आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळघाटात निनादले ‘घुंगरू बाजारातील’ आदिवासी संगीतनृत्यांचे मधुर स्वर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेळघाट, अमरावती- मेळघाटातील अप्रतिम निसर्ग सौंदर्य प्रत्येकाच्या मनाला साद घालते. उंचच उंच पर्वतरांगा आणि त्यातून खळाळत वाहणाऱ्या नद्यांमधील पाण्याच्या आवाजात आठवडी बाजारातील घुंगरांचे आवाज समधूर स्वर जेंव्हा भर घालतात तेंव्हा मेळघाटाचे सौंदर्य अधिकच खुलते. दिवाळीच्या काळात लक्ष्मीपूजनानंतर मेळघाटातील गावागावात भरणाऱ्या साप्ताहिक बाजारहटांनाच ‘घुंगरू बाजार’ असे म्हणतात. मात्र, वर्षभर भरणारे आठवडीबाजार आणि दिवाळीच्या दिवसांतील बाजारहाट यात तुलनात्मक बरेच वेगळेपण आहे. सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत वसलेल्या आदिवासी गावांमध्ये ऐन दिवाळीतच हे घुंंगरूचे सुमधुर स्वर निनादतात. या काळात भरणाऱ्या आठवडीबाजारातील आदिवासींचे नृत्य आणि नृत्यादरम्यान बाजारातील व्यापाऱ्यांकडून मिळणाऱ्या भेटवस्तू हे खास आकर्षण असते.
मेळघाटातील प्रतिकूल परिस्थितीत होणारी निसर्ग शेती, आदिवासींचे वन्यजिवांवर असलेले प्रेेम आणि तुटपुंज्या उत्पन्नातही जंगलाला केंद्रस्थानी ठेऊन दिवाळी सण साजरा केला जातो. पारंपरिक आदिवासी पोशाख परिधान करून ढोल, बासरी आणि घुंगरांच्या माळा अशा वाद्यवृदांच्या सहाय्याने आठवडी बाजारात घुमणारे संगिताचे सुरेल सूर हे आजवर खास आकर्षण ठरले आहे.

अमरावतीहून मध्यप्रदेशातील खंडवाकडे जाताना मुख्य रस्त्यावर असलेल्या हरिसाल गावातील आठवडीबाजारात पोहचलो तेव्हा आदिवासी बांधवांनी हा बाजार फुलून गेला होता. बाजारातील व्यापा ऱ्यांचे सुरू असलेले आपल्याकडील वस्तूंचे मार्केटिंग, दुकानांतील गर्दी आणि या प्रचंड गर्दीमध्येही सादर होणारे पारंपरिक आदिवासी नृत्य लक्षवेधक होते. शहरातील कार पार्किंगसारखी आठवडी बाजारानजीक असलेल्या मोकळ्या मैदानावरील आदिवासी बांधवांच्या ‘छकडे पार्किंग’ची पद्धतही लक्षवेधीच ठरते. पांढरा शर्ट, पांढरे धोतर , डोक्यावर रंगीत पगडी, त्यावर तुरेदार सजावट आणि अंगात चढवलेला कोट. दोन्ही हाताला शंखांची भलीमोठी माळ, हातात तीन फूट लांब बासरी, गळ्यात लटकवलेली ढोलकी आणि पायाला घुंगरांच्या तोड्या अशा पारंपरिक वेशभूषेत आदिवासी लोक बाजारात सामूहिक नृत्य करतात. असे दहा ते बारा समूह आठवडी बाजारात फिरतात. या समूहांपैकीच दोन ते तीन आदिवासी बांधव हातात झोळी घेऊन बाजारातील व्यापाऱ्यांकडे दिवाळीनिमित्त भेटवस्तूंची मागणी करतात. व्यापारीसुद्धा त्यांच्या दुकानातील विक्रीकरिता ठेवलेल्या वस्तू स्वखुशीने त्यांच्या झोळीत टाकतात. भाजीपाल्याच्या दुकानातून एक कांदा, एखादा बटाटा, कोबीचे फूल, बांगड्याच्या दुकानातून बांगड्या, सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानातून बिंदी, अंगठी, दैनंदिन उपयोगातील विविध वस्तू असा खास संग्रहच या आदिवासींच्या झोळीमध्ये होतो.
दुर्गम भागातही घुंगरू बाजार
मेळघाटपरिसरातील धारणीपासून सुरू झालेला हा घुंगरू बाजार हरिसालच्या आठवडीबाजारापर्यंत असतो. यंदा या बाजारात आसपासच्या गावातून मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव एकत्रीत झाले होते. मेळघाटातील कळमखार,बिजूधावडी, टिंटंबा, देठतलई, बैरागड, सेमाडोह, हरिसाल काटकुंभ, चुर्णी, हतरू येथे घुंगरू बाजार आयोजित करण्यात आले होते.