आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भ, मराठवाड्यात मदर डेअरीचे प्रकल्प; 4 जून रोजी शुभारंभ, नितीन गडकरी यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मराठवाडा आणि विदर्भातील दुग्धविकासाला चालना देणाऱ्या मदर डेअरीच्या प्रकल्पाचा शुभारंभ ४ जून रोजी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी नागपुरात दिली.   

या प्रकल्पात मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि परभणी जिल्ह्यासह विदर्भातील सात जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. नागपुरातील शासकीय दूध डेअरी ३० वर्षांसाठी मदर डेअरीला हस्तांतरित करण्यात आली आहे. या प्रकल्पात दूध उत्पादन वाढीसाठीचे प्रयत्न, संकलन, प्रक्रिया आणि विक्री मदर डेअरी करणार आहे. दूध उत्पादनवाढ आणि उपलब्ध दूध संकलित करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाद्वारे संचालित मदर डेअरीशी गेल्या वर्षीच करार करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दुधाला चांगला भाव मिळणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. विदर्भात येत्या दोन वर्षांत २० ते २५ लाख लिटर दुधाच्या उत्पादनाचे लक्ष्य ठेवले जाणार आहे.    
 
नागपुरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची निविदा लवकरच निघणार असून लवकरच कामालाही सुरुवात होणार आहे.  मिहान प्रकल्पातील एमआरओ प्रकल्पाच्या केवळ २० टक्के क्षमतेचा वापर सध्या होत आहे. उर्वरित ८० टक्के क्षमता वापरासाठी अमेरिकी कंपनीने प्रस्ताव दिला असून ही कंपनी बाराशे अभियंत्यांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. या प्रकल्पात नागरी तसेच संरक्षण दलाच्या विमानांची देखभाल व दुरुस्तीही केली जाणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. गडचिरोली जिल्ह्यात उदबत्तीच्या काड्या तयार करण्याच्या प्रकल्पाला सुरुवात होत असून या उद्योगातून किमान पाच हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. याशिवाय गडचिरोली व वर्धा जिल्ह्यातून सुमारे ६०० टन मध निर्यातीच्या प्रकल्पाला चालना मिळणार असून या प्रकल्पातील कंपनीला पाठवण्यात आलेले मधाचे नमुने मंजूर झाल्याचे गडकरी यांनी सांगितले. 
 
देणगीतून कन्व्हेन्शन सेंटर होणार
अमेरिकेत सुमारे २५ हजार कोटींची उलाढाल करणाऱ्या कंपनीचे संचालक तारक हरदास यांनी नागपुरातील कन्व्हेन्शन सेंटरच्या प्रकल्पाला ५०० कोटी रुपयांची देणगी देण्याची तयारी दर्शवली असून हा प्रकल्प केंद्रीय कापूस अनुसंधान केंद्राच्या जागेवर करण्याचे प्रयत्न असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...