लोक जखमी झाले. हा जमाव पांगवण्यासाठी शेवटी पोलिसांनी लाठीमार केला. अश्रुधुराचाचाही वापर करण्यात आला. त्यानंतर सर्वत्र धावपळ सुरू झाली. तत्पूर्वी जमावाने रेल्वे क्रॉसींगजवळ उभ्या स्कॉर्पीओ गाडीची तोडफोड केली. एक दुचाकी जाळण्याचा प्रयत्न केला. सुमारे ३ तास चाललेल्या या प्रकारानंतर जमाव पांगला. दरम्यान पोलिस अधीक्षक अखीलेशकुमार सिंह यांनी पालकांशी संवाद साधला. पालकांनी किशोर दर्डा यांच्या अटकेची मागणी रेटून धरली.

तरुण चढला पाण्याच्या टाकीवर
दारव्हा नाक्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी एकत्र आली होती. यावेळी याच चौकात असलेल्या जीवण प्राधिकरणाच्या पाण्याच्या टाकीवर एक युवक चढला. हा प्रकार लक्षात येताच नितीन मीर्झापुरे नामक युवकाने टाकीवर चढून युवकाची समजूत काढली. त्यानंतर युवकाला खाली उतरवण्यात यश आले.

महानिरीक्षक दाखल
चार दिवसांपासून शहरात पसरत चाललेल्या तणावामुळे अमरावती पोलिस परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजीव दयाल शनिवारी शहरात दाखल झाले होते. दगडफेकीची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना सुचना देत स्वत: जमाव पांगवण्यासाठी पुढाकार घेतला.
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...