आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई : स्टंटबाज मुलाच्या पित्याला अटक करण्याचे दिले आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - दुचाकींवर स्टंट करून पुजाऱ्याला उडवल्याप्रकरणी स्टंटबाज मुलाच्या पित्याला अटक करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी सोमवारी (दि. १३) राजापेठच्या ठाणेदारांना दिले आहे. सतरा वर्षीय मुलाने दुचाकीचा स्टंट करताना शनिवारी (दि. ११) विनोद सरजू पांडे नामक पुजाऱ्याला उडविल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर स्टंटबाज मुलगा गंभीर जखमी आहे. दरम्यान, एखाद्या अल्पवयीन स्टंटबाज मुलाच्या पित्याविरुध्द गुन्हा दाखल होऊन त्याला अटक होण्याची ही शहराच्या इतिहासातील पहिलीच घटना ठरणार आहे. 
 
अल्पवयीनांच्या हातात दुचाकी देऊ नका, असे यापुर्वी अनेकदा पोलिसांनी पालकांना बजावून सांगितले आहे. अल्पवयीन दुचाकी चालकांच्या पालकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही सांगितले होते. मात्र पोलिसांच्या या सूचनांचे फारसे पालन होत नसल्याचे वेळोवेळी दिसून आले. त्यामुळे शहरात सद्यास्थितीत स्टंटबाजी करणाऱ्यांमध्ये बहूतांश स्टंटबाज हे अल्पवयीन असल्याचे यापुर्वी पोलिसांनीच केलेल्या कारवाईवरून पुढे आले आहे. मात्र तरीही काही अल्पवयीन पाल्यांचे पालक पुत्रप्रेमापुढे ‘अांधळे’ झाले आहेत. दरम्यान शनिवारी (दि. ११) सायंकाळी एमआयडीसी मार्गावर एका सतरा वर्षीय स्टंटबाजाने सायकल हातात घेऊन जाणाऱ्या विनोद सरजू पांडे नामक ४५ वर्षीय पुजाऱ्याला उडवले . या अपघातात पांडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर स्वत: दुचाकी चालकसुध्दा गंभीर जखमी झाला . पांडे हे घरातील कर्ते पुरुष होते. त्यांच्या अपघाती मृत्यूने कुटूंबियांवर मोठे संकट कोसळले आहे. स्टंटबाजीचा बळी ठरलेल्या पांडे यांना उडविणारा स्टंटबाज हा अल्पवयीन आहे, त्यामुळे राजापेठ पोलिसांनी त्याच्या पित्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. मात्र दोन दिवस होऊनही त्याच्या पित्याला अटक झाल्यामुळे तातडीने अटक करण्याचे आदेश पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी राजापेठचे ठाणेदार किशोर सूर्यवंशी यांना दिले आहेत. त्यामुळे लवकरच त्या स्टंटबाज पित्याला मुलाच्या कृत्यामुळे अटक होणार आहे. 
 
शहरात मागील काही महिन्यांपासून स्टंटबाजांची ‘मस्ती’ वाढली आहे. अनेकदा तर पाच ते सात स्टंटबाज घोळक्याने येऊन अक्षरश: सर्वसामान्यांना दुचाकी रस्त्याच्या खाली घेण्यास भाग पाडतात. यापुर्वी काहींवर पोलिसांनी अनेकदा मोटर वाहतूक कायद्याचे उल्लघंन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे मात्र लाखो रुपयांची दुचाकी घेऊन स्टंट करणाऱ्या या मस्तीखोरांना शंभर, दोनशे रुपयांचा दंड असर करत नसल्याने दिसून येते.मात्र पोलिस आयुक्त स्वत: स्टंटबाजांच्या बाबबीत गंभीर झाले आहेत. त्यामुळे त्यांनी गुन्हे शाखेच्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांना विशेष रुपाने स्टंटबाजांची माहिती काढण्यास सांगितले होते. त्यानुसार या पथकाने शहरातील मार्गांवर स्टंटबाजी करणाऱ्या जवळपास ४० ते ५० जणांची यादी तयार केली आहे. तसेच काही स्टंटबाजांची सिडी सुध्दा पोलिसांना प्राप्त झाली आहे. ज्यांचा यादीत समावेश आहे,
 
त्यांच्यासाठी स्वतंत्र रजिस्टर तयार करून प्रत्येक स्टंटबाजाची परिपूर्ण माहिती, छायाचित्र, हाताचे बोटाचे ठसे, मोबाईल क्रमांक, पालकांची माहिती घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सीपींच्या कठोर भूमिकेमुळे स्टंटबाजांचे धाबे दणाणले आहे. 
 
स्टंटबाजांविरुद्ध होणार कठोर कारवाई 
स्टंटबाजीकरून सर्वसामान्य वाहनचालक तसेच पादचाऱ्यांच्या जीवावर उठणाऱ्या स्टंटबाजांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. शहरातील स्टंटबाजांचे स्वतंत्र रेकॉर्ड तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच पुजाऱ्याला धडक देणाऱ्या अल्पवयीन स्टंटबाजांच्या पित्याला तातडीने अटक करण्याचे आदेश ठाणेदाराला दिले आहेत. दत्तात्रयमंडलिक, पोलिस आयुक्त. 
दहा दिवसांपुर्वी विद्याभारती महाविद्यालयासमोर एका स्टंटबाजाने ६५ वर्षीय महीलेला उडवले होते. या अपघातात महीलेच्या पायाला दुखापत झाली आहे. त्या स्टंटबाजाविरुध्द गुन्हा दाखल केलाच होता. दरम्यान त्याला महाविद्यालयातून ‘रस्टीकेट’ करावे, यासाठी त्याच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पोलिस आयुक्तांनी पत्र लिहीले आहे. त्यामुळे आता पेालिस आयुक्तांचे पत्र मिळाल्यानंतर महाविद्यालय प्रशासन या स्टंटबाजाविरुध्द कारवाई करणार किंवा नाही, ही बाब महत्वाची ठरणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...