आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडांसोबत मुलांनाही वाढवले, तिसरी पास उषा मडावींचा मुलगा बी.टेक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - गोंदियापासून ६० किलोमीटरवर सालेकसा हे तालुक्याचे ठिकाण आहे. सालेकसापासून चार किमी आत गेलो की उषा मडावी यांचे नानव्हा हे आदिवासी गाव लागते. या गावावर उषा मडावींची नाममुद्रा उमटली आहे. कारण त्यांनी जागता पहारा देऊन ५०० एकर जंगल वाचवले. पण एवढे पुरेसे नाही. स्वत: तिसरी पास उषा मडावी यांनी आपल्या चारही मुलांना जिद्दीने शिकवले. आज त्यांचा मोठा मुलगा मुलगी नुकतीच ग्रॅज्युएट झाली. तर लहान मुलगा सेकंड इयरला आहे.

उषा मडावींचे दोन भाऊ बारावी पास आहे. पण मुलगी एकच असल्याने आई-वडिलांनी दूरच्या शाळेत एकटे पाठवायचे नाही म्हणून शिक्षण थांबवले. त्यामुळे त्या जेमतेम तिसरी शिकू शकल्या. आपण शिकु शकलो नाही, याची खंत त्यांना सलत होती. म्हणून त्यांनी मुलांना शिकवायचे ठरवले.

उषा मडावी यांना शैलेश, ममता, मंजूश्री आणि जितेंद्र अशी चार मुले आहेत. नानव्हा येथे पहिली ते सातवी जिल्हा परिषदेची शाळा आहे. त्या नंतर सालेकसाला वा गोंदियाला जावे लागते. पती शेती करून मजूरीवर जातात. घरी शेतीचे मर्यादित उत्पन्न. त्यामुळे प्रसंगी शिकवले. सर्वात लहान असलेला जितेंद्र उन्हाळ्यात रोहयोच्या कामावर जातो. त्यातून त्याच्या शिक्षणाचा खर्च निघतो. शैलेश आणि ममता हे दोघे बहिण-भाऊ सातवी नंतर गोंदिया येथील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात राहुन शिकले. दहावीनंतर दोघांनीही आमगाव येथे बारावी केले. त्या नंतर शैलेशने नागपूर येथे पाॅलिटेक्नीक तर ममताने बी. एड. केले. पाॅलिनंतर शैलेशने पुण्यात अभियांत्रिकी महाविद्यालयातून काॅम्प्युटर इंजिनियरिंगमध्ये बी. टेक. केले. तर ममता गावाकडे शिक्षिका आहे. मंजूश्रीने माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण आमगाव येथे पूर्ण केले. सध्या ती बी. ए. फायनलला आहे. तर जितेंद्र बी. ए. सेकंड ईयरला आहे. दोघेही शेतीत आणि घरकामात आईला मदत करतात.
५०० एकर जंगल वाचवले
अवैध वृक्षतोड, रेती उपसा व खनिज चोरीविरूद्ध लढा देऊन उषा मडावी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज ५०० एकर जंगल वाचवले आहे. अवैध रेती चोरी बंद केल्याने उन्हाळ्यात आटणारे नदी-नाले आता वाहते राहातात. आेरिसात जादव पायेंगने १,३६० एकरवर मानवनिर्मित जंगल तयार केले. उषा मडावींनी आहे ते जंगल राखले. जंगल वाचवण्याच्या कामामुळे घराकडे दुर्लक्ष झाले. पण तक्रार न करता मुले शिकली. संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष असलेल्या उषा यांचा बहुतांश वेळ आजही जंगल राखण्यातच जातो.
बातम्या आणखी आहेत...