आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोऱ्या रोखण्यास एसीपी, ठाणेदार शहरातील नागरिकांची घेणार बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात मागील काही दिवसांपासून सातत्याने चोरी, घरफोडीच्या घटना वाढत आहे. चोऱ्या थांबविण्यात किंवा झालेल्या चोऱ्या उघड करण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. दरम्यान चोऱ्या रोखण्यासाठी प्रत्येक एसीपी आणि ठाणेदार दरदिवशी सांयकाळी आपआपल्या ठाण्याच्या हद्दीत जाऊन नागरीकांशी बैठक घेणार आहे. या पध्दतीने प्रत्येक ठाण्याचे ठाणेदार शहरातील एसीपींना बैठक घेणे आवश्यक असल्याचे पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलीक यांनी सांगितले आहे. हे आदेश पोलिस आयुक्तांनी शुक्रवारी (दि. ९) दिले आहेत.
शहरातील चोऱ्या घरफोडीच्या घटना रोखण्यासाठी आता ‘वॉर्ड डिफेन्स कमिटी’ स्थापण करण्यात येणार आहे. या कमिटीमध्ये परिसरातील पाच ते सात तरुणांचा किंवा नागरीकांचा समावेश करून घ्यायचा आहे. त्यासाठीच शुक्रवारी सांयकाळपासून शहरातील प्रत्येक एसीपी ठाणेदाराने आपआपल्या हद्दीतील वेगवेगळ्या भागात जाऊन किमान एक बैठक अशा पद्धतीने दरदिवशी तीन बैठक घेणे आवश्यक केले आहेत. या बैठकीला परिसरातील किमान १०० ते १५० नागरिकांनी उपस्थित राहायला पाहिजे. चोऱ्या रोखण्यासाठी काय खबरदारी घ्यायची, अनोळखी व्यक्ती दिसला की, पोलिसांना माहिती द्यायची यासह अन्य महत्वाच्या सूचना जनजागृती करण्याच्या दृष्टीने पोलिस अधिकारी बैठकित देतील. या अनुषंगाने का होईना आता ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांना पोलिस ‘पहायला’ मिळणार आहे. कारण आतापर्यंत शहरातील अनेक नागरिकांना पोलिसांचे प्रत्यक्षात दर्शन हे दुर्मिळच आहे. कारण शहरातील अनेक गल्लीबोळांमध्ये पोलिसांनी गस्त करणेच बंद केले असल्यामुळे सर्वसामान्यांना पोलिस दिसत नाही. अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

यासोबतच गाडगेनगर, राजापेठ, फ्रेजरपुरा, काेतवाली यासह शहरातील मुख्य पोलिस ठाण्यांच्या हद्दीत किमान चार वाहनांद्वारे पोलिस गस्त घालणार आहे. यामध्ये पोलिस ठाण्यांचे दोन वाहन तसेच सीआर मोबाइल व्हॅन आणि महिला दक्षता पथक गस्त घाणार आहे. ही गस्त गल्लीबोळांमध्ये होणार असून, गस्त घालणाऱ्या पोलिसांनी वेगवेगळ्या भागातील नागरिकांची भेट घेऊन त्यांची स्वाक्षरी मोबाइल क्रमांक लिहून आणायचा आहे. त्या नागरिकांचा मोबाइल क्रमांक गस्त पथकातील पोलिसांना नियंत्रण कक्षात द्यावा लागणार आहे. आणलेल्या मोबाइल क्रमांकावर नियंत्रण कक्षातून फोन करून गस्तीबाबत खात्री करण्यात येणार आहे. या पद्धतीमुळे शहरात योग्य पद्धतीने गस्त होईल चोरी, घरफोडींच्या घटना रोखण्यात यश येणार असल्याचा विश्वास पोलिस आयुक्तांनी व्यक्त केला आहे.
बातम्या आणखी आहेत...