आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात टाळण्याकरिता पोलिसांना मिळणार धडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मागील काही महिन्यांपासून पोलिसांनी कंबर कसली आहे. वाहतूक सुरळीत झाल्यास अपघाताचे प्रमाण निश्चितच कमी होईल. अशावेळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची महत्त्वाची जबाबदारी आहे. सोबतच वाहनचालकांनी सुध्दा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. शहर वाहतूक पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी पहिल्यांदाच "सीआयआरटी' कडून धडे देण्यात येणार आहे.

अमरावती शहर वाहतूक पोलिसांना पहिल्यांदाच 'सीआयआरटी'कडून हे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 'सीआयआरटी' (सेन्ट्रल इन्स्टीट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट) ही संस्था संपूर्ण देशात वाहतूक क्षेत्रात महत्त्वाचे काम करते. वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीपासून ते वाहतूक व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेले तंत्र, त्याबाबतचे लेखी प्रात्यक्षिक ज्ञान सीआयआरटीचे तज्ज्ञ अमरावतीच्या वाहतूक पोलिसांना देणार आहेत.

या संदर्भात अमरावती शहर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सीआयआरटी'सोबत चर्चा झाली तसेच पत्र व्यवहारसुध्दा झाला आहे. अमरावतीत येऊन प्रशिक्षण देण्यासाठी सीआयआरटीने हाेकार कळवला आहे. त्यामुळे लवकरच शहरातील वाहतूक पोलिसांना सीआयआरटीच्या तज्ज्ञांकडून वाहतूक व्यवस्थापनाचे धडे मिळणार आहेत.

शहर वाहतूक पोलिस दलात यापुढील काळात तरुण पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणात राहणार आहे. कारण आगामी काळात वाहतूक पोलिसांचे काम व्यापक स्वरुपात होणार आहे. तासन््तास चौकात उभे राहून काम करावे लागणार आहे. सद्याही त्याच प्रमाणे काम केले जात आहे, मात्र यापेक्षाही काम वाढणार आहे. अशावेळी तरुण पोलिसांची फळी महत्त्वाची ठरणार आहे. म्हणूनच वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या ज्या कर्मचाऱ्यांनी वयाची ४५ शी ओलांडली आहे, त्यांच्या जागेवर तरुण कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

कसे राहणार प्रशिक्षण
वाहतूक पोलिस ज्या प्रकारे सद्या काम करतात, त्यात अधिक तांत्रिकपणे कसे काम करता येईल, वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येईल. चौकात सिग्नल बंद असल्यानंतर पोलिसांना मॅन्युअली वाहतूक नियंत्रित करावी लागते. अशावेळी काम कसे करावे, कमी मनुष्यबळात चांगले काम, तसेच प्रत्यक्षात चौकांमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

'सीआयआरटी'ही देशातीलवाहतूक यंत्रणेसंदर्भातील महत्त्वाची संस्था आहे. वाहतुकीमधील महत्त्वाचे बदल, सुधारणा, नवनवीन शोध, वाहतूक नियम यावर या संस्थेचे काम सुरू राहते. या संस्थेकडून शहर वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण देण्याबाबत आम्ही निर्णय घेतला आहे. या प्रशिक्षणासंदर्भात पोलिस महासंचालक कार्यालयाकडून परवानगी मागण्यात आली होती, ती मिळाली आहे. त्यामुळे पुढील महीन्यात अमरावतीतच तज्ज्ञांकडून प्रशिक्षणाला सुरुवात होईल. नितीन पवार, पोलिसउपायुक्त (मुख्यालय).